Tuesday, February 20, 2018


चॅनेल बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे नाईक 

सर्वत्र शब्द उगवतायत 

सर्वत्र शब्द उगवतायत
अर्थासहित 
अर्थाविना 
माहितीजडीत 
माहितीने पिडीत 

लोक व्यक्तिमत्व ओततायत सर्वत्र - माझ्या आत - माझ्या बाहेर 
जे खाजगी होतं 
ते सर्वजगी अवतरतय 

एकमेकांच्या खिडक्यातून एकमेकांची घरे न्याहाळत 

दरवाजे उघडे नाहीत 
पण कुणाच्याही दारी जाता होणाऱ्या 
ओळखी आहेत 

माझ्या गर्लफ्रेंडचा फोटो 
ह्या शहरातील प्रत्येकाजवळ आहे 
आणि प्रत्येकाला 
ती माझी एक्स गर्लफ्रेंड  कधी होतीये 
ह्याची प्रतिक्षा आहे 

मी पझेसिव होत नाहीये 
कारण तिला जायाचे असेल 
तर मी तिला थांबवू शकणार नाही 
हे मला माहित आहे 

मी जेवतोय 
जेवताना  फायबर कंटेनचा अंदाज घेतोय  
जेवणातील फॅट्स माझ्या आस्वादावर काटा उभा करतायत 
डायनिंग  टेबलचा ब्रॅण्ड थोडा अनोळखी वाटतोय  

दर सेकंदाला काहीतरी  नाश पावते 
काहीतरी जन्म घेते 

प्रत्येक क्षण प्रचंड मोठा गोंधळ एकत्र करत 
मला वाजवत येतोय 
मला वाजवत जातोय 

मी कादंबरी लिहीत नाही 
मी कागदावर कादंबरी गोळा करतोय 

मी बांधकाम  करत नाहीये 
मी अनेक ठिकाणच्या विटा, भिंती, खिडक्या 
एका घरात एकत्र करतोय 

माझ्या समकालीनांना माझी निर्मितीप्रक्रिया कळत नाहीये 

मी ह्या पृथ्वी  नामक ग्रहाचा कप्तान नाहीये  
ताण आहे 
जो ही पृथ्वी लीड करतोय 
लोड करतोय 

मी वाढतोय 
आणि माझी वाढ 
सर्वत्र नेटवर्कतीये 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )
***


प्रेयसी पोहायला निघून गेल्यावर 

सेलफीश जीन आणि सेल्फिश जीन 
भय आणि लय 
दोघांना खेळवत अंगभर 
मी नव्याने उत्क्रांत होतोय - तुझ्या अभावात 
माझ्या घनगर्द पेशींच्या बायलॉजीकल जाळ्यात 

माझ्या डीएनएची चलनवाढ होतीये  माझ्या सिनिकल  त्वचेत 
माझे शेअरमार्केट जनेटिकली  सेन्सिटीव बनतय डाऊनमार्केट शिवीत 

प्रत्येकजण  स्वतःच्या  ओळखीला चिकटून 
ओळखींची विविधता साजरी करत असताना - मी
सर्वत्र ओळखींना ढील  देत 
अधिकाधिक ढीला ढिलतोय 

हे ढिलतेचे डील तुला मानवत नाही 
म्हणून  मी थोडीच  
माझी  ओळख टाईट करू ?

मराठी म्हणजे काय ? मराठी नवरा म्हणजे  काय ?
हे काय 'जैसे थे '  प्रश्न आहेत काय ?
हे युगच असे आहे कि 
तुम्ही जाणिवपूर्वक नीट पाहता 
अपआकलनाचे गाढव  दामटवू  शकता 
आणि 'व्हॉट डॉंकीवर्क !' म्हणवून घेत 
टाळ्याही  वसूल करू शकता 

ईश्वराला 'गाढव ' बनवणारा घोडेबाजार 
तेजीत आलाय म्हणून 
मी थोडाच ह्या हॉर्सरेसमध्ये पार्टीसिपेट होऊ ?

आयडियालॉजी 'मृत्यू ' साठीच अवेलेबल होतीये 
आणि 'शव ' म्हणून सेलला लागतीये म्हणून 
मी थोडेच 'शिवत्व ' त्यागू

लोक अश्या तऱ्हेने प्रोग्रॅम्ड झालेत 
कि घरबसल्या ग्लोबल होतायत 

त्यांना 'आपला प्रभाव पडणार नाही '
हे इतक्या वेळा कणविंस करण्यात आलंय 
कि ते माझ्या प्रत्येक कृतिला 
'अभिनय ' म्हणून पाहतायत 

माझा नकार 
हा समग्राला होकार आहे 
हे जिथे तुलाच कळत नाहीये 
तिथे 'लोक समजून  घेतील '
ही आशाच पाखंडी नाही का ?

माझ्या आजूबाजूला 'डास ' उडतायत 
आणि 'दास ' डेंगूची शक्यता असूनही 
त्यांच्यात बसतायत  

खोलात जाऊन कुणालाच काही बदलायचं नाहीये 
पण वरवर पोहायला 
प्रत्येकाला अघयावत स्विमींग पूल हवाय 

तू
अनिरुद्धबरोबर पोहायला शिकायला निघून गेलीयेस 
आणि मी माझ्यातला समुद्र  
घरभर मांडून 
मासोळ्या इनोव्हेट करतोय 

त्यांचे  हायब्रीड कलर 
मल्टीफॉर्मल बॉडीशेपस 
नवी  नवी कंझम्पशन्स 

समुद्रातही मार्केट लागलय 
आणि पाणी कल्चरल प्रॅक्टिस म्हणून 
फूड इंडस्ट्री डेवलप करतय 

मी कसा वेगळा आहे 
हे पटवण्याची अहमहिका 
आणि मॅक्झीमम प्रॉफिटचे हेलिकॉप्टर 
आपल्या खिश्यात कसे उतरवता येईल  
ह्याचे मास्टरप्लानस 

मी जागतिकीकरण खातोय 
मी जागतिकीकरण घालतोय 
मी जागतिकीकरण पादतोय  
मी जागतिकीकरण हगतोय 
मी जागतिकीकरण झवतोय 
आणि पुन्हा जागतिकीकरणच जन्माला घालतोय 

एक डेली रुटीन म्हणून 
मी जागतिकीकरणाचा डेली सोप पाहतोय - आपल्या ह्या घरात 

लैंगिकलेला माझा देह - पोकळ 
पोर्नोग्राफीत पोर्नोग्राफ़िकल उभा - तू नाहीयेस

माझा डेली  डोस वहात चाललाय 
नॅचरल / डिजिटलच्या दोन काठांमधून 
आणि समुद्र 
ही कुठली लाट म्हणून 
घरभर '' वासून

श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )

***

इन्टेनसिटी 
मी स्वतःला टोक  काढत काढत 
इन्टेन्स करतोय 
आणि 'तीव्रता' तातडीने लिहितोय 

मी मृत्यू  डब करतोय 
आणि डबिंग करताना 
अवघ्या आयुष्याचा 
इको ऐकतोय 

पोस्टमॉडर्नने नवतेचा अंत घडवला 
मी त्या अंतातून काढता पाय घेऊन 
नवा संत होतोय 
मी जाळे विणतोय 
आणि मास्यांना वाचवतोय 

