3
आध्यात्मिक सत्य
मी टीव्हीतून सेकंड हॅण्ड आयुष्य प्राप्त करत जगतोय
आणि पुन्हा फास्ट हॅण्ड आयुष्यात ते सेकंड हॅण्ड ताकदीने वापरतोय
मी रिअलॉजीत अडकत नाही
आणि आयडियालॉजीतही
मी तपशील उभे करतो
आणि सिद्धांतही
मला जगण्याची तंत्रे अवगत आहेत
आणि पांडुरंग सांगवीकरांना मी माझ्या हाताखाली
कामावर ठेवू शकतो
मी तुमचा फालतू अस्तित्ववादी नुसता विचार करणार
आणि जगण्याचा बोभाटा करणारा सिस्कील्ड अस्ताव्यस्त
मध्यमवर्गीय नायक नाही
मी कृती करणारा प्लानर आहे
मी स्पर्शात उतरतो
आणि त्याचे फोटोही काढतो
मी त्वचा विकत घेतो
आणि तिला शूटही करतो
मी तुमच्या मराठी कवेत येणारा माणूसच नव्हे
मी जागतिक हातांनी जग लिहिणारा जगडव्याळ जगदंब
जगलाल कवी आहे
टाका केस करा स्थानबद्ध
एक गोष्ट सांगतो
जगाने जिझसला क्रूसीफाय करून मुक्त झाला
हे आध्यात्मिक सत्य
तेव्हा ... ... ..
***
विठ्ठलसंहिता
Everything is outside the text
Love as well as this thing
विठ्ठलाविषयीची Text हीच
विठ्ठल आणि मी
ह्यांच्या दरम्यानचा अडथळा आहे
कदाचित विठ्ठल हाही Text आहे
आणि जे सत्य आहे
ते विठ्ठलाबाहेर आहे
जी Text स आहेत
त्यांनीच तर ही केस टाकलीये
विठ्ठलाविषयीच्या संहिता मायनस केल्या
तर विठ्ठल कुठे आहे
मला आता असं वाटतय कि
मी विठ्ठलाविषयी लिहून
अकारण त्याला वाढवतो आहे
मी जे लिहितोय
ती कदाचित विठ्ठलाची शेवटची पुरवणी आहे
मला विठ्ठलानेच अरेस्ट केलय
ही केस तर फक्त बहाणा आहे
निघायला हवं -
Textless
***
पोलीस स्टेशनमधून निघताना
मी एक ईश्वर आहे
कैदेत टाकला गेलेला
मी एक केस आहे
ईश्वरावर दाखल केली गेलेली
जे शब्द मी पाळले होते
त्यांची माझ्यावर पाळत आहे
माझी गाणी पडतायत
आणि नाण्यांच्यावर माझ्या अश्लिलतेचा वेध घेणारा
एक कॅमेरा आहे
ही कविताही कधीतरी मारून जाईलच
जिच्यावर केस दाखल झाल्याने
जिवंत राहण्याची जबाबदारी आलीये
विरोधाभासाचे तुकडे
एकमेकात आत्महत्या करतायत
आणि पॉलिश्ड शवे होऊन परततायत - तरंगतायत
त्यांना शांततेचा पिंजरा हवा आहे
आणि शांतता कबुतरांसारखी उडून उडून
स्वतःला झिजवतीये
मला कळत नाहीये
माझ्या भोवताली काय चाललंय
मला इतकंच माहित आहे
ज्या सुऱ्याने माझा गळा कापला
तो सुरा माझी शेवटची आशा होती
***
फोटोकॉपी
मी कविता लिहीलीच नाही
माझ्या फोटोकॉपीने कविता लिहिली
हेमंतने कविता छापलीच नाही
हेमंतने माझ्या फोटोकॉपीने दिलेल्या
कवितेच्या फोटोकॉपीची
फोटोकॉपी छापली
माझ्या फोटोकॉपीने कविता लिहिली तेव्हा
भारतात इंटरनेट आलेच नव्हते
हेमंतने कविता छापली तेव्हा
कवितेत इंटरनेट आले होते
महेश लोहार म्हणतोय कि
श्रीधर तिळवेने कविता लिहिली
हेमंत म्हणतोय कि
श्रीधर तिळवेने कविता लिहिली
वकिल म्हणतोय कि
तू कविता लिहिल्याचे कबूल कर
म्हणजे जमिन ताबडतोब मिळेल
वकिल जजंना सांगतोय माझ्यावतीने
कि मीच बांधकाम चालू आहे
ही कविता लिहिली
मी सुटलोय
माझी फोटोकॉपी न्यायालयात पेन्डिग आहे
***
क्षण १
टाकणाऱ्यालाही कळले नसेल
की तो जी टाकतोय
ती केस आहे
केस डोक्यात गेलेली नाहीये
ती जिथे गेलीये तिथे डोके आहे
अंधार बघायचा नाही
म्हणून लाईट लावणारे भित्रे
काय कमी आहेत ?
