Wednesday, August 31, 2016

चॅनेल :ज्ञ , लिव  इन आणि लिव आऊट श्रीधर तिळवे -नाईक 

प्रेम 

प्रेम न्हवतं तुझं 

आणि आय लव्ह यु म्हणत राहिलीस 


आत असुरक्षिततेचे कोंब 

आकांत आणि निष्ठुर बोंब 


मी इमानदारीने कान देत राहिलो 


माझा वास घेतलास 

कि तुझं फूल व्हायचं नाही 

फक्त येणारी उलटी तू दाबून ठेवतीयेस 

असं वाटायचं 

मग संशय घेतला कि तुझं आय लव यु 


मी तुझी इमोशनल सपोर्ट सिस्टीम होतो का 

आपत्कालीन आधारविमा 


भेटीतल्या उत्कंठा 

केवळ डोळ्यांच्या हालचाली होत्या का ?


कि मी तुझी फक्त सवय होतो ?


जीव तर पाळलेल्या कुत्र्यालाही लागतो 

मी तुझा पाळलेला प्रियकर होतो का ? 

प्रेम आणि मैत्री ह्यांच्या दरम्यान सख्य असते 

मी तुझा सखा होतो का 

कि मला कसं डिफाइन करायचं हे न कळल्याने 
माझ्याबाबत काही डेफिनिटी ठरवता येत न्हवतं ?

माझं प्रेम एकतर्फी 
तू नेमकं कशासाठी दुतर्फा केलंस ?

इमोशनल ट्राफिक ज्याम करण्यात 
आपण दोघेही ज्याम वस्ताद आहोत 

गाड्याच इतक्या पार्क करायच्या 
कि रस्ता उरूच नये 

मी पुरेसे एफर्टच टाकत नाही कशात बहुदा 
मला काहीच अट्रॅक्ट करत नाही जगरहाठीमधलं 

लोकांना वास मारतो मला केऑस 

आपला रिलेशनल फ़ंडाच चुकलाय का ?

तुला जातांना मी अडवत का नाही 
कि तू निघून जावंस असं मला वाटतंय ?

आपण न भांडण्याचा करार केलाय 
आणि माझं काळीज उलटं होऊन 
मला उलटसुलट करतंय 

====
अन मग तू म्हणालीस 
तुझ्या नको तितक्या चांगुलपणाला कंटाळलीये मी 
चांगुलपणा बोअर करतो 
मग माझ्याकडे न पाहता 
निघून गेलीस 

नेमकी कशाकडे पाठ केली होतीस ?

श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ  , लिवइन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

बी 

दुःख 

दुःख हे नाही कि
तू फसवलंस 
दुःख हे आहे  की 
तू माझ्या मित्राला राखी बांधून 
मला फसवलंस  

मी ह्याही मित्राला 
काळजाने ओवाळले 
आणि 'या, दरवाजा उघडाच आहे ' म्हणत 
रक्ताने कवटाळले 

माझ्या दोन्ही बहिणींमुळे माझा राखीवर पोलादी विश्वास 
आणि तुझ्या घरात तर भावाबहिणीनेच लग्न केलेले 

ते सख्खे नव्हते हा तुझा युक्तिवाद बरोबरही असेल 
पण मग मैत्रीचे काय 
कि घरात मित्र आणूच नयेत 
हा पारंपरिक संदेश बलवान करण्याचा 
हा शक्तिमानी पवित्रा ?

'एथिक्स नसलेली बाई '
घात करायला मोकळी ?

आणि मग राखी बांधायचे नाटक कशाला ?
स्त्रीवादाच्या नावाने कसली कसली समर्थने ऐकायची ?
कि पत्रकारांनी काहीही केले तरी ते एथिकल ?

तू म्हणजे संपूर्ण समाधान 
असा तुझा गैरसमज आहे कि काय ?

चाळा प्रत्येकाला सुचतो 
पण आळा घालतो तो माणूस 


ब्लेमगेम खेळण्यात तुझा हात कोण धरणार ?
तू तर माझा स्पिरिच्युअल हातही 
तुझे हरवलेले पेपर शोधायला वापरलास 

परीक्षाही आणि वापरही 
पुन्हा हे सारे फालतू म्हणण्याचे डेअरिंग 
वासनेच्या स्टेअरिंगवर हात ठेवत 

केवळ ऑरगॅझम ऑर्गनाईज करणारी तू ऑर्गनायझेशन आहेस का ?
एकेका ऑर्गनला तळघरातून बडवत 
 विचार तरी हा प्रश्न 

कुरूप पेपरवरची जॉमेट्रिकल ऑर्डर मोडायला 
कमालीची साक्षरता लागते 
तुझ्याकडे ती मुबलक 

त्यामुळे माझ्या दोषावर तू पी एच डी सादर करू शकतेस 

तू अभिनयाला शरण जाणारी अभिनेत्री आहेस 
म्हणूनच कुठल्याही संहितेत तुला वाकवता येते 

तुझ्या स्कील मुवमेंटचा मोर 
कितीही पिसारे फुलवून नाचला तरी 
माझ्या सारखा थोडाच जंगली होणारय ?

तू यंत्र बनवतानाच 
त्याला ऑफ करणारा खटका 
स्वतःत तयार करणार 
आणि यंत्र बन्द पडले कि 
लहान मुलीसारखी रडणार 

मला तुझ्या वर्तमानावर क्लेम करायचा नाहीये 
किंवा तुला प्राप्त करण्यासाठी परफॉर्मन्सही द्यायचा नाहीये 
फक्त राखीचा माझ्यावर असलेला खोल संस्कार मोडीत काढून 
राखीला पुन्हा योग्य त्या देव्हाऱ्यात 
स्थापन करायचं आहे 

तुला भाऊ नाहीत
पण मला बहिणी आहेत 

मी परंपरा निवडत नाहीये 
पण वासानेपलिकडे जाणारी कमिटमेन्ट निवडतोय 

तुझा क्रायटेरिया मला कधीच कळला नाही 
'संधीच्या आड येणार सर्व पोकळ ' मानणारे लोक 
वासनेचीही पालखी प्रेमातून काढतात आणि कुठेही पालथे पडतात 

मला त्याविषयीही काही म्हणायचे नाहीये 
तुम्हा दोघांचा चॉईस होता 
तुम्ही निवडला

आता असे चॉईस नेहमीच रक्तबंबाळ असतात 
आणि त्यात काहीवेळा सज्जनांचेच रक्त निघते 
हा वासनादुर्विलास 

आपल्यात स्प्रिंगने 'स्प्रिंग ' उडाला 
समरने 'समर ' गाठला 
जो अनिरुद्ध होता तो विरुद्ध झाला 
जो ज्ञान देणार होता तो वासनाकांड झाला 