माझ्या समुद्र इकोफ्रेंडली आहे 

मी स्वतःला म्यूट करत नाही 
पण  वेळ येताच आवश्यक तिथे मौन पाळतो 

ही कविता मी सोडलेले  मौन आहे 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )


***

रिऍक्शन 
कविता कुणाला हवीय ? विशेषतः दीर्घ !
ज्याला त्याला हवीये इफेक्टीव रिऍक्शन 

बहुधा मी ह्या काळातला डिफेक्टीव पीस आहे 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )

***

एक आदर्श आहे 
जो मला बनायचा आहे 
जो  मी आहे वास्तव आहे  

मी स्वतःला लक्ष्यात ठेवत नाही 
माझी स्मृती  फेक आहे 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )
***

नॉर्मल 
माझे पोर्नोग्राफिक नॉर्मल असणे 
तुला सहन होत  नाहीये 

माझ्या आध्यात्माचा हिवाळा 
तुला बर्फाळ वाटतोय 

टेन्शनचे मेडीओकर ढग 
गर्जना  करू लागले 
कि मला मध्यमवर्गीय पाऊस/ केवळ 
झटापट वाटते 

ही फसवणूकीची लॉन्ड्री निरंतर चालूच 

आपल्यात काही नॉर्मल घडणार आहे कि नाही ?

कामवाल्या मावशीने चपात्या खराव केल्या 
आणि त्याने माझ्या कविता माझ्यात मेल्या ?

हे डर्टी लॉजीक कितीकाळ ऐकू बाई ?

मेंदूवर नेम धरशील तर नेम चुकेल 

प्रियकर आहे म्हणून सांगतो 
काळजावर नेम धर
चुकला तरी बरोबर लागेल 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )
***
एक केस चालून येतोय १९९६ 
एक केस चालून येतीये 

हेमंतच्या भयकंप आवाजाचा विस्तार 
भूकंपाचे तुकडे अंगावर आदळतायत 
गाणे शांत होतय गळा गिळून 
श्वास ब्रेकिंग न्यूज देतोय 

"महेश लोहार ह्या कथालेखकाने 
बांधकाम चालू  आहे वर 
केस टाकलीये 
कल्चरल ओबजेक्शनच्या दंतरोगाला बळी पडून "

खालून वर वरून खाली 
नाकात पाणी split होतंय 

पकडू द्यावं कि भूमिगत व्हावं ?

पकडू देण्यात शॉर्य आहे 
की गांडूपणा आहे ?

विचार चेंजेबल डरकाळ्या फोडतोय  
आस्था फोटोसेशन करतीये 

भयाचे मॉडेल बनावे कि लढ्याचे ?
प्रत्येक नवी entry डॅमेज करतीये 

गोंधळाची फोटोकॉपी काढून काढून 
मेंदू  थकतोय

फोनचा ड्रम वाजतोय 
श्वास घेतोय 

दरवाजे सरपटत घर सोडून जातायत 
खिडक्या स्मृतींचे दात घासत आठवणींना फ्लॅश करतायत 

लिव इन रिलेशनशिपमध्ये 
हिडन रिलेशनशिपचा मेडिया  जोर पकडतोय 

contemporary means contradictions 

प्रेयसी धीर गोळा करत बेजार  होतीये  
तिला ह्या प्रकरणातला  तिच्या अस्तित्वाचा पुरावा 
कसा व्हेरिफाय करावा 
हे समजत  नाहीये 

ओवररेटेड पोलीस कधीही दारावर धडकू शकतात 

क्रिमिनल  म्हणजे काय हो भाऊ ?

मंगेश  कॉन्फिडन्सचा रिपोर्ट पुरवतोय 

मी मल्टीकलरचा ब्लॅक अँड व्हाईट  होत चाललोय 

मी स्वतःतच खोळंबून चोथा 
पोलिस चालून येतायत चावण्यासाठी 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )
***

प्रश्न  
मी  . . .  . . . . . . . .  . .  . 
ते . . .  . . . . . .  . .  .  .. .  . . . 
तो .. . . . . . . .  .  .  . . .  .  .  .  . . 
ती . . . . .  . . . . . . . .  .  .  .  .  .  .  .  .  
आपण . .  .  .  .  . . .  .  . .  .  .  . .  .  . 
का पण  ?
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )

***

फॉर्मल 
पोलिस मागावर आहेत 

मी बाथरूममध्ये 
सगळे कपडे काढून नाचतो आहे 

माझे नागडेपण 
युनिफॉर्मल कि मल्टीफॉर्मल ?
कि ट्रान्सफॉर्मल ?
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )***

थॉटकेस  

    कविता केस शोकेस मैं कही कवी ना बन जाऊ तेरे प्यारमे कविता ब्रॅण्ड सन अँड सॅण्ड पोलिस पाठलाग माझ्या कम्प्युटरला हात लावायचा नाही  मित्राचा राग  आग ब्रॅण्डिंगमध्ये जळणारी बाग जाहिरातीतील मुले हीच फुले डिजिटल कॅपिटॅलिझम कॅपिटल- भांडवल देश- ग्लोब मेंदू थकवणारी कमर्शिअल 
समोर स्त्री आहे  कि स्त्रीवाद आहे
विज्ञानाची कामवासना किती वैज्ञानिक ? अस्पृश्यतेचे कोडब्रेकिंग अथक प्रयत्न शूद्र पूर्वी कोण होते अस्पृश्य पूर्वी कोण होते मराठा पूर्वी कोण होते तिळवे  पूर्वी कोण होते देशपांडे पूर्वी कोण होते दिवटे पूर्वी कोण होते आता कोणकोण कोण आहेत सांस्कृतिक बिया  कुठल्या फळात असतात ? मैं कही अरेस्टेड कवि बन जाऊ तेरे प्यारमे कविता ?
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )***

रिअलायझेशन  
गर्दी इतिहास लिहीतीये 

शासन माझ्यावर भूगोल  फेकतय

कविता गणित  शिकतीये 
संशय गर्लफ्रेंड चाचपतोय 
भय आयडेंटी कार्ड फाडतय 
दहशत फॅशन म्हणून पॅशनमध्ये बॉम्ब तयार करतीये 

बातम्या पर्वत चढतायत 
अफवा स्वतःला आधिकाधिक उत्तम बनवतायत 
गॉसिप्स स्वतःचं वजन  वाढवतायत 

मला काहीच  करता येत नाहीये 
मी काहीच करत नाहीये 
मी काहीच नाहीये 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )

***

रेल्वेस्टेशन १९९६ भूमिगत होताना  

पारदर्शक हवामानात कवी काकडतायत 
गंधक आणि गंध ह्यांचा पाठलाग करत 

भूमिगत होण्याचा सिझन सुरु  होतोय 

आजोबा, मामा, बाप आणि आता मी सेकंड टाईम 

भर दिवसा रात्र चमकतीये 

अभिजित टेरिबल फ्रेम सेट करत 
कधी भूत कधी अदभूत 

प्रतीक्षा ही इच्छेच्या जिभेवर धिंगाणा घालतीये 

पोलिस नाहीयेत ना ?
प्रत्येक जण अदमास घेतोय 

रणांगण सेटल होतय माझ्या काळजाच्या मैदानात 
ते काय डिलीवर करतायत मला माहित नाही 

तहानेचा पंचनामा मांडून मी केसचं उत्खनन करतोय  

मर्ढेकर .... पाध्ये .... 
वांड्:मयीन क्रौर्याचे  एक पाऊल पुढे एक पाऊल मागे 

सोसण्यासाठी सर्वच सरसावतोय 
आणि कुणालाही सराव नाही 

एक एक्स्ट्रा स्वगत प्रत्येकात चालू 

रहस्यांच्याही कंटाळा येतो 
फारकाळ ती रटाळपणे चालली की 

पोलिस आमच्या मागावर 
हे रहस्य रटाळ होत चाललंय 

नसलेल्या रक्ताची राजनीती 
सॅडीझम कॅरी आऊट करत 
आत्म्यात काळ्या ढगांच्या घंटा वाजवतीये 

व्हर्च्युअल ट्रॅडीशनलिझमशी पंगा घेतला कि 
हिंदुत्ववादाचा ड्रॅगन चालून येतोच  
गायीचा चेहरा करून
जहाल विषाचे पुशअपस चालूच आहेत 
क्रिमिनल जिममध्ये  
घामही स्पेल टाकतोय कडक पावसाळ्यात 

गावठीपणाचा दरवाजा उघडून 
कोण स्पॉन्सर करतय परंपरेचा बागुलबुवा ?

