Monday, March 5, 2018

चॅनेल बांधकाम चालू आहे 2 श्रीधर तिळवे नाईक
----------------------------------------------------------------------------------------------------------------------


जाहीर निषेध श्रीधर तिळवे नाईक 
अश्लील श्रीधर तिळवे अश्लीलतेची कॅम्पेन शॅम्पेन श्रीधर तिळवे 
मल्टिपल अश्लील श्रीधर तिळवे अश्लीलतेचा लूज डेटा श्रीधर तिळवे 
अश्लीलतेची ट्रबल पॉवर श्रीधर तिळवे मूळ डिझाईन च्युत करणारे श्रीधर तिळवे 
अश्लिलता नेवीगेट करून सिम्पल संस्कृतीला कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्शन देणारे श्रीधर तिळवे 
डायरेक्ट बायस निर्माण करून स्टॅन्ड ऑफ ट्रॅजीडी करणारे श्रीधर तिळवे 
इंडियात राहून अमेरिकेची पोर्नोग्राफी पास करणारे  श्रीधर तिळवे 
अडवणाऱ्या रस्त्यांची अश्लील डॉक्युमेंटरी तयार करणारे श्रीधर तिळवे 
ज्यांचे  बायसेप्स थकत नाहीत जे उघड्या छातीवर अश्लीलता गोंडवतात ते श्रीधर तिळवे 
ओबसीन चॅनेलवर शॉपिंग करणारे  श्रीधर तिळवे 

ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो 

आणि सैनिकांना विनंती करतो कि 

कविला पायताणाने मारावे 

दिसताक्षणीच 
***

माफी अम्लीफाय होताना 
हे आयुष्य जे मी माझ्या निरागस पायांनी चालवलं होतं 
केस टाकतय 

ही कविता जी मी माझ्या निर्दोष हातांनी लिहिली होती 
केस  टाकतीये 

हा मित्र जो मी माझ्या काळजापासून बनवला होता 
मला सांगतोय 
कि माफी  माग 
आणि ती तुझ्या हस्ताक्षरात माग 

मला पुरावे सोडायचे नाहीत 
आणि ब्लेम तुझ्यावरच आला पाहिजे 

शब्दांची  छते उडतायत 
आणि आतील अर्थ मुळे शोधतायत 

माझी लिव इन रिलेशनशीप पार्टनर मला सांगतीये 
कि माफी माग 
कल्याण थोडे बंद आहे 
तुझ्या आग्रहाने पूर्ण बंद पडेल 

खिडक्या ऑर्थोडॉक्स हॅट घालून खुणावतायत 

कल्याण बंदचा अर्थ 
हजारो कामगारांची रोजीरोटी बंद 

कवितेचा आकार कवितेनंतर केवढा वाढवावा ?
उपाशी पोटाएवढा ?
फोडल्या  गेलेल्या दुकानांएवढा ?
स्मृतीच्या गर्भाशयाएवढा ?
कवितेच्या डोक्याचा आकार केवढा ?

अश्रू डोळे धुतायत  
आणि ताण तणावांना मालिश  करतायत 
खांद्यावर सदैव बसणारे ढग बरसताच 
उडून  चाललेत 

स्ट्रॅटेजिकली माफीचा कागद दाखवून 
विरोधकांचा कल्याण बंदचा निर्णय फिरवावा 
कोर्टात हजर व्हावे "

मी इन रिलेशन पार्टनरला कळवतोय 
" ही माफी नाही  शत्रूला द्यायचा चकवा आहे 
नंतर तेच करू जे करायचंय "

माझ्या अपरोक्ष एक वेगळाच धोखा प्लान होतोय 
मित्र, लिव्हइन   पार्टनर, तिचा  बॉयफ्रेंड 
तिघेही मला खातायत आणि माझ्याकडून लिहूनही घेतायत 
त्यांना माझी झेरॉक्स वापरायची आहे 
आणि माझी ओरिजनल अवतार घेणार नाही 
ह्याची काळजी घ्यायचीये 