ह्याचा अर्थ इतकाच 
कि आपण एका अनरिपेअरेबल मोटारीत 
बसून आहोत 

 तू त्या दरवाज्याने उतर 
मी ह्या दरवाज्याने उतरतो 

नरकांसाठी तुझ्याजवळ कविता आहेच 
स्वर्गांसाठी बेस्ट ऑफ लक 

***

पाठान्तरे 


तुझ्या व्यभिचारात 
मी आत्महत्या करणार नाही 
किंवा सूड म्हणून 
तुझ्या परिचिताशी व्यभिचारही करणार नाही 

माझी एक अहंकारी डिग्नीटी आहे 
आणि एक अध्यात्मिक कमिटमेन्ट 
जी सूडात जळत नाही 
कि बावचळत नाही 

सेक्सच्या डायरेक्ट लिंक्स 
हिडन ठेवण्यात 
तुझे मनोरंजन होते काय ?
कि हे मोबाईल फर्टिलीटीचे 
त्वचाळ व्हर्जन्स आहेत ?

मी तुझा  देह व्हेरिफाय करत नाही 
तुला देहबोली रिप्रोड्युस करायला आवडते 
हे तर वयात आलेला पोरटाही
ओळखेल 

तुझ्या हृदयाचे सतत  बदलणारे कॅटलॉग 
मीही एनजॉय केलेत 
तुझ्या श्वासांच्या फोटोकॉपीज 
मीही मावळत्या हातांनी 
जतन केलेत 

आनंदाचा बदलता फॉरमेट 
गमावलेला आत्मविश्वास परत करतो का ?
बदलत्या कोएक्झिस्टन्सचा सोलमेट 
पांगळ्या गूढतेची घोडागाडी घेऊन 
रेसकोर्स जिंकतो का ?

पुरुषाच्या घोड्याला पुरुषाच्याच घोड्याने मारणारी तू शूटर 
सतत मोटिवेटरच्या शोधात असलेली तू मुडी मूवर 
बेटांची स्तनलिखित प्रस्तावना आणि यौनबोलीतील निळ्या ऑर्गझमची स्कायलाईन 

तू स्वतःला सर्च करतीयेस कि खर्च करतीयेस ?
शेअर करतीयेस कि डेअर करतीयेस ? 
कि हा केवळ दिशाहिन मोरखेळ आहे ?  

जादूच्या अंगठ्या घालून तुला बोटांची सत्यता कळत नाहीये 
आणि उंगल्या करूनही अंगुलीमालला बुद्ध भेटत नाहीये 

त्याला मुळात तुम्ही जेन्युईन किलर असायला हवात 
तू तर फक्त FEELER आणि FILLER

जा 
अंगातले गुलाब घेऊन जंगल काबीज करणारे 
हत्तीबळ कमवून जा 

माझ्याकडे घोडा कधीच नव्हता / नाहीये 

मी एक झोपी गेलेला ससा आहे 
तुझ्या व्यभिचाराने मी जागा होईन 
ही एक खोटी आशा आहे 

माझ्यासारखा माणूस 
फक्त निर्वाणानेच जागा होतो 

जा 
बिचारा तुझा प्रियकर वाट पाहतोय 

जा 
मागे वळशील तर गिल्टमध्ये जळशील 

तुझी पाठमोरी पाठ 
आणि माझी पाठांतरे 

***


शेवटचा कावा 


"माझ्या पोटातलं ते मूल 
तुझं नव्हतं "
तुझ्या कॅलक्युलेटीव टेरेरिझमने 
मला दुखावण्यासाठी टाकलेला हा शेवटचा बॉम्ब ?
कि संबंध संपवण्यासाठी सांगण्यात आलेले शेवटचे सत्य ?

माझ्या जीन्समधला बायोमॉसचा फ्लो 
अचानक फंगसमध्ये थबकलाय

वंशाच्या दिव्याचे स्ट्रक्चर 
आणि पेशींची इकोसिस्टिम 
अचानक वितळलेल्या तुझ्या खुलाश्याने 
हेळकांडतीये 

दगड निर्माण करणारी तुझी चिरपरिचित जिऑलॉजी 
मेंदूचे केस कापतीये 

जनेटिक मटेरियल गोळा करून 
पुन्हा क्रियेट करण्याची तृष्णा 
माझ्यात कधीच ड्युरेबल नव्हती

बघ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवूनही 
मी कायमच किनाऱ्यावर लागतो

मात्र स्टराईल अपघातांची स्टाईल 
कंडोम फाडून तुझ्यात फुटली 
आणि स्वर्ग फाडणारे माझे हात 
तुझ्या बोटात नरक झाले 

गर्भपात निवडतानाचा गिल्ट 
पुरुषाला खाऊन टाकतो 

कित्येक वर्ष मी जगलो तुझ्या गर्भाशयातली माझी आत्महत्या 
आणि आता तू म्हणतीयेस 
ते मूल माझे नव्हते 

विश्वास कुणावर ठेवावा 
त्यावेळच्या तुझ्यावर 
कि आत्ताच्या तुझ्यावर ?

केवळ मला दुखावण्याचा हा खटाटोप असेल तर 
तुझ्या शब्दांचे चरित्र काय ?

माझ्याजवळ सॉर्टींग मशिनरी नाहीये 
सेल्फ रेप्लिकेशनचे व्यवहार मला कळत नाहीत 

एकतर ते खोटे आहे 
किंवा हे खोटे आहे 

शब्दातून गवत उगवतय
आणि मी तुझ्या भाषेला अश्वतथ  समजलो होतो 

रिऍक्शन काय देऊ ?
The Question of possibility will never die

गर्भाशयात तुझ्या मी पुन्हा एकदा मारला गेलोय 
मात्र  तो आत्ताचा रेप्लिका आहे कि 
त्यावेळचा सिम्युलेशन 
हे मला माहित नाही 

काहीतरी वितळलय जे तुझ्या संबधात अडकून पडलं होतं

माझ्या पोटात दुखायला लागलय 
मात्र मी पोटुसा नाही हे निश्चित ! पुरुषोत्तमी नरमर्यादा !

मला नव्या बर्फाचा शोध लागलाय 
तू नव्या प्रियकराबरोबर आईसक्रीम खात 
सेल्फमेड जखमेत वाहतियेस   

***



गिल्ट व्यक्त केल्यानंतरची रात्र 


ही अपराधभावाची जादू आहे कि 
अपरिहार्यतेचा स्वीकारलेला डेडऍण्ड ?