सोर्सेसची मुडेल चुडैल 
कुठल्या अवघड भावनेत 
माझ्या कवितेने दुखावली जाऊन 
गूढतेची बोबडी काकण वाजवतीये ?

सूर्यालाही ऍक्टिंग करायला लावणारे हे भावनेचे राजकारण 
माझी हत्या करू पाहतंय 
की माझी हत्या कमवून सेटल होऊ पाहतय ?

आधी हुसैन आणि आता मी 
कुठल्या मसाल्याची चिता जळतिये 
सुगरण हातांनी ?

मी भयाचा स्टेजएन्ड नाकारतोय 
फ्रीज झालेल्या रक्तातल्या नद्या नाकारतोय 
गुलामीच्या प्रयोगशाळा आणि बंधनांची डिझायनर कोडस नाकारतोय 

मी सैतानांना पाठ दाखवणार नाही 
आरसा दाखवेन 

एक प्रिमिटिव रिऍक्शन नंगानाच करत 
माझ्यावर चालून येतीये 
आणि मी रेल्वेचे फ्युजन करून 
परंपरेतून पसार होत भूमिगत होतोय 

मी जळतोय 
आणि त्या प्रकाशातून 
माझी कविता 
डिक्शनऱ्या जाळत 
अभंगांचे राऊंड घेतीये 

सनातन्यांनो 
मी ज्वालाग्राही विठ्ठल आहे 
पाठलाग करताना 
सांभाळून 
श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )

***
 
 मुंबई ते पुणे 

अश्लिलता पोर्नोग्राफिक 
अश्लिलता क्रियेटीव 
अश्लिलता रिलीजीयस 

हे जग ईश्वराची पोर्नोग्राफी आहे 
कि ईश्वर पोर्नोग्राफीचे सर्वोत्कृष्ट मॉडेल आहे ?

अश्लिलतेचा दंश माझी कविता 
कि कवितेच्या दंशाने दुःखी झालेल्या मनाने 
माझ्यावर दाखल केलेली अश्लिलता ?

अश्लिलता कुठून सुरु होते 
कुठे संपते ?

हा परंपरेचा घातक प्रसाद कि प्रमाद कि प्रवाह ?
क्रौर्याचे  मोडकळीला आलेले  चटके 
अजूनही भेडसावतायत 
आदिम लंगडीचा हा खेळ 
अजूनही पळणाऱ्याला पाळू पाहतो 

हा महेश नावाचा गृहस्थ आता काय करत असेल 
आपल्या बायकोशी तो आता काय बोलत असेल 
किंवा प्रेयसीशी ?
हत्यारात थांबलेला युगाचा तुकडा 
हत्येच्या सावल्यांचे लाफ्टर 

दुःखाच्या विटांवर विठ्ठल रचायला गेलो 
आणि बांधकामाखाली अडकून पडलो 

विठ्ठल हा रुक्मीणीचे ट्रान्सलेशन आहे 
कि रुक्मिणी विठ्ठलाचे  गर्भाशय आहे ?

मला स्मृतीचा चेहरा आठवतोय 
तिला पाहिलं कि मला माझ्या बहिणीची आठवण येते 
शार्प ग्रामरचा निरागस सप्लाय 

जिला पाहताच पाप नाहीसे व्हावे 
अशी स्त्री आहे कुठे 
ज्ञानदा एक आशीर्वाद मिळालेले 
विस्कळीत स्ट्रक्चर आहे 
तिची ग्राफिकल टंग सदा यंग आणि तंग  

ह्या देशातील राजकीयता फुलांच्या छाताडावरही 
दगड नाचवू शकते 

वाचकच जिथे लेखकांना रचतायत 
त्या युगात 
आपण निर्मितीला केंद्रस्थानी आणण्याच्या धडपडीत  

खटला नेहमीच निर्मात्यावर दाखल होतो 
वाचकावर नाही 
शेवटी आपल्या कवितेची जबाबदारी आपल्यावर 
वाचकांवर नाही 

चौथ्या नवतेचे डेस्पेरेट ब्रॅण्डिंग करण्याचा 
हा तुझा प्रयत्न 
तुझ्यावरच उलटलेला - आरोप एका दोस्ताचा 

काही दोस्त पाण्यासारखे असतात 
उन्हाळ्यात गरम झरे 
थंडीत एकदम बर्फ 
अशांना उन्हाळ्यातच बोलवावे 

पोलिस कवितेच्या आत  दाखल होत नाहीत 
त्यांना आत मरणाची भीती वाटते 

मी घाबरलेलो  नाही 
थोडासा  गोठलोय 

डोळ्यांना अप्रोच सापडत नाहीये 
प्रवास करताना  टनेल्सही टनेल्स 
***

सोर्स 
सोर्स काय ?
विठ्ठलाचा सोर्स काय ?
कवितेचा सोर्स क्काय ?
ऋषीचे कुळ आणि मूळ शोधू नये 
हे तोंडावर नका फेकू 

सोर्सच फेक असेल तर 
सोर्सच इनऍडिक्वेट असेल तर 

प्रवासाचा प्रवास मला दिसतोय
आणि प्रवाहाचा तापही मला होतोय 

ह्या प्रवाहाचा सोर्स काय ?

भक्ताच्या आज्ञेवरून परमेश्वर उभा राहिला नाही काय ?
भक्तानेच परमेश्वर बोलवला नाही काय ?

भक्त हाच सोर्स काय ?
की जो उभा राहिला 
तो भक्तातच आधी ठाण मांडून बसला होता ?
मग जो उभा राहिला 
तो भक्ताचा आतून निघाला होता 
कि भक्ताला बाहेरून भेटायला आला होता ?
सोर्स काय ?
सोर्सच अनरिलायबल असेल तर 
सोर्सच अनबिलीवेबल असेल तर 

माझ्यावर वॉरन्ट निघालंय म्हणून मी हे विचारत नाहीये 
मी फक्त विठ्ठलाची वीट चेक करतोय 
-----------------------------------------------------------

ज्ञ घर, पुणे श्रीधर तिळवे 

सगळी बॉडीच अश्लील बनलीये 
आणि मी सभ्यतेच्या दारात 
क्रिमीनल ढगासारखा 
पाण्याचे  जॅकेट घालून 

सुसंस्कृततेची वीज जिभेत खेळवत प्रत्येकजण लाईटली पेश होतोय 

" हा आपल्या पोरीचा करंट कोण 
ह्याच्या पाठीच्या कानाची रचना काय 
हा दलित टुरिस्ट आहे की काय ?
विठ्ठलाचे मीठ खराब  करणारा हा बेचव आत्मा आहे काय ?"