मला सावकाश खाल्ल जातंय 
आणि मला माहित नाही 
कि माझा पेन त्यांची रिलीफ डिश आहे 
जी कागदावर लेआऊट सकट मांडली जातीये 

डेस्क निश्चित झालाय 
फॅक्स मशीन निश्चित झालंय 
कृती कशी करवून घायची 
हेही निश्चित झालंय 

माझी निरागस शव यात्रा 
फुलांत मातम साजरा करत निघालीये 

माझ्या फुफ्फुसांची सिगरेट ओढली जातीये 
कुल कशी संकुल कश 

गनपावडर पुरावे शोधेल म्हणून कुणालाच नकोय 
कवितेच्या पंखांची दंतकथा माझे दात पाडतीये 

मी जखमा पीत लिखाण करतोय 
महाकश्यप माझ्यावरच्या कंपलशनला  हसत 
माझ्यावर झेन झाडतोय 

जांभळ्या बर्फाची दुःखी सावली 
रक्तात स्वतःच शरीर शोधतीये 

ऑर्नामेंटल  शिंका कुशंकांच्या नाकांतून झपाझप 
कारस्थानाचा ऑरा मला दिसतोय
आणि कपटाचा सूक्ष्म ड्रॉफ्टही 

हाताचेच कुणी स्मगलिंग करतय 
असं वाटतंय 
बोटांचा मऊसूत एक्स्ट्रॅक्ट  
अचानक पातळ झालाय 
असं वाटतय  
कवटीत शांततेची ट्रेन बंद पडलीये 
आणि माझ्यातील 'मी' प्रवासी होऊन 
एकमेकात केऑसतायत 
गोंगाटाची बॅट छक्के मारतीये 
आणि एल बी डब्लू ही होतीये 

जे घडतय ते प्रत्यक्षात अस्तित्वात घडत नसेल तर ?
कालिदास खालिदास होऊन प्राण सोडतोय  संशयात 
आणि त्यांच्या वासांची मचूळ चूळ 
मारली जातीये प्रत्येक प्राचीन पेशीवर 
अक्षरे प्राचीन प्रोसेसर्समधून निघतायत मरणघाईत 
आवेग गिळत कुठे चाललाय त्यांचा हा वेग ?

'ज्ञ' नेहमीच दिवसा एक असते रात्री एक 
सकाळी एक असते संध्याकाळी एक 

तिच्या प्रतिमांचा समुद्र फोनवरून मला डायल करत 
तिच्या आवाजातून डीलीवर होतोय 

जो माझा जांभळा आहे तो तिचा जांभळा नाही 
ह्याला स्त्रीवाद तरी काय करणार ?

भाषिक ओब्सेशनची डरकाळी आम्हाला चावते 
हा आमचा कॉमन मुद्दा 
खरंतर त्यालाही संधीवात झालाय 
पण त्याला आम्ही नेटाने चालवतोय 
गुडघे सुजलेत पण त्यांचा अंतिम प्रहर आलेला नाही 

प्रार्थना मला जमत नाहीये 
ज्याचा चेहराच डीफेस आहे 
त्याला ईश्वर काय आणि दगड काय ?

विठ्ठल माझ्यात गरम होऊन घाम काढतोय 
आणि पिण्याच्या पाण्याचा ग्लास - गळ्याच्या अंतरावर उभा असूनही 
मला कवटाळत नाहीये 

बाण  सुटतोय माझ्या कागदावरून 
आणि अस्तित्वाचे धनुष्य 
माझ्यातच मोडून पडतय 

माझ्या दिशेने काहीतरी येतंय - कुजबुजत - कुजबुजत 
पण तो परतलेला बाण आहे कि परतलेला विठ्ठल 
हे ह्या काळ्याकुट्ट अंधारात 
काहीकेल्या कळत नाहीये 

माझे काळीज खतऱ्याच्या विटेवर उभं होत चाललय 
आणि मी स्वतःला तोफेच्या तोंडी  देत 
शिवसेना उडवतोय
***

मी ज्ञानदानासाठी स्वतःलाच आल्टर करतोय 
कि मी ज्ञानदात स्वतःचा आल्टरनेटिव शोधतोय ?