पोलिसांची माझ्यावर नजर आहे
म्हणून माझी पोलिसाच्यांवर नजर आहे
मी आरश्याला पाहतोय
लोकांना वाटतंय मी स्वतःला पाहतोय
तुला मला शिक्षा घ्याल
तुमचे क्षण मी कसे फेडणार ?
शासनाकडे स्वतःचे असे घ्यायला क्काय असते ?
कविता
जगाचा समतोल सांभाळते
पण हे जगाला ठाऊक नसते
पण समतोलाला ठाऊक असते
दारात पोलीस
म्हणून पळून जाण्यासाठी मी खिडकी उघडली
तर खिडकीबाहेर असंख्य खिडक्या
केस माझ्यावर आहे कि कवितेवर
मग शिक्षा मला कि कवितेला ?
मी हेमंत बरोबर नाही हेमंतमध्ये आहे
नद्याच घसरतात
आता बाहेरझोप कंटिन्यू आहे
मी कुणाचे दुःस्वप्न तर नाही ?
मला खोलात जायचेच होते
ही तुरुंगाच्या खोलीची शक्यता
मला तयार करतीये
मी नागडा झालोय
अन मला माझ्या कपड्यांची लाज वाटू लागलीये
ह्या शून्यापर्यंत जाण्यासाठी
मी अनंत वेळा एक ते नऊ मोजले
कवी बनल्यानंतर शिल्लक काय राहते ?
***
क्षण २
शब्दाशिवाय जग पोहचवता येत नाही
म्हणून तर कवी झालो
शरीर पळतय
कविता पळतीये का ?
मी केसमधून धावतोय
आणि शेवटी केसच गाठणार आहे
दरवेळी नवे रस्ते
परमनन्ट मार्गदर्शक
काय कामाचा ?
कविता शांत आहे
कारण तिला जे बोलायचे आहे
ते ती बोलून बसलीये
कैदेच्या भीतीने जेवढे पळवले
तेवढे स्वातंत्र्याच्या
आनंदानेही पळवले नव्हते
एकटाच आहे
कवी आहे
ताऱ्यांवर सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आहे
आणि ते अंधारातच जास्त प्रकाशमान दिसतात
ज्ञानदा आणि मी
आणि एकमेकाशी इतके भांडलो
की थकून एकसारखे झालो
नाहीसा करण्याची भीती कुणाला दाखवताय
गर्भ नाहीसा झाला तेव्हाच तर अस्तित्वात आलो
तुम्ही मला मारताय
कि मी आत्महत्या करतोय
तुम्ही मला पकडालही
पण जो पकडाल तो 'मी' असेन का ?
ज्याने कविता लिहिली 'तो ' असेल का ?
मग पकडताय कुणाला ?
आणि शिक्षा कुणाला देताय ?