जाणण्याचा इच्छेचा महासर्प प्रत्येकाच्या  डोळ्यात 
आणि अनुवंशिक अजगाराचा निगोशियेबल प्रतिसाद देत 
कुंडलीला काबूत ठेवत 
मिसफिटिंगचे सेल्फ डिक्लेरेशन देत 
मी पॅसेजमध्ये खोळंबलेला 

गणिती हातांचा बनाव रचणे मला जमत नाहीये 
व्हायोलेशनचे व्हायलंट व्हायोलीन हजार हातांनी 
माझ्या भयाला वाजवत - अवघडत 

आमनेसामने येतोय 
आणि टाळी फक्त एका हातानेच वाजतीये 

संवादाच्या  कुत्रिम तऱ्हा प्रामाणिकपणे नैसर्गिक करण्याचा प्रयत्न 
गुडीगुडी ब्रिजवर 
मुद्रा लोपवत 
संवाद  झोपवत  

रात्र होतीये 
आणि मी काळोखाचा बटाटा खात 
डोळे फुगवत - केसच्या क्रिमीनल ढगातले 
तारे मोजतोय 
***

अंडरवेअर 
मी माझी अंडरवेअर वाळत घालतोय 
ती स्टक होतीये 
कश्याने ते कळत नाहीये 

ती रियॅलिटी आहे कि 
नग्नता ह्या रिऍलिटीवर  मात करण्यासाठी 
माणसाने शोधलेली सररिऍलिटी 

VIP हा तिचा ब्रॅण्ड आहे 
जो माझ्या प्रत्येक अंडरवेअरचा ब्रॅण्ड आहे 

कधीकधी मला शंका येते 
माझे पुल्लिंगही व्हीआयपी असावे 

खरेतर  मी स्टक  झालोय  
आणि ह्या अंडरवेअरच्या सहाय्याने 
त्या स्टकनेसवर मात करण्याचा प्रयत्न करतोय 

माझा हा प्रयत्न अश्लिलतेची दुसरी व्याख्या ठरू शकतो 

माझे पाय नग्न  आहेत 
आणि ज्ञ मला टॉवेल पुरवतीये 

मला वाटतय कि 
मी स्वतःच एक अंडरवेअर आहे 
आणि मला कुणी घातलय ते मात्र माहित  नाही 

मी ओला झालोय 
आणि ज्ञ मला वाळत घालण्यासाठी 
गरम होत 
माझ्या दिशेने येतीये 
***

दोघांना सादर करताना  
आम्हा दोघाचं लग्न झालंय 
आणि आम्हा दोघाचं लग्न झालेलं नाहीये 

तिच्या आरश्यात 'मी ' आहे 
आणि तो 'मी '
'मी ' नाही 
असे मी तिला माझ्या आरशातून सांगतोय 

आमच्या नात्याचा कॉपीराईट 
समाजाकडे घ्यायला आम्ही तयार नाही 
मात्र एकमेकाच्या गांडीवर लाथ मारून 
पळून जाण्याचे स्वातंत्र्य 
आमच्या नात्यात  शाबूत आहे 

तिचे कपडे मी काढतोय 
पण ह्या केसमुळे की काय 
तिची त्वचा ओरबाडून घेण्याची माझी उबळ 
वाऱ्यावर गेलीये 

मोहनरावांच्यात मी अपडेट झालेलो नाहीये 

एक गुदमर आहे 
जी गुडबाय म्हणायला उत्सुक आहे 

मला ह्या घरातून निघायचय   

माझे स्वातंत्र्य अटक करून घेण्यात आहे कि काय ?
***

'शो '  'केस '
एक मनुष्य केसबाहेर 
कपड्यात आहे 
आणि जो केसमध्ये आहे 
तो कपडे काढून 
नग्न चालतो आहे 

जो चालतो आहे त्याला 
जो केसबाहेर आहे तो 
स्वतःच्या कपड्यातून पाहतोय 

जो नग्न आहे 
त्याला 
जो कपड्यात आहे त्याच्यापुढे आणखी एक 
फक्त अंडरपॅन्टीत दिसतोय 

अंडरपॅन्ट काळी आहे 
पण ती काळ्या त्वचेमुळे 
कि मूळचीच काळी असल्याने काळी आहे 
कळत नाहीये 

तिघेही एका शोकेसमध्ये आहेत 
आणि टॉवेल 
ह्या तिघापैकी आपणाला कुणाच्या अंगाला भिडायचय
ह्याचा अदमास  घेत - कायद्यात -
ट्रान्सडान्स करतोय 
***

बीळ  
तिच्या बिळातून उंदीर बाहेर पडतायत 
आणि माझा 
मांजर बनण्यातला इंटरेस्ट- संपलेला 

एक गाडी झाडांवरून प्रवास करतीये 
मात्र तिला 
फुलांचे माईलस्टोन भेटत नाहीयेत 

मॅडोना सापांवरून घसरतीये 
ज्ञानदा शिडीवरून  चढतीये 

हे ड्रॅमेटीक आहे कि थकवणारे ?

श्रीधरः घरी जाऊया का ?
हे घर आपल्यावर प्रेम करत नाही  

ज्ञानदाः आपण अमेरिकेला जाऊया का ?
ही मराठी संस्कृति आपल्यावर प्रेम करत नाही 

आपल्या घरी जाऊन तरी प्रेम भेटेल ह्याची काय गॅरेन्टी 
आणि अमेरिका उद्या जिझसवर असं काही लिहिलं 
तरी गप्प बसणार आहे ?

कायदा ऑप्शनल पेपर नाही ज्ञानदा 
तो कंपलसरी पेपर आहे आयुष्याच्या परीक्षेतला 

आत्ताच तर ताजा होतो  
अचानक कसा  शिळा झालो 
मला तर येशू व्हायचे होते
अचानक कसा खिळा  झालो 

मी तिच्या बिळात  निमूट शिरतोय 
आणि बाहेर जग
मांजर बनून ताटकळत  
***

 श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )
हेमंत दिवटे ह्या मित्रास 
मीच केंद्रस्थानी आहे 
माझ्या जगण्याच्या 

There is no alternative for me 

Death  is textless

I am the biginning, center  & End of my text 

जे क्षणात बदलतय 

क्षण क्षण बदलतोय 

जे बदलतय तेही त्या क्षणाच्या आत बदलतय  
नाहीस होतंय 

फक्त बदलच पास होतोय 
जात्या क्षणाकडून येत्या क्षणाकडे 

इतिहास नाही फक्त हार्ड डिस्क  आहे 
आणि म्हणून तर जगण्यात हार्डसॉफ्ट रिस्क  आहे 

मी तुला हात देत नाही असं तुला वाटतंय 

आपण एकमेकांचे हातच आहोत 

नॅचरॅलिटि , ट्रान्सरिअँलिटी ,  रिअँलिटी ,  सररिअँलिटी
आपल्या  केसमध्ये सर्वच उगवते आहे 
डिजिटॉलिटीच्या अंगाने 

आपण संगणकातच राहायला आलोय 
पोलीस संगणकातच पाठलाग करताय 
विठ्ठल संगणकलेलाच आहे 

फक्त तू मी स्मृता ज्ञानदा आहोत 
जेव्हा आपली दंतकथा होईल 
तेव्हा आपण मरण पावू - जा -
जागण्यात झोपी जा Good Night 


ज्ञानदा - ज्ञानदा ....... 