तू शरीरसुख ओततीयेस 
माझ्या अंगावर स्पर्शांची रांगोळी काढत 

मला हातांचे विमान बनवता आलेले नाहीये 
मात्र मिठी इनोव्हेट करण्याची माझी सवय 
तुझ्या व्यभिचारातही स्वतःला टिकवतीये 

तुझा चेहरा पहायला मला गॅलीलोची टेलिस्कोप लागत नाही 
मात्र व्यभिचार ताडायला हबलही पुरत नाही 

विजेचे युग संपून तिचे बघता बघता म्युझिअम झाले आपल्या सबंधात

लेन्समेकिंगचे इंस्ट्रूमेंटल  ब्लडफ्लॉवरिंग करत 
तू बेडवरील मार्केटप्लेसमध्ये 
बागा लावतीयेस
सुवासांची कॉम्प्लेक्स जर्नी सुरु होतीये 
उमलण्याच्या युनिक नीडमध्ये 

निडमध्ये हरवलेली नीडल्स नको शोधू
कपडे काढून कधी नाती शिवता येतात काय ?

प्रश्नांचा ब्रॉड प्लॅटफॉर्म 
उत्तरांचा अनप्रेडीक्टेबल परफॉरमन्स 

पेजरच्या मास मुव्हमेंट व्हायब्रेट होतायत 
मेसेजच्या गलितगात्र रात्रीत 

तू टीपिंग पॉइंटवर उभी आहेस 
तुझी केऑटिक खेळणी अदयाप पुरेशी मॅच्युअर झालेली नाहीत 

तुझी व्यभिचार ह्या तुझ्या बाळलिला आहेत 
असे मी समजावे का ?

चुंबनांची इकॉलॉजी 
मी एखाद्या बेस्टसेलरप्रमाणे 
तुझ्या ओठांना विकतो

ही नवी संधी असेल 
हा नवा ब्रेक थ्रू असेल 

किंवा हा तुझा नव्या प्रियकराबरोबर झालेला भांडणाचा 
माझ्या शरीरातून त्याच्यावर उगवलेला तात्कालिक सूडही असेल 

तू स्वतःच्या तंतूसाठी 
इतरांची त्वचा फाडू शकतेस 

तुझा अहंकार तुला पॉलिटिकल गायडन्स देतोय 
तू अश्रुंचे नवे मॉडेल डेवलप करतीयेस 

तुला वाटतं की तू जेन्युईन आहेस 
आणि मला वाटते 
तुझ्या फेकॉ  लॉजीचा हा पश्चातापदग्ध तमाशा आहे 

मी तुझी ओळख डिफाईन करण्यात चुकत असेन
किंवा तुझी मूळ ओळख डिवाईन असेल  
मला कमर्शिअल अडॉप्शनस कळत नाहीत 

तू फॅशन म्हणून शरीर फ्लकच्युएट करू शकतेस 
आणि स्वःचे फॅमिली मॉडेल म्हणून 
बेवफाई दत्तक घेऊ शकतेस 
हे मी जाणतो 

आपले नाते ही एक फॅब्रीकेटेड इनवेस्टमेंट होती 
आणि आपण त्यात इमोशनल गुंतवणूक करून 
अडकून पडलो       

तू तुझ्या नागव्या शरीरातून
बॉयलॉजी एक्सपोज करतीयेस 

तुझे स्तन आई आणि बाई मिक्स करत
इलेक्ट्रॉनिक कणासारखे उडतायत
लाल स्तनेरी आकाशगंगा
निपल्समधून बाहेर पडतीये

मी चोखतोय कि शोषण करतोय ?
तुझा इनहाऊस शरीरपिसारा डौलाने फुलवत
तू वळसा घेतीयेस

पाठीवर फोर्स उतरवत
मी कानापर्यंत आक्रमण झुलवत
एका लॉन्ग नराची तयारी- दुतर्फा

आपण प्रजोत्पदनाचे केवळ नैसर्गिक रिसोर्स असूही
पण पेट्रोल
फक्त ट्रॅव्हलिंगसाठी वापरले जाऊ शकत नाही काय ?

कंडोमचा प्रोटेक्टिव इमपॅक्ट

निसर्गाशी तह करून
आपण मौजेत उतरतोय

आनंद म्हणजे रिस्क घेत प्राप्त केलेले इनोवेशन

आपण इनोवेटर होतोय
आणि व्यभिचाराचे बदक
ट्रान्सफॉर्म होत - आपल्या शरीराच्या गरुडहंसात
नाहीसं होतंय 

***

काळजाचा चंद्र विझवून 
मेंदूतील सूर्य काळात वाळत घालून 
मी चाललोय 
विरह रिप्रोग्राम करत 
भायंदरच्या आमच्या आईस्क्रीम पार्लरमधील सनातन बर्फात 

दोन महिने देऊनही 
तुला ठरवता येत नाहीये 
तुझं प्रेम त्याच्यावर कि माझ्यावर ?

सैलकी असावी आयुष्यात पण किती 
ह्याला मर्यादा असावी 

प्रेम कळायला एव्हढा उशीर लागतो 

मला तर बघताक्षणीच कळलं होतं 
रुईया कॉलेजात 
मी तुझ्या प्रेमात पडलोय 
पण त्यावेळीही तुझ्या आधीच्या प्रियकरांचे निवडुंग आडवे आले 
आणि मी माझी हार्डडिस्क तुझ्याशी जोडणे टाळून 
स्वतःलाच सोसत गप्प राहिलो 

पुढेही तुला स्पष्ट झालंच नाही 
मी तुझ्या आयुष्यातील झाड कि बोन्साय 
आणि माझे जंगलणे तर 
तुझ्या महानगरी त्वचेला अस्वलाच्या गुदगूल्याच करायला लागलं 

संदिग्धता हा धूर्तपणाचा एक प्रकारही असू शकतो 
किंवा भावनांचा केऑसही 


आजही मला कळत नाही 
मी तुझ्या गुहेत का शिरलो 
का वासनेच्या शेकोट्या पेटवल्या 
का कमिटमेन्टची भित्तिचित्रे काढली 

शिकार मी तुझी केली कि 
मी तुझी 
हे आपणास  
एकमेकास 
पोटभर खाऊनही 
कळले नाही कधी 

आपले नाते तुझ्या एस्केपिझमचा 
टाईमपास तर नाही ना ?
आणि हा नवा प्रियकर ?
तोही ?
कि ही पुरुषांना वापरण्याची 
सुसंस्कृत पद्धत आहे ?

शरीराकडे व्यवहार म्हणून पाहणाऱ्या बायका 
शेवटी त्यांच्या ह्या व्यवहारातच कोसळतात 

तू काय करतीयेस 
आणि मी काय झक मारतोय तुझ्यात ?