पळता पळता पळता
इतका पळालो
की मृत्यूत पोहचलो
मी न्यूजमध्ये वाटला गेलो
आणि प्रत्येकवेळी माझ्यातील
काहीतरी मेले
झोपेत जोपर्यंत पोलीस येत नाहीत
तोपर्यंत माझे स्वातंत्र्य अबाधित आहे
भय माझ्यानंतर माझ्यात जन्मले
आणि आज माझ्या वयाचे झाले
मी जोवर जिवंत आहे
तोवर संत आहे
तोवर अनंत आहे
मला मोजू नका
मी पक्षी नाही
पंख आहे
मला बांधू नका
तुम्ही ज्याला चुकीचे वळण म्हणता
तो मी निवडलेल्या मार्गावरचा
मी निवडलेला क्षण होता
सगळे उथळच आहे
मी खोलात गेल्यावर
मला हा शोध लागला
***
क्षण ३
१)
I am
the center - I know
I don't
know
Whether
it's empty or infinite
२)
राजा असहाय्य झालाय
हा शह ही मात
पण बाहेर कि आत ?
३)
भूतकाळ परतले कि
वर्तमानाविरुद्ध क्रांति होते का ?
४)
डोळ्यांना फक्त पुढचे दिसते
माणसांना मागचे
तू डोळा बन
५)
विज्ञानाने मृत्यू कार्यक्षम बनवलाय
हळूहळू मृत्यू वैज्ञानिक होईल
आणि मग वैज्ञानिक कारण देऊन
कुणालाही मारता येईल
६)
मी शक्यतांना घाबरत नाही
पण घाबरण्याच्या शक्यतेला मात्र घाबरतो
७)
धर्माकडे पोस्टमॉडर्निझमवरचा उतारा म्हणून पाहणारे लोक
मी विठ्ठलाकडे ना उतारा म्हणून पहिले
ना उत्तर म्हणून
मला उतारा साफ दिसला
आणि मी घसरगुंडी नाकारली
८)
पोस्टमॉडर्न हीच माया
मी भवसागर पार करून
किनाऱ्यावर नाचत असताना
तुम्ही हि केस टाकलीये
नाचून थकलो कि
किनाऱ्यासकट अरेस्ट होईन
९)
सत्याविषयी संभाषण शक्य आहे
मला पुन्हा पुन्हा मेसेज येतोय
मेसेज वाचताना मी अहिंसक आहे
१०)
विठ्ठल हा तुमचा हेतू नाही
हे तर उघड आहे
विठ्ठल हा हेतू असता तर
तुम्ही विठ्ठलाकडे लक्ष दिले असते
आणि माझ्याकडे दुर्लक्ष्य
तुमचा हेतू काय
कवी कि विठ्ठल ?
११)
कविनी फक्त भावविवश आणि हळवं असावं
ही तुमची अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही
माझे रक्त बुद्धिमान आहे
आणि अश्रू गुरुत्वाकर्षणाचा
मान ठेवत
खाली पडतात
१२)
मी स्वतःला सुधारण्यासाठी
कविता लिहतो
मराठी संस्कृति सुधारण्यासाठी
नाही
मी जितका सुधारतो
तितकी संस्कृती वधारते
१३)
विट गायब आहे
आणि माझे पवित्र बांधकाम
मला बांधतय
ठिकऱ्या ठिकऱ्या उडूनही
मी ठीक झालोय
१४)
मी जन्मजात इंटरनेट आहे
जागोजागी फाटल्यावर मला हे सत्य कळाले
******
अत्तरातील सुगंध वाळवणारे साहस
काय कामाचे ?
एक्सट्रॅऑर्डिनरी होण्यासाठी 'एक्सट्रॉ ' होण्यात कसली हिरोगिरी ?
प्रवास व्हावा म्हणून
थोडेच कुणी भूमीगत होते ?
होमसिकनेस कळावा म्हणून
थोडेच कुणी घर सोडते ?