युरोअमेरिकेला पॅरलल धावेन म्हणत होतो 
तर इस्टच्या कैदेत अनरिलेवंट झालो 
ब्लेडरनर मारायला गेलो तर 
ब्लेंडरनर झालो 

Does Poem matter  ?
Every Poem Is Mistaken Theory 

एका ग्रँड नॅरेटिवचे नवे बांधकाम उभे केले 
पोस्टमॉडर्निझमची गांड मारायला 
तर विटा आपल्याच डोक्यावर पडल्या अक्षतासारख्या 
आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत 
अट्टल अटल झालो 

रिस्क घेतली फियास्को झालो 
गजेंद्रमोक्ष भिरकावला दयेन्द्रमोक्ष झालो 
मी संपूर्ण मेंदूच्या शोधात होतो 
लोकांच्या नजरेत भोंदू भोंदू झालो 

ज्ञानदा
मी तुला खरंच कळलोय का ?

मी खरा कि मी नखरा ?
मी बोच कि मी  बोचरा ?

हा दिला मी तुला 
संपूर्ण साजरा 

शून्याने गिळून टाक

****


हत्ती  

मी प्रायोगिक कविता लिहितो म्हणे
च्यायला 

मी आख्या हत्ती  भाषेत ओततो 
पायाला खांब बांधतो 
कानाला सूप 
शेपटीला दोरखंड बांधतो 

तुमचे बुफे मला अजीर्ण करतात 
मी आयुष्याची खाणावळ करतो

हे सर्व मी ज्ञानदाच्या घरातल्या हत्तीला म्हणतो 
आणि ज्ञानदा विचारतीय 
तो हती ह्या फर्निचरमध्ये मिसफीट वाटतोय ना श्री ?

****


घराच्या दारी 

जगच जिथे लक्षात नाही 
तिथे  जगाचा नकाशा काय लक्षात राहणार ?    

घराचा पत्ता मात्र अचूक ठाऊक होता म्हणून परतलोय 
मीरा रोड स्टेशन अजूनही घोड्यासारखंच धावतंय 
बदलाचे मीठ आसमंत खारट करत अजूनही बनतच आहे 

मी आहेच 
सुंदर, स्वस्त, आणि टिकाऊ 

मी विठ्ठलापासून काहीच शिकलेलो नाही 
तुकारामाची शिकावणी पुन्हा एकदा लावावी म्हणतोय 

गणिताचा धंदा मला कधी जमला नाही
त्यामुळे चूक भूल कळणे अशक्य  

हाडांचे तंतू तंतू पिंजले  मी
पण मणक्याचा शेला कबीरशेला नाही झाला 

त्यामुळे ना विठ्ठल  ना अल्ला 

माझ्या आत  पश्चातापाचा पुरावा आढळेलही
पण तो तात्कालिकेतेच्या कागदावर लिहलेला आढळेल 

ज्ञ,

मला माफ कर 
मी सांडलेले विष ह्या घरापर्यंत चालत आले त्याबद्दल

मी तोंडात येईल ते बोलतो 
माझ्या आत कडवटपणा  आहे 
आणि तो तोंडात  येऊन बोलतोय 

तू स्वतःला फॉरवर्ड करतीयेस कि बॅकवर्ड ?

****




ज्ञ चे ऑफिस, पोलीस आणि ज्ञ चे स्वगत 

श्री ,
तुझ्याभोवती केस फिरतीये 
मी फिरतीये भिती फिरतीये भयाचे केस फिरतायत 

माझ्यात  स्फोट होतायत 
कि माझ्यात बॉम्ब लावले जातायत

आपण अँडल्ट झालोय 
अँडलटरी झालोय 
अँड झालोय 

मरणासन्न संस्कृतिला पावणारा विठ्ठल
आणि त्याने विटेवरी उभी केलेली हि वारकरी संस्कृती 
ती आपली पाठलाग करतीये कि 
आपल्याला बांधकामात बांधून  
आपल्या नात्याची हत्या करतीये 
कळत नाहीये 


माझ्या ऑफीमधले संगणक मरतायत परंपरेत क्लीक होत  
आणि फ्रिज त्यांना ताजे ठेवतायत नवतेज वीज पुरवत 

पोलिसांची इन्कवायरी सुरु आहे 
भिंती फाडल्या जातायत तोंडातल्या तोंडात 
ठावठिकाणाच्या पन्नास दुर्धर   शक्यता आजमावल्या जातायत प्रश्नचाचपणीतून 
हे बरे आहे कि माझा बॉस माझा बाजूने आहे

मला धुक्याची स्वप्ने पडतायत दिवसाढवळ्या 
आणि वास्तवाचे धुके होतंय आमनेसामने दर्पणलीला   खेळत 
संदिग्धतेचे दुग्धाळ शिल्प दस्तक देतय मेंदूच्या खात्रीलायक दरवाज्यावर 
उलटतपासणीची केऑटिक  ट्रीप ट्रॅप लावतीये ऑफिशीयल दरवाज्याचा 

मला आत्महत्या कराविशी वाटतीये 
मला तुझी हत्या कराविशी वाटतीये 

ज्या  नात्याला स्पष्टता नाही 
त्याचे वजन पेलत मी का काळजावे ?


प्रेमबिम ठीक आहे 
पण ग्यारन्टीच्या अटी नसलेल्या ह्या वाटाघाटी सोसत 
मी भावनांचा आदर पोलाईटली का करावा ?

वाळवंटे गोळा करायला 
मी थोडीच हि सिंदबादची सफर पत्करलीये ?

मी नात्याच्या डेडिकेटेड शेवट शोधत होते 
आणि हा आता अनपेक्षित डेड एन्डचा फाटा 

हा आपल्या नात्याचा फायनल कॉल आहे काय ?
हे अचानक उगवलेलले मशरुम
आपल्या नात्यांची शेवटची रूम 
उघडणार आहे का

मला टाळा मारायचा होता 
अन हा कवितेचा घोटाळा माझा दारी 

फ्रस्टेटेड अर्थशात्राचे कांगावे सुरु असताना 
हे कवितेचा गावी जावे ?
तू नेकम्म्या माणसाची नॅशनल जिओग्राफी आहेस 
हे कळल्यानंतरही 
माझी राजधानी तुझ्या काळजात ?

ऑफिसबाहेर स्फोटर्सचा धिंगाणा चालू आणि 
मी हि सेन्सेशनल सेंटीमेंन्ट  कुणाला दाखवू शकत नाहीये म्हणून स्वतःत पडून 

माझ्या काळजातून विमाने उडतायत तुझ्या काळजीची 
आणि लॅण्ड होतायत तुझ्याच निष्काळजी फुलपाखरांवर 

तक्रार आणि प्रेम 
करुणा आणि ब्लेम 

मी मला स्पर्श करतीये गुदमरलेल्या शरीराच्या शेवटच्या बोटाने 
आणि तू आहेस कि माझ्या आत 
पुन्हा नव्याने, आपले नाते लिहीत 

इतक्या जवळूनही 
मला हे कळत नाहीये
पेन मोडलेला आहे कि नवा ?