कवितेचा समतोल उडत चाललाय 
आणि मी ज्ञानदात 
माझ्या मेलेल्या पंखानी उडतोय 

नवतेची प्रोसेस रिलेशनल इनटॉक्झीकेशनमधून जायलाच हवी होती का ?

मी सीप बाय सीप 
प्रकाशाची गति पितोय  
आणि मला गिळू पाहणाऱ्या ब्लॅक हॉलला 
काबूत ठेवतोय 


ज्ञानदा हा एक चालता बोलता सुवास आहे 
पण त्यांनाच 
जे तिच्या फुलांचे मूळ शोधण्याच्या मोहात पडत नाहीत 

मी तिच्यात कोसळतानाही सुगंधित आहे 
आणि हा वारा आहे कि 
तिच्या आसपास तिचे अत्तर बनवत 
स्वतःचा कारखाना चालवतोय 

मी गाडीतून उतरतोय 
झाडे जंगलाचा पाठलाग करत ज्ञानदात विलीन  होतायत 

मला आता कळतय 
मला गिळू पाहणाऱ्या ब्लॅक हॉलचा आरंभ 
ज्ञानदापासून सुरु झाला होता
***
क्षणभंगुरी 
अडकून पडल्याचे हे फिलिंग 
पावनखिंडीचे हे फिलिंग 

टेन्शन फलद्रुप होणार नाही म्हणून 
त्याच्यावर डोळे ठेवून  वॉच ठेवण्याचे  हे फिलिंग 

डोळे काढून घेतले जातायत हे फिलिंग 

हे फिलिंग मशीन आहे कि किलिंग मशिन आहे 
असे विचारणारे शंकेखोर  फिलिंग 

नग्नतेचा सुवास टिश्यू पेपरवर नसल्याचे फिलिंग 
फसवणुकीचा फंडा कि अजेंडा 
हे कळत नसल्याचे फिलिंग 

आपण घरी पोहचणार  आहोत का ?

जंगली कुत्रा घेऊन पोहचणार आहोत का ?
जंगली कुत्रा लॉण्ड्रीत जाऊन डोमेस्टिक झाला कि काय ?

हातांचे ठसे पोलिसांच्या तावडीत जाऊ नयेत म्हणून काय करावे ?
कादंबरी हरवलीये पण नेमकी कुठे ?
थेसीस गायब झालाय पण नेमका कुठे ?
आपणास घरी  जाऊन शोध करण्याचा चान्स आहे का ?

हे लाकडाप्रमाणे सॉलीड 
कि पाण्याप्रमाणे लिक्वीड 
कि श्वासाप्रमाणे गॅसीअस ?

डिजिटल ओवरलूक की आऊटलूट ?
संहिता कनफाईन करतीये कि फाईन ?
ग्राहकाने पेमेन्ट टाळावे तशी आपण अटक टाळतोय का ?
रोमिओ अँड ज्युलियट कि इडियट  अँड ज्युलियट ?

मी घरी पोहचेन तेव्हा निघण्यापूर्वीचा होईन की काही भलताच असेन ?
शेकडो क्षण
हजारो क्षण 
लाखो क्षण 
करोडो क्षण 

माझी गांड मारतायत 
आणि मी गाडीत असूनही गाडीबाहेर गिलिंग्जची क्षणभंगुरी साजरी करतोय 
***

योगदान 

केस केसासारखी अवगत माझ्या विठ्ठलत्वचेचा काळाभोर कीस पाडतीये 
कायदा कायदेशीर लोकांची  वाट लावतोय 
हे फक्त मनुष्यप्राण्यांनाच शक्यय 
शब्दासाठी मनुष्य बळी चढवणे 
शब्दात मनुष्य बळी चढवणे शब्दातीत मनुष्य शब्दात  कोंडून बळी चढवणे 
बॉडी जन्मापासूनच निगोशियेबल असते मन तिला गुन्हेगार बनवते आणि स्वतःला अपराधभाव देत स्वतःत जेलरचे उत्पादन करते 
पावित्र्याचा भगवा हंगाम माझ्या रक्तावर वाळू मारतोय 
एक बण्ड आहे जे जखमी होऊनही धावा बनवतय आणि अम्पायर वाट पाहतोय मी कधी आउट होतोय ह्याची त्याचे खुमखुमीबाज  बोट शिट्टी वाजवतय जी फक्त मलाच ऐकू येतीये 
ज्ञ लाजतीये कि लाजेनं मान खाली घालतीये ?