बये ,
ठाम निर्णय घे 
त्रिकोण तू निर्माण केलायस 
मी नाही 
मी तर वर्तुळ होतो 
तुझ्यापासून सुरु होऊन 
तुझ्यापाशी सम्पणारं 

त्या वर्तुळाला प्रयत्न करूनही पंख फुटले नाहीत  
ही माझी मर्यादा 

तेव्हा तो जर पंख असणारा जादूगार असेल 
तर खुशाल त्याला निवड 

तुझे उडणे 
हे सर्वाधिक महत्वाचे आहे 

ऊड !


आणि तू म्हणतीयेस

तुला त्याला शेवटची मिठी मारायची आहे



हा सेक्स आहे 
कि हे नग्नतेचे सेलिब्रेशन आहे ?

कपडे हाच समाज नव्हे काय ?
आपण सेक्स करतोय 
कि समाजापासून पळून जातोय ?
कि त्वचा फ्रेश ठेवण्याचा 
हा बहुगुणी पण आखूडशिंगी उपाय आहे ?

आपण एकमेकाला वाचतोय 
कि एकमेकात एकमेकाला वाचवतोय ?
कि ही तुझ्या निर्णयाची अग्निपरीक्षा आहे ?

विझलंय काय ?
जळलंय काय ?
जन्मलंय काय ?

स्पर्श डायल करून 
थोडाच रिलेशनशिपला फोन लागतो ?

मी रडतोय 
पण मी का रडतोय 
मला माहित नाही 

डोळ्यातल्या पाण्याचा साउंड 
आणि गळ्यातला  स्फुंद हुंदका 

हे दुःख असेल तर 
संभोगानंतर का उमलावे ?

फुले सुकून गेल्यावर 
बागेची आलेली ही प्रतिक्रिया आहे काय ? 


रूमभर पाचोळा झालाय
आणि तू म्हणतीयेस
तुला त्याला शेवटची मिठी मारायची आहे

आत्ता ह्या संभोगानंतर
तुला माझी परमिशन लागावी?

एक अस्वस्थता तुझ्यात लोड झालेली

कोण डोईजड झालाय
मी की तो ?

कम्पेनियनचा बघता बघता एनसायक्लोपिडीया झालाय
आणि तुला तो फक्त एक पान जाळून
नष्ट करायचाय

मला तुझी दया येतीये
आणि करुणाही वाटतीये

हळूहळू तू त्याच्यासाठी ओथंबतीयेस
आणि माझ्यापासून लपवूही पाहतीयेस

बाई गं
प्रेम हे फक्त प्रेमच असतं
आणि त्याचा शेवट ठरवण्याचा अधिकार
तिसऱ्या माणसाला नसतो

त्याला मिठी मार
नाहीतर चिठ्ठी टाक
शेवटी कुणा  एकाची त्वचा जळणार हे नक्की
आणि जो वाचेल त्याला  तू आयुष्यभर शिव्या घालणार हेही नक्की

तुझ्या देहरेषेला दोन्ही टोकाला बाण आहेत
आणि रेषा दोन्ही टोकांनी अनंताकडेच जाणार आहे

काडीमोड फक्त समाजात होतो
काळजात मात्र रोज एक मॅचबॉक्स जळतो

जा
तुझ्या मिठीत त्याला शेवटचे जाळ
आणि हा शेवट नाही
असा कनफ्यूज शेवटही दे

चुंबनानी दंतकथा लिही
आणि हातांनी हातोहात फसव

तो गेलाय
आणि मी तुझ्यातून बाहेर पडतोय

***

एंडपॉइन्ट फर्नीचर 


संतापाच्या खुर्चीत बसून तू म्हणालीस
"द पॉवर ऑफ लव इज ओवर "

व्यभिचाराच्या बेडवर पोहत तू म्हणालीस
"द सेक्स बिटवीन अस इज ओवर "

कडवटपणाच्या खिडक्या उघडत तू म्हणालीस
"द ओवररेटेड फिलिंग्ज बिटवीन अस आर ओवर "

उदासीचा टिव्ही ऑफ करत तू म्हणालीस
"द ग्रीनरी ऑफ अवर सीनरी इज ओवर "

डिप्रेशनच्या गोळ्यात हृदय चघळत तू म्हणालीस
"द फक ऑफ लक बिटवीन अवर हॅण्डस इज ओवर "

मी काहीच म्हणालो नाही
फक्त खोकलो
आणि त्या खोकल्याने सायलेन्स समाप्त करून
तुझी फर्निचर तुला परत केले

***
सुजितने विचारले तुम्ही दोघांच्यात काय झाले  - तेव्हाची कविता 

ती म्हणाली की
माझं प्रेम आहे तुझ्यावर
आणि की
I Love You
आणि कि
मोहब्बत करती हूँ तुमसे

म्हणताना तिचा मधाळ आवाज पोकळ होता
आणि चेहरा भरीवपणाचा अभिनय करत होतां

तिला मनापासून वाटत होतं कि
मी तिच्या अभिनयावर विश्वास ठेवावा
आणि मी दिग्दर्शक असल्याने अभिनय ओळखून होतो

योग्यवेळी म्यूट आणि योग्यवेळी वॉल्युम
ही माझी पॉलिसी होती
आणि माझा वांधा हाच होता कि
माझे तिच्यावर प्रेम होते

मी स्वर्ग सोडत होतो
आणि ती आय लव यु म्हणत
त्याचा नरक बनवून मला पाठवत होती

तिच्या काळजाच्या केन्द्रात कांदा होता
शेजारी मोरपंखी बिकनी होती
आणि तिला माझ्या रक्तात कांदा बांधून पोहता येत होतं 

मला गुलाबाची अपेक्षा नव्हती
पण प्रेमातील काटे  अस्सल असावेत असे वाटत होते

दुर्दैवाने तिचे काटे फक्त तिच्या त्वचेतून उगवत होते
आणि मी फक्त माझ्या त्वचेत रक्तबंबाळ होत होतो

मग ती म्हणाली
"तुझे- हृदय रक्तबंबाळ होत नाही
ह्याचा अर्थ तुझे माझ्यावर प्रेम नाही "

मी काहीच म्हणालो नाही
ती स्वतःशीही खोटं बोलायला लागलीये
एवढंच माझ्या लक्ष्यात आलं

एक दिवस स्वतःशी खोटं बोलून ती थकली
आणि तिनं माझा मित्र पकडला
स्वतःच्या जीवावर एकही मित्र कमावणे तिला जमले नाही
म्हणून प्रियकरांचे मित्र ते आपले प्रियकर
असे काही तिचे धोरण होते कि काय
हे मला माहीत नाही