प्रवास संपवून घरी आलोय म्हणून
घर वेगळे दिसते आहे
कि माझ्या अभावात
घर वेगळे झालंय म्हणून
घर वेगळे दिसते आहे ?
माझ्या आत काय चाललंय
हे तुला समजूनही घ्यायचे नाहीये
तुझ्या डोळ्यात 'मी' नाही
'मी अडगळ' आहे
लोक म्हणतात
प्रवासाने माणूस बदलतो
इथे तर माणूस बदलल्याने प्रवासच बदललेला दिसतोय
'लपव'
मी स्वतःला लपवले
कारण माझ्या मागावर पोलिस होते
तुझ्या मागावर कोण आहे ?
******
भाषा
मी मराठी इंग्लिश लिहितोय
आणि तू मला शुद्ध इंग्लिशवरुन छेडते आहे
तुला अमेरिकन इंग्रजी चालते
पण मराठीयन इंग्रजी बोललो कि तुझी सटकते
तुला काय सांगू
वेकड आणि वोक दोन्ही बरोबर आहे
ड्रंक आणि ड्रॅकण दोन्ही बरोबर आहे
जोवर अरेस्टला आपण रेस्ट म्हणत नाही
क्राईमला राईम
कोर्टला रट
तोवर सगळे ठीकच आहे
ईक करू नको
'ऊलटी' होशील
*******
"प्रेस कॉन्फरन्सला जाण्यापूर्वी"
जे घडतंय त्याविषयी कालांतराने कोणीच बोलणार नाही
आणि मग ते विरून जाईल
हर कोई अपने जिन्स जन्मा
अपनी मौत मरा
जो काटा टोचतोय त्याची फुले होतील
आणि काही तर होतील चक्क डिझायनर्स फ्लावर्स
Desire's Flowers
To Designer 's Flower's
असा निबंधही लिहितील कोमल संशोधनी बोटांनी
" चौथ्या नवतेचा संस्कृतिक डायनामाईट विटेत फुटला
आणि पब्लिकने तिळवेला करमणुकीत कुटला "
" तिळवे ह्यांची उथळ फांदेबाजी
मूळ नाही सापडले
म्हणून तिळवे पडले "
" जी संस्कृती मॉर्डेन नाही म्हणून पोस्टमॉर्डेन आहे
तिच्या पोस्टमॉडर्निझमच्या विरोधात जाऊन
तिळवेनी स्वतःच्या पायावर चौथ्या नवतेचा धोंडा पडून घेतला
नाही काय ?
" डॉग्मा डान्स करत होता म्हणून
तिळवेंनी त्याच्यापुढे भरतनाट्यम केले
थोडक्यात काय वारकरीही नाचले आणि तिळवेही नाचले "
स्टेटमेंटमागून स्टेटमेंट लिहितील
आणि स्टेट रिडिफाईन करतील
पण प्रेस कॉन्फरन्सला जाताना तुला ह्या फ्युचर व्हिजनचा काय फायदा ?
श्रीधरा
लोकांनी आयुष्याला आधीच अर्थ देऊन ठेवलाय
पण लोकांनी तुझ्या आयुष्याला अर्थ देऊन ठेवलाय का ?
तू आयुष्य निवड
आयुष्याच्या अर्थ नाही
काय बोलशील ? प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलशील ?
" ब्रम्ह बदलत नाही म्हणून ते सत्य आहे
कारण सत्य बदलत नाही
ब्रम्ह सतत बदलते म्हणून ते सत्य आहे
कारण सत्य सतत बदलते
म्हणून जे आहे ते सत्य नाही "
मी म्हणतो म्हणून ब्रम्ह बदलते
मी म्हणतो म्हणून ब्रम्ह बदलत नाही
मी म्हणतोय तोवर ब्रम्ह अस्तित्वात नाही
मी सतत काही ना काही म्हणतोय
कदाचित ब्रम्ह शाबूत ठेवण्याची ही धडपड आहे
मी ब्रम्हंतोय - असं प्रेस कॉन्फरन्समध्ये उपनिषदशील
मी इनोसंटली 'कविता लिहली' असा बाळबोध होशील ?