'आपली निवड चुकली ' चा एक छाप तिच्या चेहऱ्यावर 
ती माझा पराभव आहे 
आणि तिला त्याची जाणिव नाही 

मी तिला म्हणतो 'आभार '
ती ह्या सगळ्या केसमधले तिचे योगदान शोधत 
डोळ्यांना गॉगल चढवतीये 
***
रूपांतर 
                         ।।१।।
माझी आई लहानपणी मला विठ्ठल म्हणायची 
विशेषतः रंगाचा उल्लेख आला कि 
'विठ्ठलासारखा काळा '

मी पांढऱ्यावर काळे करत होतो 
तेव्हा मी काय करत होतो ?

माझ्यावर विठ्ठलाचा प्रभाव पडला नाही
पण प्रकाश पडला  

घोगडं तर मलाही पावलं होतं  
मी जन्मावो म्हणून आईने विठ्ठलालाही नवस केला होता 

मात्र तो नवस फेडण्याइतके 
माझे वडील आस्तिक नव्हते 

विठ्ठल दूरवरच्या इतिहासासारखा मी समजून  घेतला 
पण तो मला फीट झाला  नाही 

माझी ओढ थेट निर्गुण होती 
आणि माझी हाडे अभंगांनी कधी भारावली नाहीत  

मला चांगली मुळे कधी लाभली नाहीत 
आणि माझ्या फांद्या 
'माझा मीच शोध  घेईन ' चा अहंकार 
वाजवत राहिल्या 

मी उंच वाढत राहिलो 
आणि माझ्या खाली विठ्ठलाची वीट नव्हती 

नंतर मी कवी  झालो 
आणि कवितेतून विठ्ठलाला भेटत राहिलो 

त्याच्या सगुण लिला माझ्यासाठी संशयास्पद होत्या 
आणि गीतेतील जातिव्यवस्थेचा वर्णव्यवस्थेचा पुरस्कार पाहून 
मी एक दिवस विठ्ठलाला टाकून दिले 

जो देव  अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देत नाही 
त्याच्या मंदिरात प्रवेश करण्याची माझी इच्छा नव्हती 

 विठ्ठल मला मराठीत भेटतच राहिला 
आणि त्याचे काय करायचे हा प्रश्न 
कायमच माझे डोके फोडत राहिला 

दिंडीत एकाही भक्ताची लायकी 
मोक्ष मिळण्याची नव्हती  
आणि तुकाराम  तर कुणीच नव्हता 

मला मुक्ति मिळवणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथतुकाराम हवे होते 
आणि मला भक्त भक्तीचे जॉब बर्क भेटत  होते 

हळूहळू कुणाच्याच आयुष्यात निर्वाण नाही हे मला कळाले 
आणि मी 'पळून गेलेल्या देवावर' कविता लिहिली 
                               ।।२।।
कवितेवर रिऍक्शन आलीये 
आणि मी पुन्हा पुन्हा विचारतोय 
"कुठे चुकले ?"
माझ्या आत जो रडतोय तो भक्त नाहीये 
पण तो रडतोय त्यात sorry  for trouble ही नाहीये 

माझ्या आईला वाईट तर वाटणारच आहे 
पण ती नेहमीप्रमाणे काहीही बोलणार नाही 
मी ऐकणार नाही हे तिला माहित आहे 
पण तिला वाईट वाटणार म्हणून मी रडतो आहे 

माझ्या आईसारख्या किती जणांच्या भावना मी दुखावल्या असतील ?