पण जो आला
तो आधी माझा मित्र होता
मग तिचा प्रियकर झाला

त्याच्याशी सेक्स करताना
तिला कळाले कि
तिचं माझ्यावर प्रेम नाही 

मग परतल्यावर ती म्हणाली कि
माझं तुझ्यावर प्रेम आहे
आणि कि
I Love You

हे डबल खोटं होतं
आणि आत्ताही तिची अपेक्षा होती कि
मी तिच्या खोट्यावर विश्वास ठेवावा

माझं  तिच्यावर प्रेम असल्याने
मी तिच्या खोट्यावर विश्वास ठेवण्याचा अभिनय केला नाही
फक्त म्यूट राहिलो

आता ती तिचे प्रेम त्याच्याबरोबर उत्सवतीये
आणि तिला ते नीट व्हेरिफाय करता यावे म्हणून
मी तुझ्याकडे आलोय

सुजीत म्हणाला
"सरळ बोल ना तिनं तुझी गांड मारली "

मी काहीच म्हणालो नाही
फक्त किडनीत अडकून पडलेल्या किडकिडीत स्वप्नाचा
खळकन आवाज ऐकला
आणि रक्तबंबाळ झालेली गांड म्यूट करत
टीव्ही लावला

***

हवादिल हवालदिल



आपल्या वाताहतीने
कल्पनाविलास रचला
कि आपल्या कल्पनाविलासाने
वाताहात घडवली ?

मेंदूचा ज्वर कायमच विषमज्वर होता
हृदयाचा समस्वर कधी लागलाच नाही
काळीजठोक्यांचा पंचनामा करूनच
आयुष्याची सुरु झाली पोलीस चौकी

एखादं कुभांड रचलं गेल्यासारखं हे अस्तित्व

किती आच होती कि त्यातून काही दैवी निघावे
पण अपघातांच्या मातीतून उगवलेला हा अंकुरफूगा
जंगलेच्या जंगले वाटवत राहिला काळाच्या वाटचालीतून

आणि आख्ख्या मानवजातीबरोबर आपण अमर होणार असल्याचा भास
बडवत राहिला अंतिम सत्याचा ढोल

आता इतके चालून आल्यावर कळतय कि
चालणारे पायही पोकळच आहेत
आणि पावलाची बोटं  टराटरा फक्त पादतायत

हा कसला गॅस साठवत होतो आपण वाटचालीत
आपला सगळा ऑक्सिजनच आपल्या इगोने
दुर्गंधित झाला काय ?

हवादिल श्वास
हवालदिल झालेत
आणि फुफ्फुसांचा हवालदार जीव खाऊन
दुतोंडी शिट्ट्या मारतोय

कवितेची शिळच फक्त ताजी आहे
बाकी सर्वच शिळं होत चाललंय

***



निरोपाची कविता 

प्रथम तूच दहशत निर्माण केलीस
मग त्याविरुद्ध मी लढलो
तर तू मला म्हणालीस
'दहशतवादी आहेस '

एनाकोंडाच्या हातांनी तू आवळला विष्णू
पण मी सहिष्णू हातांनी
उलथापालथ पेलली
तुझा जबड्यात चॉकलेट टाकत
तुझे डोळे कॅडबरी केले

तुझी पाऊले कायम अभिनय वाजवत आली तेव्हा
मी रियॅलिटीचे मास्क चढवून
परफॉरमन्स दिला

"तू पुरेसा रोमॅन्टिक नाहीस  "
म्हणत तू जार जवळ केलेस
तेव्हाही मी त्यांना शेजार मानत
शेजारधर्म पाळले

माझ्या अध्यात्माला  विकनेस मानत
तू स्वतःचा  पिडीया रचलास
तेव्हाही मी त्याला मीडिया मानत
पिडेचे पान बनवून
ते चघळत  राहिलो

ते  चघळता चघळता माझाच आता च्यूईंगगम झालाय
तर तुझा मला सोडून जाण्याचा हट्ट
माझ्यावर आरोप करत
न्यायालयतोय

बाई असण्याचे किती आडवान्टेज घ्यावेत एखाद्या बाईने !

तुझ्या फेमिनिझमपुढे माझी चिक्कार प्रश्नचिन्हे आहेत
आणि त्यांचे उत्तर म्हणून आलेला
तुझा व्यभिचारही आहे

एका अफेयरला दुसऱ्या अफेयरने उत्तर देण्याची तुझी शैली !

हा नॉन्सेन्स आहे
पण तुझ्यासारख्या बुद्धिमान बाईला हे कोण सांगणार ?

बुध्दीमत्तेमुळे शहाणपण येतेच असे नाही
आणि प्रॅक्टिकल व्यवहाराला प्रतिभा मानण्याचा बनचुकेपणा
माझ्यात अद्याप भिनलेला नाही

स्वार्थ हीच सर्वात मोठी भावना असेल तर
इमोशनल कोशंट कितीही उच्च असून काय फायदा ?


सर्वत्र त्वचा फासून
संन्यास घेता येतो का ?

मी तुझा संगणक कधीही तुझा अनुमतीविना वापरला नाही
उलट मला त्यातलं काही कळत नाही
अशी अफवा फैलावत
नॉनतांत्रिक अंगानी
घराबाहेर जाऊन लिखाण केले

तुला वाटले
मी मीरा रोड स्टेशनवर नुस्ता बसून असतो
पण बये मी असा लेखक आहे
ज्याने तू हाकलून काढलीस
त्याचीही कलाकृती बनवली
आणि मीरा रोड स्टेशनवर डासांना रक्त देत
कागदावर उतरवली

खरेतर निरोप देताना काहीच म्हणू नये
म्हणून मी ते म्हणतच नाहीये
जे मला म्हणायचे आहे

फक्त माझे कान उपटून
तुझ्या घराच्या हातात देतोय

बाय
हे घर डेस्टिनेशन नव्हे
तर स्टेशन होते
हे कळायला तर
हा प्रवास होता

तुझा बाय  करणारा हात हवेत उमललाय
आणि मी तो फुलासारखा काळजात खोवत-
 आपणच तयार केलेल्या आपल्या बागा
तुडवत चाललोय

***



आपण संसार करण्याची क्षमता गमावत चाललोय 

हिंसेची झुळूक अजून वादळलेली नाही 
अतितीव्र रात्रीचा हंगाम सुकत चाललाय 
फॅमिलीयर बनणे फॅमिलीच्या आड यायला लागलंय 
नर्व्हस डाऊनचे बिट्स छप्पर फाडतायत फडफडत 

नातं तरी कितीदा रिमिक्स करून नव्याने ऐकणार ?