काय बोलशील श्रीधरा काय बोलशील ?
इनोसंटने कविता लिहिली "
असे म्हणशील
कि इनोसन्सने " कविता लिहली "
असे म्हणशील
कि " इनोसन्सचा स्पेशल इफेक्ट ही कविता आहे " असे म्हणशील
कि कविता चूक पण आहे बरोबर पण आहे दोन्ही आहे
म्हणून तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही " असे पुट्पुटशील
काय बोलशील ? श्रीधरा काय बोलशील ?
ईश्वराचा जगाचा कंटाळा आला म्हणून कविता लिहिली " असे
कि " बोलण्याबाबत मी आदिवासी आहे " असे
कि " मी माझ्या कविता लिहितो आणि बोचतोही "
" मी माझ्या कविता वाचण्यासाठी लिहितो का? " असे विचारशील
कि " बांधकाम चालू आहे मी लिहली होती ? मला तर तिची
एकही ओळ आठवत नाही तुम्हाला आठवते का ? " असा प्रतिप्रश्न करशील
श्रीधरा काय म्हणशील प्रेसकॉन्फरन्समध्ये काय विचारशील
" ज्यांनी मॉडर्न लिहले ते तरुण होते
ज्यांनी पोस्टमॉडर्न लिहिले ते म्हातारे होते
मी लहान मुलाच्या उत्साहाने लिहितो
आणि मध्यमवयीन मेंदूने लिहितो
मला तुम्ही कुठल्या कॅटेगरीत टाकता ? "असा हल्ला चढवशील
कि " माझे डोळेच भास आहेत
आणि माझा डोळ्यांच्यावर विश्वास आहे "
असे बरळत राहशील
कि " ही कविता लिहिली तेव्हा बांधकामे चालू होती
आता तर आख्खी नवी मुंबई बांधकामून तयार झालीये
तेव्हा फ्लॅशबॅक टाकण्यात काय अर्थ "
असे म्हणून फास्ट फॉरवर्ड होशील
कि " मी पोलीसाच्या हाती पडलो आहे
मी काय आहे हे पोलीसांच्या हाताला विचार "
असे म्हणून पोलीसांकडे बोट दाखवशील
कि " मी संशयाबाबत संशयी आहे "
असा कडेलोट करशील
कि " तुम्ही सर्व विठ्ठल अस्तित्वात आहे असे गृहित धरून का बोलता ?
अपमान वगैरे त्याच व्यक्तीचा होतो
जी अस्तित्वात असते
माझ्याशी लढायचे असेल तर विठ्ठल अस्तित्वात आहे
हे तुम्हाला प्रथम सिद्ध करावे लागेल
जो काल्पनिक आहे त्याचा काय सम्मान
काय अपमान ? "
असा थेट लोकायती हल्ला चढवशील
प्रेस कॉन्फरन्समध्ये
काय पुट्पुटशील
श्रीधरा
प्रेस कॉन्फरन्समध्ये
काय बरळशील
" कविता वाचतोय कोण ? टिव्हीने सर्वच खोडून टाकलय "
अशी निराशा व्यक्त करशील
कि " ही केस विठ्ठलाला सिम्पलीफाय करण्याचा प्रयत्न आहे "
असा आरोप करशील
कि " कवि प्रकाशवेगापेक्षा
अधिक वेगाने पाहतो
म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी
पण कवि जेव्हा प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने पाहतो
तेव्हा पाहण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा प्रकाश असतो का ?
असे काही तरी सायंटिफिक रोमँण्टीक मिसलिड करशील
श्रीधरा
काहीही करू नको
फक्त प्रश्न विचार
" तुम्ही माझी कविता प्रेमाने वाचली आहे काय ? "
*********
No comments:
Post a Comment