*****



दिलीप चित्रे  ह्यांचे  घर 

केऑस कपड्यात बांधून 
मी लोकांना फक्त माझे खिसे दाखवतोय 

दुःखाचा मलंग पाहता पाहता पलंग होतोय 

वैशाखाचे सातत्य डिकोड करणारा  पावसाळा 
इतका पाऊस पडूनही 
आपल्या अंगणात निरक्षरतेचा अंगठा दाखवत कोरडा 

चित्र्यांचे  हात उबदार 
पण हालचाल अस्तित्ववादी अलिप्ततेतून भिंत चालवत 

" ही पोरं  काय करतात ते बघू ..... " चा आविर्भाव 
आणि स्पंदने पेटणारी करुणाही - धगधगती पण वयामुळे मलूल 

सैतान सत्यापासून धर्म बनवतोय 
आणि धर्म सैतानाला काबुत  ठेवण्याच्या  प्रयत्नात 
कर्मठ  बनत - कवींच्यावर डाफरतोय 

माझ्या अहंकार इतका कि मी चित्र्यांना दिलीपदादा म्हणत नाही 
हेमंताचा सरळपणा मात्र दादा पकडतोय 

अनपेक्षित ट्वीस्ट अद्यापही अनअँडजेस्टेबल   
आणि पोकळ बबल्स अद्यापही अनसेटल्ड 

हजारो विठ्ठल माझ्यावर चालून येतायत - स्पॉन्सर्ड  केले गेलेले 
आणि मी  शब्दाच्या लाखो वीटा फेकत त्या विटांवर 
त्यांना उभे करण्याच्या प्रयत्न करतोय 

*****



शरद कापूसकर ह्यांची प्रयोगशाळा 

मी इफेक्टवर उभाय 
आणि तपशील एका शिल्पातून दुसऱ्या शिल्पात पास होतायत

इमोशनल मॅनिप्यूलेशनमध्ये  
स्वतःची शुद्धता टिकवणे किती  कठीण आहे 
ह्या मार्केटिंगच्या कॉन्ट्रडीक्टरी काळात 

भंडारे स्टोरीचा भंडारा उधळून नाहीसा होतोय माझ्या डोळ्यातून 
आणि वातावरणाची इन्टीमसी मृण्मय होत 
टॉपलेस चालतीये 

आम्ही फ्रेश आहोत 
आमचे सर्वायवल स्किल पणाला लागलेले 
कापुसकर चालते बोलते इनस्टीक्ट आहेत 
ह्या इनफमैशनएजमध्ये बायस नाही 
असा सर्व सुखी कोण आहे 

लोकांनी कविता ऐकायचं बंद केलंय 
आणि आम्ही इनफर्मेशनला डोक्यातून ढकलत ढकलत 
कविता वाचतोय 

आमच्या आवाजातला गाभारा 
डाटा सेट करून देत नाही 
काहीतरीं आहे जे अजूनही काव्यात्मक आहे 

कापूसकरांचा  फन पोल निरागसतेत जागा आहे 
हेमंतची शुभ्रता जी शिळी झाली होती ताजी होतीये 

शब्दांनी शिल्पे उजळतायत 
आणि तारे  आकाशाचा लिंबू पिळतायत 

जिथे तिथे लिमका आणि त्याची शिल्पे 

*****


शरद कापूसकर -  

कुऱ्हाडीचा दांडा झाड म्हणून उगवलाय 

आम्ही फुले म्हणून उगवतोय 

आम्हाला नावे नका देऊ 

भाषा उमलणे मारते 
आणि सुगंधाना अत्तर म्हणून विकते 

हि जीवघेणी शांतता 
जीव गेला तरी 
जीवात जीव असे तोवर 
टिको
---------------------------------------------------------------------------------------------




 श्रीधर तिळवे नाईक 
( बांधकाम चालू आहे ह्या चॅनेलसीरिजमधील १९९५-९६ साली लिहिलेल्या कवितांच्या कविताफाईलीतून )


मार्च १८
माझा अंत झालाय 

सुरवात आणि शेवट 
नाहीसे झालेत 

भाषा मेलीये 
आणि शरीर सर्वत्र असणंलिये 

आनंद आणि करुणा 

नितळ स्वच्छ 

मळ निर्मळ होऊन 
शून्यात विलीन 

कायमचे तल्लीन 
सर्वशुन्य 
***
श्रीधर तिळवे 
(निर्वाणावेळच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------


जाहीर निषेध श्रीधर तिळवे नाईक 
अश्लील श्रीधर तिळवे अश्लीलतेची कॅम्पेन शॅम्पेन श्रीधर तिळवे 
मल्टिपल अश्लील श्रीधर तिळवे अश्लीलतेचा लूज डेटा श्रीधर तिळवे 
अश्लीलतेची ट्रबल पॉवर श्रीधर तिळवे मूळ डिझाईन च्युत करणारे श्रीधर तिळवे 
अश्लिलता नेवीगेट करून सिम्पल संस्कृतीला कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्शन देणारे श्रीधर तिळवे 
डायरेक्ट बायस निर्माण करून स्टॅन्ड ऑफ ट्रॅजीडी करणारे श्रीधर तिळवे 
इंडियात राहून अमेरिकेची पोर्नोग्राफी पास करणारे  श्रीधर तिळवे 
अडवणाऱ्या रस्त्यांची अश्लील डॉक्युमेंटरी तयार करणारे श्रीधर तिळवे 
ज्यांचे  बायसेप्स थकत नाहीत जे उघड्या छातीवर अश्लीलता गोंडवतात ते श्रीधर तिळवे 
ओबसीन चॅनेलवर शॉपिंग करणारे  श्रीधर तिळवे 

ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो 

आणि सैनिकांना विनंती करतो कि 

कविला पायताणाने मारावे 

दिसताक्षणीच 
***

माफी अम्लीफाय होताना 
हे आयुष्य जे मी माझ्या निरागस पायांनी चालवलं होतं 
केस टाकतय 

ही कविता जी मी माझ्या निर्दोष हातांनी लिहिली होती 
केस  टाकतीये 

हा मित्र जो मी माझ्या काळजापासून बनवला होता 
मला सांगतोय 
कि माफी  माग 
आणि ती तुझ्या हस्ताक्षरात माग 

मला पुरावे सोडायचे नाहीत 
आणि ब्लेम तुझ्यावरच आला पाहिजे 

शब्दांची  छते उडतायत 
आणि आतील अर्थ मुळे शोधतायत 

माझी लिव इन रिलेशनशीप पार्टनर मला सांगतीये 
कि माफी माग 
कल्याण थोडे बंद आहे 
तुझ्या आग्रहाने पूर्ण बंद पडेल 

खिडक्या ऑर्थोडॉक्स हॅट घालून खुणावतायत 

कल्याण बंदचा अर्थ 
हजारो कामगारांची रोजीरोटी बंद 

कवितेचा आकार कवितेनंतर केवढा वाढवावा ?
उपाशी पोटाएवढा ?
फोडल्या  गेलेल्या दुकानांएवढा ?
स्मृतीच्या गर्भाशयाएवढा ?
कवितेच्या डोक्याचा आकार केवढा ?