मला हवी होती लता मंगेशकर 
आणि तुला अनुराधा पौंडवालही होता आलं नाही 
तुला हवा होता जागतिक दर्जाचा जगप्रसिद्ध प्रतिभावंत 
आणि मला साधी गल्लीही काबीज करता आली नाही 

संभोगाचा पावही शिळा व्हायचा शरीरात बुडवताना 

अंगाला ढोंग पचत नाही 
आणि त्वचेला संभ्रमाचे ढोल 

ब्रशसुद्धा काळे पडायला लागले आपल्या शब्दांनी 

भांडणे उधारीवर मिळत नाही म्हणून बरं 
नाहीतर अख्खा बाजार घरी आणून ठेवला असता आपण 

फेक उपस्थित्या कुडकुडतायत 
थंडी मिसकॉल देतीये शेकोटीतून 

आकाश धुतल्यावरही 
वाळत कुणी घालायचे 
ह्यावर वाद घातले आपण 

जखमी झालो तर जखमांना नखे दाखवली 

प्रिये ,
आटोपता घेऊ हा शृंगाराचा प्रमाद माज न करता 

दोघांनी चूड दिला कि चिता हमखास पेटते 

दे भडक सत्यानाश 
श्रीधर तिळवे -नाईक 

(चॅनेल : ज्ञ  , लिवइन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )
श्रीधर तिळवे -नाईक 

अमेरिका 


मी अमेरिकेत जात नाही
वा मी अमेरिकेतून येत नाही
मी जगात कुठेही असलो तरी
अमेरिकेतच असतो

ही शोकात्मिका कि जागतिकता
हे मला ठाऊक नाहीये

पण अमेरिकेशी कनेक्ट करणारा मिक्सर
कायमच माझ्या हृदयाचा डीजे साईन करत
मला संगीतात वटवतोय
कोकोकोलाचा लुटारू थेंब
माझा गळा लाटतोय

मी युद्धात असतो
तेव्हाही मी अमेरिकेत असतो
आणि शांतीही मला
अमेरिकेत असतानाच हवीहवीशी वाटते

माझे हे अमेरिकीकरण
अध्यात्मिक नाहीये
मात्र ते मला स्पष्टपणे दिसतंय
ही मात्र माझी अध्यात्मिकता आहे


ही अध्यात्मिकताच मला कधी कधी
मायग्रेशनला मदत करते
आणि मी अमेरिकेचा राजीनामा देऊन
अमेरिकेबाहेर असू शकतो
ह्याची शक्यताही सूचित करते

ह्या अमेरिकेचा मृत्यू झाला
कि पहाच मी झालो बुद्ध

सब अपनी मौत मरते हैं मैं तेरी मौत मरा : श्रीधर तिळवे -नाईक 
हजारो मैल दूर असण्याऱ्या तुझ्या प्रेयसिय अस्तित्वाचे  
हे दिवाळखोर हिरवं शेवाळ 
इथं जमलय माझ्या खोलीत 

तू झाडे लावली नाहीस 
पण शिशिर सोडून निघून गेलीयेस

हे पानगळीच शिल्प बीटत बीटत इथं धडकतय काळजात
डोळ्यातील ताऱ्यांचे अंगठ्यातील खडे होतायत

माझ्या अश्रुंच्यावर तुझा अद्याप कॉपीराइट आहे
म्हणून ते अद्याप वहात नाहीत

खूप घडलंय
खूप बिघडलंय
सगळ रीअरेंज झालय म्हणे तोवर
माझ्या पुस्तकात स्वहस्ताक्षरात तू मुद्दाम सोडलेले साप
सप्प उगवत कपाळदंश करतात
आणि कपाळमोक्ष गिरवतात

आपण एक्स्चेंज केलेले धागे वीरता विरत नाहीत
आणि ह्या शिशिरात स्वेटरही बनत नाहीत

मी प्रेमात आत्माही विकणार नाही म्हणून
तू तुझ्या शरीरनिष्ठेच दिवाळ काढलं का ?

तू तुझ्या मार्गाने अमेरिकेत डॉलरजडित
मी माझ्या मार्गाने भारतात निर्वाणजडित

तरीही हे पानगळपिडीत शेवाळ
ह्या खोलीत वाढतच आहे

रोज नव्या ब्रान्डचा सूर्य उगवतोय
जुन्या ब्रान्डचा चंद्र बनून मावळतोय

ह्या पानगळीत मी तुझं काय हिरवं शोधत बसलोय ?

तुझा मेसेज आला कि मी के व्हायचो
आता ते सारे मेसेजेस के साबणासारखे ओउटडेटेड होतायत

 तुझ्या त्वचेची झुळूक अद्यापही मला किस करते आहे
आणि ती मिस करणं  माझ्या जीवावर येत

तुझ्या सावळ्या सौंदर्याचा नखशिखांत खजिना
अजूनही अनेक रत्ने चमकवत माझ्या देहात हिंडत असतो

तुझे नितंब म्हणजे राजस्थानी ढोल
आजही माझ्या पेशीत वाजतात

माझ्या किती गढ्या खर्ची पडल्या
प्रेमाची एक गुडी उभी कराय ?

त्वचेखाली श्वास घेत होत ते प्रेम
त्वचेवर रंग पालटत होती ती वासना
आपण दोहोत डुंबलो
आणि काळजाचे तीव्र काळेशार क्लॉक
स्तनास्तनातुन  क्षणाक्षणानी पिलो

पाने गळतायत कि तुझ्या स्तनांचे बोंड ?

माझा स्ट्रगल ट्रबल झाला
आणि त्यात पहिली विकेट आपल्या कम्युनिकेशनची पडली

मी म्हणालो कि ढग तोडून आणेन
आणि घरात नळाला पाणी आलच नाही

मी ज्या खिश्यात पेजर ठेवला
त्याला भोक पडून तुझे मेसेज वाहून गेले

फाटक्या प्रेमीचे फिकट आकांत फटके मारणारे

ठिगळ लावून कधी प्रेम शिवता येते का ?

तुझ्या हृदयाचे सुवर्णमंदिर
अतिरेकाने ताब्यात घेतले
आणि माझे पितळ उघडे पाडत तू म्हणालीस
''  सरेंडर  ''
मी म्हणालो ,'' हा जेन्डर फरक का ?
तू केलेस तर प्रेम मी केलं तर व्यभिचार ?''

बोरिवलीच्या आय सी यु कॉलनीत
आईसक्रीम खाताना मी हात पकडला
तर माझ्या हाती तुझ्या काळजातला बर्फ लागला
तेव्हाच मला कळाले
तू हिमालयावर चढणार
आणि आल्प्सवरून अमेरिकेत कोसळणार

कौंटडोवन होण्याचे टायमिंग मी साधले
कि तू साधले ?

