Saturday, June 9, 2018

श्रीवाहिनी हे फेसबुकवर सादर केलेले महाकाव्य संपले सोमवार ते रविवार अश्या सात दिवसातील घडामोडी न्यूज चॅनेल प्रमाणे सादर करत २० थिम्स हाताळणे असे त्याचे स्वरूप झाले होते हे ठरवून झाले न्हवते तर लिहिता लिहिता झाले होते एखादा लेखक एखाद्या संस्कृतीला पेलत नाही किंवा त्या संस्कृतीतील साहित्याचे ठेकेदार तो पेलू देत नाही म्हणून त्या लेखकाने थांबून चालत नाही त्याने आपले काम नीट करणे गरजेचे असते मराठीत दोन्ही बाजुंनी गोंधळ असतो स्वतःला कलावादी , संरचनावादी वा सहिंतावादी म्हणवणारे समीक्षक लेखकही केवळ निखळ संहिता वाचून मत बनवत नाहीत तर स्वतःचे हितसंबंध बघून मत बनवतात तर सामाजिक बांधिलकी मानणारे लेखक समीक्षक युरोपियन प्रबोधनाने स्पॉन्सर केलेल्या विचारप्रणालीत अद्यापही रांगत आणि रंगत असतात ह्यांच्या वैचारिक बाललीला ह्या प्रचंड बोर करतात अशावेळी चौथ्या नवतेला मिळणारा अल्प प्रतिसाद हा गृहीत धरावा लागतो . ज्या मोजक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचे आभार

ह्या महाकाव्यातील मुख्य  थिम्स पुढीलप्रमाणे होत्या

१ बातम्या देण्यापुर्वीची मानसिक हालचाल आरंभ
२ फेक न्यूज ,बाबरी मशीद, जाहीर रित्या घेतलेल्या चुंबनाचा वाद , ज्योतिषशास्त्र , बाबालोक व अनुयायी , लेखन आणि अभिनय व पोस्टमॉडर्निझम  या विषयावरील सात दिवसाच्या बातम्या
३ फॅशन आणि किचन
४ कॉलेज जगत आणि तरुणाईचे स्वगत
५ रुईया कॉलेजमधील रोमान्स
६ जे एस हॉल मधील रोमान्स
७ मीरारोड दहिसरमधील लिव्ह इन रिलेशनशिपमधील रोमान्स
८ स्पोर्ट्स
९ वर्किंग प्लेस
१० चौथी नवता
११ कविता आणि सॉंग्ज
१२ मार्क्सवादी व परिवर्तनवादी कार्यकर्त्याची सात स्वगते इंटिमेट इंटीलिजन्स
१३ मुंबईत चाललेली मोबाइलवरची संभाषणे आणि त्यांचा येणारा मोबाईला फील
१४इंटरनेट चॅटिंग
१५मुलाकात INTERVIEW
१६प्रार्थना
१७सिनेमा
१८स्वतःलाच फेस TO फेस करणे
१९मृत्युशय्येवरून सात स्वगते
२० थोडं अध्यात्मिक

ह्या थिम्स सात दिवसांच्या सातत्यात वावरत्या ठेवून १९९२ ते २००७ ह्या दरम्यानची मुंबई जालनगरी व तिच्यातील नागरी जीवन  पेलणे असे ह्या महाकाव्याचे स्वरूप होते असे आता दिसते ह्या संग्रहानंतर  २००७ नंतर माझे अनुभवविश्व पूर्ण बदलले आणि त्यातून थोड्या वेगळ्या कविता जन्मल्या ज्यांना मी नेट सिरीज मध्ये टाकले आहे.

माझा स्वतःचा आणि माझ्या साधनेचा भूतकाळ हा माझ्या लिखाणात विखुरला गेलेला असा अचानक पाहावा लागतो आणि हे मजेशीर असते माझे मित्र माझ्या ह्या कविता ज्या नेटाने टाईप करून वा संकलित करून इथे टाकतायत ते तारीफके काबील ! हे लोक नसते तर माझ्या ह्या कविता इतक्या सातत्याने फेसबुकवर दिसल्या नसत्या . ते मला गुरु मानत असले तरी मी त्यांना मित्र मानतो कारण माझा गुरु वैग्रे भानगडीवर विश्वास नाही . सुदैवाने ते भक्त नाहीत अन्यथा त्यांच्यापासूनही दूर जावे लागले असते . त्यांचे आभार !

अलीकडे मी फार कमी कविता लिहितोय कारण कवितेचा फ्लो थांबलाय क्वचित एखादेवेळी झिरपणी झिरपते . एकेकाळी आपण इतक्या भरभरून कविता लिहीत होतो हेच आता आश्चर्यकारक वाटते आणि साधकाचा टोकाचा एकांत तर त्याला जबाबदार नसावा ना असा प्रश्न पडतो . असो सर्वांचे पुन्हा आभार !

श्रीधर तिळवे नाईक