अश्रू डोळे धुतायत  
आणि ताण तणावांना मालिश  करतायत 
खांद्यावर सदैव बसणारे ढग बरसताच 
उडून  चाललेत 

स्ट्रॅटेजिकली माफीचा कागद दाखवून 
विरोधकांचा कल्याण बंदचा निर्णय फिरवावा 
कोर्टात हजर व्हावे "

मी इन रिलेशन पार्टनरला कळवतोय 
" ही माफी नाही  शत्रूला द्यायचा चकवा आहे 
नंतर तेच करू जे करायचंय "

माझ्या अपरोक्ष एक वेगळाच धोखा प्लान होतोय 
मित्र, लिव्हइन   पार्टनर, तिचा  बॉयफ्रेंड 
तिघेही मला खातायत आणि माझ्याकडून लिहूनही घेतायत 
त्यांना माझी झेरॉक्स वापरायची आहे 
आणि माझी ओरिजनल अवतार घेणार नाही 
ह्याची काळजी घ्यायचीये 

मला सावकाश खाल्ल जातंय 
आणि मला माहित नाही 
कि माझा पेन त्यांची रिलीफ डिश आहे 
जी कागदावर लेआऊट सकट मांडली जातीये 

डेस्क निश्चित झालाय 
फॅक्स मशीन निश्चित झालंय 
कृती कशी करवून घायची 
हेही निश्चित झालंय 

माझी निरागस शव यात्रा 
फुलांत मातम साजरा करत निघालीये 

माझ्या फुफ्फुसांची सिगरेट ओढली जातीये 
कुल कशी संकुल कश 

गनपावडर पुरावे शोधेल म्हणून कुणालाच नकोय 
कवितेच्या पंखांची दंतकथा माझे दात पाडतीये 

मी जखमा पीत लिखाण करतोय 
महाकश्यप माझ्यावरच्या कंपलशनला  हसत 
माझ्यावर झेन झाडतोय 

जांभळ्या बर्फाची दुःखी सावली 
रक्तात स्वतःच शरीर शोधतीये 

ऑर्नामेंटल  शिंका कुशंकांच्या नाकांतून झपाझप 
कारस्थानाचा ऑरा मला दिसतोय
आणि कपटाचा सूक्ष्म ड्रॉफ्टही 

हाताचेच कुणी स्मगलिंग करतय 
असं वाटतंय 
बोटांचा मऊसूत एक्स्ट्रॅक्ट  
अचानक पातळ झालाय 
असं वाटतय  
कवटीत शांततेची ट्रेन बंद पडलीये 
आणि माझ्यातील 'मी' प्रवासी होऊन 
एकमेकात केऑसतायत 
गोंगाटाची बॅट छक्के मारतीये 
आणि एल बी डब्लू ही होतीये 

जे घडतय ते प्रत्यक्षात अस्तित्वात घडत नसेल तर ?
कालिदास खालिदास होऊन प्राण सोडतोय  संशयात 
आणि त्यांच्या वासांची मचूळ चूळ 
मारली जातीये प्रत्येक प्राचीन पेशीवर 
अक्षरे प्राचीन प्रोसेसर्समधून निघतायत मरणघाईत 
आवेग गिळत कुठे चाललाय त्यांचा हा वेग ?

'ज्ञ' नेहमीच दिवसा एक असते रात्री एक 
सकाळी एक असते संध्याकाळी एक 

तिच्या प्रतिमांचा समुद्र फोनवरून मला डायल करत 
तिच्या आवाजातून डीलीवर होतोय 

जो माझा जांभळा आहे तो तिचा जांभळा नाही 
ह्याला स्त्रीवाद तरी काय करणार ?

भाषिक ओब्सेशनची डरकाळी आम्हाला चावते 
हा आमचा कॉमन मुद्दा 
खरंतर त्यालाही संधीवात झालाय 
पण त्याला आम्ही नेटाने चालवतोय 
गुडघे सुजलेत पण त्यांचा अंतिम प्रहर आलेला नाही 

प्रार्थना मला जमत नाहीये 
ज्याचा चेहराच डीफेस आहे 
त्याला ईश्वर काय आणि दगड काय ?

विठ्ठल माझ्यात गरम होऊन घाम काढतोय 
आणि पिण्याच्या पाण्याचा ग्लास - गळ्याच्या अंतरावर उभा असूनही 
मला कवटाळत नाहीये 

बाण  सुटतोय माझ्या कागदावरून 
आणि अस्तित्वाचे धनुष्य 
माझ्यातच मोडून पडतय 

माझ्या दिशेने काहीतरी येतंय - कुजबुजत - कुजबुजत 
पण तो परतलेला बाण आहे कि परतलेला विठ्ठल 
हे ह्या काळ्याकुट्ट अंधारात 
काहीकेल्या कळत नाहीये 

माझे काळीज खतऱ्याच्या विटेवर उभं होत चाललय 
आणि मी स्वतःला तोफेच्या तोंडी  देत 
शिवसेना उडवतोय
***

मी ज्ञानदानासाठी स्वतःलाच आल्टर करतोय 
कि मी ज्ञानदात स्वतःचा आल्टरनेटिव शोधतोय ?

कवितेचा समतोल उडत चाललाय 
आणि मी ज्ञानदात 
माझ्या मेलेल्या पंखानी उडतोय 

नवतेची प्रोसेस रिलेशनल इनटॉक्झीकेशनमधून जायलाच हवी होती का ?

मी सीप बाय सीप 
प्रकाशाची गति पितोय  
आणि मला गिळू पाहणाऱ्या ब्लॅक हॉलला 
काबूत ठेवतोय 


ज्ञानदा हा एक चालता बोलता सुवास आहे 
पण त्यांनाच 
जे तिच्या फुलांचे मूळ शोधण्याच्या मोहात पडत नाहीत 

मी तिच्यात कोसळतानाही सुगंधित आहे 
आणि हा वारा आहे कि 
तिच्या आसपास तिचे अत्तर बनवत 
स्वतःचा कारखाना चालवतोय 

मी गाडीतून उतरतोय 
झाडे जंगलाचा पाठलाग करत ज्ञानदात विलीन  होतायत 

मला आता कळतय 
मला गिळू पाहणाऱ्या ब्लॅक हॉलचा आरंभ 
ज्ञानदापासून सुरु झाला होता
***
क्षणभंगुरी 
अडकून पडल्याचे हे फिलिंग 
पावनखिंडीचे हे फिलिंग 

टेन्शन फलद्रुप होणार नाही म्हणून 
त्याच्यावर डोळे ठेवून  वॉच ठेवण्याचे  हे फिलिंग 

डोळे काढून घेतले जातायत हे फिलिंग 

हे फिलिंग मशीन आहे कि किलिंग मशिन आहे 
असे विचारणारे शंकेखोर  फिलिंग 

नग्नतेचा सुवास टिश्यू पेपरवर नसल्याचे फिलिंग 
फसवणुकीचा फंडा कि अजेंडा 
हे कळत नसल्याचे फिलिंग 

आपण घरी पोहचणार  आहोत का ?

जंगली कुत्रा घेऊन पोहचणार आहोत का ?
जंगली कुत्रा लॉण्ड्रीत जाऊन डोमेस्टिक झाला कि काय ?

हातांचे ठसे पोलिसांच्या तावडीत जाऊ नयेत म्हणून काय करावे ?
कादंबरी हरवलीये पण नेमकी कुठे ?
थेसीस गायब झालाय पण नेमका कुठे ?
आपणास घरी  जाऊन शोध करण्याचा चान्स आहे का ?

हे लाकडाप्रमाणे सॉलीड 
कि पाण्याप्रमाणे लिक्वीड 
कि श्वासाप्रमाणे गॅसीअस ?