आपण शरीर बनून झोपायचो
आणि प्रतिमा बनून उठायचो

प्रार्थना पाठवताना देव गाभाऱ्यात ठेवायचो नाही
आणि विशेस आणि ब्लेस्सिंग्स
स्ट्रेसिंग आणि ट्रेसिंग मध्ये ट्रान्सफॉर्म करत राहायचो

ही पानगळ म्हणजे त्यांचे बनलेले ट्रेसिंग पेपर्स का ?

एकमेकांना समजून घेण्यासाठी
आपण एकमेकावर कविता लिहिल्या
आणि दोघेही गद्य झालो

शेवटी तू राज्य केलेस
मग साम्राज्य केलेस
आणि अंतिमत : खालसा केलेस

मी नानक वाणीचा पालक पनीर झालो

जोक शेअर करत
स्मिते उधळली एकमेकाच्या ओठावर आपण
आणि कीस बनून लोळलो एकमेकाच्या ओठात

चादरी कुणी धुवायच्या ह्यावरून भांडलो एकांतात
आणि संभोग कुणी आटवले ह्यावरून पब्लिकमध्ये चर्चा केली

तुझा एक सॉफ्ट किस सॉफ्ट वेअर पेक्षा महागडा का झाला ?

तू एक्ज़ोहस्ट होऊन यायचीस
आणि मी संभोगाचे पाणी भरून तयार असायचो

शरीराच्या पलीकडे विक्टिम ?

ही पानगळ कुणी एक्टिवेट केली आपल्या नात्यात ?
हे दिवे कुणी भारनियमनाखाली आणले ?

वीज तर येताजाता खेळत होती आपल्या अंगात
पाठीचा कणा कायमस्वरूपी  ओवरपॉप्युलेटेड होता उत्साहाने

तुझ्या साध्या फ्लॅशने
कॅमेरे चमकायचे फोटो निघायचे

हा रक्ताचा स्टूडिओ कुणी रीता केला ?
एवरग्रीन सौंदर्यस्थळांचे दात चेक करण्याची वेळ कधी आली ?

जिप्सीक्वीन गवारी तोडता तोडता मेली
कि भेंडी तळल्याने तिची गाणी विझली ?

वटवृक्षांच्या वेली बनवून
भावनांचे हे जंगल गार्डनमध्ये कधी सेटल झाले ?

खूप जुनी खूप नवी
कधी वाटायचं तुझी पी एच डी झाली
कधी वाटायचं फक्त बारावी

कायम टीनएजमधे असलेल्या बाईला कसे हाताळावे ?

टीनएजची ग्रेस आणि अंगभर काँग्रेस
गवताचा चार्म हरवला नाही
पण तुझ्या अंगावरचा घाम अलार्म झाला भांडणाचा

थकव्याच्या नशिबी डान्स नसतो
आणि बेकाराच्या भाग्यात रोमान्स नसतो

मी म्हणालो
''आकाश रडतंय ''
तू म्हणालीस
''निळी मारुती घे ''

खरंच मारुतीने आकाश पेलले असते

मी पूर्वी प्रेम केले होते
मी आत्ताही प्रेम करतोय
पण उत्खननाने
वर्तमानाचे प्रश्न सुटत नाही

आजारी शरीराला प्रेमाच्या भेगा पडतायत
आणि वैसलीन देणारी तू तिकडे पलीकडे
अमेरिकेत तुझे झोपडे

तुला सोडल्यानंतरही तुझाच विचार करत राहिलो
विरह प्लान केला तसा झाला
तरीही कोसळणारा कोसळला

प्रेमाचा ठोसा मोहमद अलीपेक्षा जोरदार
काळीज फाडत नाही- ठेचतो

आपल्या प्रेमाची सुरवात कीसने झाली नाही
देरीदाने झाली
ग्रामाटालोजीच्या शुद्ध जंगलात
आपण एकमेकावर सफरचंदे फेकली

ती फेक निघतील असं कुठ वाटलं होत ?

मी दारू पीत नाही पानगळ पितोय
कधी खंबा कधी सिप

हे सगळ पूर्ण फ्रेम बनवून माझ्या वॉलवर कधी लावता येईल ?

सुसंगतीचा स्ट्रोक मला आलेला नाही
हे प्रेमाचे असंगत आचरण मी तरी कुठे शिकलो होतो ?

तुझ्या गळ्यातला हुंदका टेम्पोसारखा आवाज करायचा
तुझे उसासे उश्या ओढून ओढून झोपी जायचे

व्यक्त होण म्हणजे हिंस्त्र होणे
अशीच तुझी समजूत होती का ?

तुझ्या माझ्या प्रेमात पैशनचे कितीतरी ग्लास फुटले
माझा मेंदू अनब्रेकेबल आहे हा माझा समज फुटला

शांतता कल्पना झाली
आणि शब्द कुबड्या घेणारे महायोध्ये होऊन
कापले गेले

सत्यावरून चालताना 
खरेखोटे रिमिक्स व्हायला लागले
आणि कळाले
तू माझ्या निर्वाणातील महाअडथळा आहे

तंत्र मार्गाने मोक्ष साधू पाहणारा माझा कामयोग
गच्चकन थांबला
आणि कामवासनेला शिव्या घालून
मी पुढचे स्टेशन पकडले

संभोगातून समाधी ?
घंटा
संभोगातून फक्त मादी

हाही तुझा उपकारच कि
मी तंत्रापासून कायमचा मुक्त झालो

त्या तंत्राचीच ही पानगळ का मग ?

शीरा शिरा होतात
धमन्या उपीट
आणि मी रोज तुझ्या आठवणीत ब्रेकफास्ट सुरु करतो

ह्या मलूल डोळ्यांना तुझा चेहरा दिसत नाही
मुखवट्यानच्या गर्दीत मान मुरगाळली आपण
एकमेकांच्या चेहऱ्यांची

प्रेम हे असे खतरनाक होते
दिसलेल्या चुका
काळजावर हिमालय ठेवून जाऊ लागतात
आणि सह्याद्री तर असतोच
जन्मल्यापासून मेंदूत
जुना आणि प्राचीन

मी तुला जाऊ दिले
कि तू प्लान करून निघून गेलीस ?

सोन्याची नाणी पाडायचीस तू
चांगला मूड असला की
मग सोलकढी काय वरणभात काय

तुझ्यासारखा सुगरण हात मी नाही पाहिला
वाहायचा तेव्हा सुग्रास सुगंध पिकवायचा
आटला कि घरात साधं गवतही उगवायचं नाही

फैंसी शूज आणि रियालिटीतले पाय

अद्यापही तुझे पाय आणि शूज
ह्यांच्यातला फरक
मला सापडत नाहीये

ही पानगळ एवढी डोईजड कधीपासून झाली ?
श्रीधर तिळवे -नाईक 
(चॅनेल : ज्ञ  , लिव- इन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतून )

'ज्ञ ' अमेरिकेला गेल्यानंतर काही महिन्यांनी लिहिलेली कविता 

मी जगण्यासाठी कविता लिहितोय 
अन मेंदूत उतरण्यासाठी लोकांच्या 
कवितेच्या पायऱ्या वापरतोय

दोन्ही ठिकाणी डिझायनींग आहे 
ह्याची माझ्या मेंदूत्वाला जाण येतीये 



पेशींचा नको असलेल्या नाश करत 
मी अवेअरनेसची नवी फुले वेचतोय 
न्यूरॉनच्या अब्जावधी योनीत

क्वालीटी लिफ्ट करत 
मी एंगेजमेंटशी खेळतोय

बदल घडतायत 
पण आवश्यक तिथे 
आवश्यक तेव्हा 
आवश्यक तेवढेच घडतायत

आणि घडणाऱ्या बदलांचा ताण पेलत 
मी ह्या देहाचे नेतृत्व 
भाषेच्या 'विधान ' सभेत करतोय 


जर्नल्स वाटली जातायत
एन्युअल  समीटस वटवली जातायत
प्रोग्राम्स सर्टिफाय होतायत

त्यांच्यात समावेश असलेली माझी सही मात्र
अनचेंजड आहे


निर्णयाच्या टोकावर सोल्युशनचे दूध आहे

माझ्या कूलनेसचे कौतूक
आणि त्याच्या त्वचेखालील माझा संताप

कोलॅबरेशन करताना एकसारखी झालेली माझी पाचही बोटे
ही स्कील डेवलपमेंट आहे

तू समजतेस तशी
कील डेवलपमेंट नाही

दुसऱ्यांचे मेंदू एक्झीक्यूट करताना मी आताशा
स्वतःच्या मेंदूला फाशी देत नाहीये

कार्टेक्स कोडानंतर चुकलाय
की अंडरस्टॅन्डिग मीसिंग आहे हे मला माहित नाही

मात्र मी आताशा मिसकॉलला
मिसकॉल म्हणून नीट ओळखतो

सकाळ सक्षम करतीये
दुपारी कंटाळा आणतीये
संध्याकाळ थकता शिंपडतिये
चेहऱ्यावर तरीही बेस्ट थिंकिंगचा कायम स्वरूपी मुखवटा ठेवत
मी हातांच्या शेकोटया पेटवतोय


अटेन्शनला आदर देतोय
अटेन्शन सादर करतोय
ह्या वर्कप्लेसला रोज एक नवा मेकअप मी कंपलसरी केलाय



इमोशनल झालो कि प्रश्न सुटतात
इमोशनल झालो की कविता सुचतात 

मग कवितेने प्रश्न का सुटत नाहीत?

अनाकलनीयतेचा कापूस मी रोज पिंजतोय
आणि संध्याकाळी  रोज त्यातून एक कबूतर उडतय
माझ्यासाठी कापसापासून कबुतर बनतं
हेही पुरेसं आहे

९  

शॉवरखाली टिकेल असा कुणी लॅपटॉप शोधलेला नाहीये
त्यामुळे आंघोळ आणि  काम
ह्यातील भेद मात्र कायम आहे

१०
मी जागृत आहे
मी रिफ्लेक्ट करतोय
मी इनसाईटतोय
मी कृतीची साईट रचतोय

शांतता
अचूकता
विधायकता
स्तब्धता
ह्या माझ्या राजकन्या आहेत

मी थोडासा हळवा आहे
त्यामुळेच कदाचित मी फायद्यात आहे

११
प्रश्न सर्वच बघतायत
मी उत्तरांचा हट्ट धरतोय

अनिश्चितता सर्वच उपभोगतायत
मी रतीक्रीडेतही द एन्ड पर्यंत इंटरेस्ट शाबूत ठेवतोय

मी अळमटळम तळतळाट करत नाहीये
एक चैतन्यशाली अप्रोच ठेवून वाटा खोलतोय

मी भुयारातून प्रवास करत नाहीये
मी विमानातून संपूर्ण पृथ्वी पाहतोय

मी डाटा गोळा करून थांबत नाहीये
मी त्यातून कनेक्शनचे फाटे शोधतोय

सर्वांना धमकवणारा धमक्यांचा म्हसोबा
मी नीट कोरून
त्याचा दगड बनवतोय

त्याला बघून
लोक मेंदूतून पळतात
मी मज्जारज्जूतून त्याला पळवतोय

१२
बॉस म्हणजे काय रे भाऊ ?
हे मी आता कॅमेऱ्यातून विचारू शकतो

१३
समाज माझ्या डोक्यात जातोय
माझे डोके सामाजिक करतोय
मग माझे डोके ही दुखते
पण मी समाजाच्या गवतातून
माझे डोके वर काढतो

मी ऍनासिनचा  दुश्मन झालो आहे
आणि सारी पेनकिलर्स माझ्यापुढे  हताश आहेत



१४
स्टेटसची मज्जासंस्था पादते
तेव्हा मी अत्तर लावत नाही
माझा शरीरगंध माझी ताकद बनला आहे

१५
मी तेवढेच निवडतोय
जेवढे आवश्यक आहे

मॉलने स्वतःचे इनस्टोलेशन सर्वत्र लावले म्हणून
मी थोडाच निवडीच्या भाऊगर्दीत
हरवणार आहे ?


१६
मित्र आणि शत्रू सर्वच डिफॉल्ट
बायस न होता मी सामोरा जातोय

पैसा, बक्षीस, अन्न - माझ्यासाठी सर्वच -
सेकंड स्कीन आहे

त्वचेचे बरेच विकार बरे न होणारे आहेत
सेकंड स्कीन हा त्यांचा इनवीजीबल बाप
हे मला नीट कळून चुकलंय

१७
जुळवून घेतोय
एकसंध करतोय
आत्मनियंत्रण साधतोय
भाषा तयार करतोय
बदलांना कवटाळतोय
मेंदूला रोज नवी मिठी मारतोय

१८
तू गेल्यापासून
मी फ्रेश आहे प्रिये
कदाचित तुझे असणेच
मी ओवररॅशनल केले होते

***


चाव्या 


हृदय कुलुपांत बन्द पडलय

तू चावी घेऊन
निघून गेलीयेस

आत्ता ह्यापुढे
डुप्लिकेट
चाव्याच  चाव्या

श्रीधर तिळवे -नाईक

 (चॅनेल : ज्ञ  , लिवइन एंड लिव ऑउट ह्या काव्यफाईलीतुन )