डिजिटल ओवरलूक की आऊटलूट ?
संहिता कनफाईन करतीये कि फाईन ?
ग्राहकाने पेमेन्ट टाळावे तशी आपण अटक टाळतोय का ?
रोमिओ अँड ज्युलियट कि इडियट  अँड ज्युलियट ?

मी घरी पोहचेन तेव्हा निघण्यापूर्वीचा होईन की काही भलताच असेन ?
शेकडो क्षण
हजारो क्षण 
लाखो क्षण 
करोडो क्षण 

माझी गांड मारतायत 
आणि मी गाडीत असूनही गाडीबाहेर गिलिंग्जची क्षणभंगुरी साजरी करतोय 
***

योगदान 

केस केसासारखी अवगत माझ्या विठ्ठलत्वचेचा काळाभोर कीस पाडतीये 
कायदा कायदेशीर लोकांची  वाट लावतोय 
हे फक्त मनुष्यप्राण्यांनाच शक्यय 
शब्दासाठी मनुष्य बळी चढवणे 
शब्दात मनुष्य बळी चढवणे शब्दातीत मनुष्य शब्दात  कोंडून बळी चढवणे 
बॉडी जन्मापासूनच निगोशियेबल असते मन तिला गुन्हेगार बनवते आणि स्वतःला अपराधभाव देत स्वतःत जेलरचे उत्पादन करते 
पावित्र्याचा भगवा हंगाम माझ्या रक्तावर वाळू मारतोय 
एक बण्ड आहे जे जखमी होऊनही धावा बनवतय आणि अम्पायर वाट पाहतोय मी कधी आउट होतोय ह्याची त्याचे खुमखुमीबाज  बोट शिट्टी वाजवतय जी फक्त मलाच ऐकू येतीये 
ज्ञ लाजतीये कि लाजेनं मान खाली घालतीये ?

'आपली निवड चुकली ' चा एक छाप तिच्या चेहऱ्यावर 
ती माझा पराभव आहे 
आणि तिला त्याची जाणिव नाही 

मी तिला म्हणतो 'आभार '
ती ह्या सगळ्या केसमधले तिचे योगदान शोधत 
डोळ्यांना गॉगल चढवतीये 
***
रूपांतर 
                         ।।१।।
माझी आई लहानपणी मला विठ्ठल म्हणायची 
विशेषतः रंगाचा उल्लेख आला कि 
'विठ्ठलासारखा काळा '

मी पांढऱ्यावर काळे करत होतो 
तेव्हा मी काय करत होतो ?

माझ्यावर विठ्ठलाचा प्रभाव पडला नाही
पण प्रकाश पडला  

घोगडं तर मलाही पावलं होतं  
मी जन्मावो म्हणून आईने विठ्ठलालाही नवस केला होता 

मात्र तो नवस फेडण्याइतके 
माझे वडील आस्तिक नव्हते 

विठ्ठल दूरवरच्या इतिहासासारखा मी समजून  घेतला 
पण तो मला फीट झाला  नाही 

माझी ओढ थेट निर्गुण होती 
आणि माझी हाडे अभंगांनी कधी भारावली नाहीत  

मला चांगली मुळे कधी लाभली नाहीत 
आणि माझ्या फांद्या 
'माझा मीच शोध  घेईन ' चा अहंकार 
वाजवत राहिल्या 

मी उंच वाढत राहिलो 
आणि माझ्या खाली विठ्ठलाची वीट नव्हती 

नंतर मी कवी  झालो 
आणि कवितेतून विठ्ठलाला भेटत राहिलो 

त्याच्या सगुण लिला माझ्यासाठी संशयास्पद होत्या 
आणि गीतेतील जातिव्यवस्थेचा वर्णव्यवस्थेचा पुरस्कार पाहून 
मी एक दिवस विठ्ठलाला टाकून दिले 

जो देव  अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देत नाही 
त्याच्या मंदिरात प्रवेश करण्याची माझी इच्छा नव्हती 

 विठ्ठल मला मराठीत भेटतच राहिला 
आणि त्याचे काय करायचे हा प्रश्न 
कायमच माझे डोके फोडत राहिला 

दिंडीत एकाही भक्ताची लायकी 
मोक्ष मिळण्याची नव्हती  
आणि तुकाराम  तर कुणीच नव्हता 

मला मुक्ति मिळवणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथतुकाराम हवे होते 
आणि मला भक्त भक्तीचे जॉब बर्क भेटत  होते 

हळूहळू कुणाच्याच आयुष्यात निर्वाण नाही हे मला कळाले 
आणि मी 'पळून गेलेल्या देवावर' कविता लिहिली 
                               ।।२।।
कवितेवर रिऍक्शन आलीये 
आणि मी पुन्हा पुन्हा विचारतोय 
"कुठे चुकले ?"
माझ्या आत जो रडतोय तो भक्त नाहीये 
पण तो रडतोय त्यात sorry  for trouble ही नाहीये 

माझ्या आईला वाईट तर वाटणारच आहे 
पण ती नेहमीप्रमाणे काहीही बोलणार नाही 
मी ऐकणार नाही हे तिला माहित आहे 
पण तिला वाईट वाटणार म्हणून मी रडतो आहे 

माझ्या आईसारख्या किती जणांच्या भावना मी दुखावल्या असतील ?

लिहिताना ह्याचा विचार केला नव्हता 
लिहिताना विठ्ठल डोक्यातही नव्हता 
पण रिऍक्शन आल्यानंतर 
त्या कवितेत मला विचारता 
विठ्ठल  दाखल झालाय 

समाज तुमच्या कवितेत काहीही दाखल करू शकतो 
माश्या अडतायत - काल्पनिक पाण्यावर 
मासे उडतायत - काल्पनिक पाण्यातून काल्पनिक हवेत 
हा मत्सावतार नाहीये 
पण ह्या केसने तो ह्या फिशटॅंकवर दाखल केलाय 

माझी पावले कासवाच्या गतीने चाललेत 
मात्र कासवाचे कवच ह्या केसने हिसकावून घेतलंय 

माझं हृदय डुक्करासारखं लोळतय अंगणात 
आणि चिखलातून एक चिमणी उडून चाललीये 

कॅलेंडरमधून सिंह चालत  येतोय 
आणि माझे पोट फाडून त्यातून कविता बाहेर काढतोय 

बाहेर बळी घेण्यासाठी किती जण उभे आहेत 
मी अंदाज घेतोय 

परशु कोकणातला असला तरी 
मला मारण्यात थोडीच हयगय करणार आहे ?
मला मारण्यासाठी कदाचित रामबाण तयार केला जात असेल 
किंवा पारंपरिक दर्शनाचे सुदर्शन माझी वाट पहात असेल 

मी हतबुद्ध व्हावे म्हणून 
कदाचित नवे कारस्थान शिजवले जात असेल 

पण मी हतबुद्ध होत नाहीये 
मी बुद्ध डोक्याने विचार करतोय 
कसे सुटावे ?
हा माझ्या जगाचा शेवट होऊ शकत नाही 

समुद्रावरून उडी मारेन 
अन पाण्याने व्हायोलिन वाजवेन 

मला अवतार व्हायचे नाही 
कवीचा खरा अवतार कविताच नाही का ?

पलीकडे शेवट असो वा नसो 
अलीकडे मात्र मी एक  नवी सुरवात करू पाहतोय 

मी होतोय नवा 
आणि माझीही नवता 
सगळ्या शक्यता धुडकावत 
मला नवतीये 
***