लिहिताना ह्याचा विचार केला नव्हता 
लिहिताना विठ्ठल डोक्यातही नव्हता 
पण रिऍक्शन आल्यानंतर 
त्या कवितेत मला विचारता 
विठ्ठल  दाखल झालाय 

समाज तुमच्या कवितेत काहीही दाखल करू शकतो 
माश्या अडतायत - काल्पनिक पाण्यावर 
मासे उडतायत - काल्पनिक पाण्यातून काल्पनिक हवेत 
हा मत्सावतार नाहीये 
पण ह्या केसने तो ह्या फिशटॅंकवर दाखल केलाय 

माझी पावले कासवाच्या गतीने चाललेत 
मात्र कासवाचे कवच ह्या केसने हिसकावून घेतलंय 

माझं हृदय डुक्करासारखं लोळतय अंगणात 
आणि चिखलातून एक चिमणी उडून चाललीये 

कॅलेंडरमधून सिंह चालत  येतोय 
आणि माझे पोट फाडून त्यातून कविता बाहेर काढतोय 

बाहेर बळी घेण्यासाठी किती जण उभे आहेत 
मी अंदाज घेतोय 

परशु कोकणातला असला तरी 
मला मारण्यात थोडीच हयगय करणार आहे ?
मला मारण्यासाठी कदाचित रामबाण तयार केला जात असेल 
किंवा पारंपरिक दर्शनाचे सुदर्शन माझी वाट पहात असेल 

मी हतबुद्ध व्हावे म्हणून 
कदाचित नवे कारस्थान शिजवले जात असेल 

पण मी हतबुद्ध होत नाहीये 
मी बुद्ध डोक्याने विचार करतोय 
कसे सुटावे ?
हा माझ्या जगाचा शेवट होऊ शकत नाही 

समुद्रावरून उडी मारेन 
अन पाण्याने व्हायोलिन वाजवेन 

मला अवतार व्हायचे नाही 
कवीचा खरा अवतार कविताच नाही का ?

पलीकडे शेवट असो वा नसो 
अलीकडे मात्र मी एक  नवी सुरवात करू पाहतोय 

मी होतोय नवा 
आणि माझीही नवता 
सगळ्या शक्यता धुडकावत 
मला नवतीये 
***


पुण्याहून परतताना आपण 'पुण्य'लो नाही 
ह्याचे दुःख करावे कि आनंद साजरा करावा ?

मी 'मुंबई'तोय 

माझा 'कोल्हापूर'लेला आत्मा 
अद्यापही विठ्ठललेला नाही 
रुक्मीणलेली बॉडी 
स्वतःचा थांगपत्ता  लागू देत नाहीये 

माझी गांड लागलीये 
आणि मी अजूनही झुकून 
'मराठी'ळलेलो व्हायला  तयार नाही 

आपण आयुष्यभर वाळीत टाकले जाणार 
हे तर उघड आहे 
'पंढरपुरणे'टाळून कोण मराठी कवी झालाय ?

एका अर्थाने बरेच झाले 
परंपरा 
निखळून  पडली 

आता विश्वाचिये  आर्त 
मुंबईच्या 'अरबी' समुद्रात खारट घोडा होऊन प्रकटते 
कि आख्खा समुद्र गोड करून 
मेंदूतील 'मीरा' रोडवरचा मोगरा फुलवते 
ते पहायचे 

मी हळूहळू 'गोव' ला जातोय 
आणि माझी इंटरकनेक्टिविटी 
'ग्लोब'लतीये 
***

आदिल जसावाला ह्यांचे घर 

एक सफेदपोश पॉश माणूस 
ह्याचे काळीजही पांढरे असेल 
किंवा काळजाच्या जागी ससा असेल 

इतक्या चकाचक चकचकीतपणाची आपणाला सवय नाही 

इंग्लिशमध्ये लिहिणारा कवी 
इतक्या  श्रीमंतीतही कविता लिहितोय 
म्हणजे गांडीत  किडाच मोठा असायला हवा 

माझ्या गावरणपणामुळे तो अवघडतोय 

माझी कोल्हापुरी मिरची 
आणि त्याची कॉस्मो बुर्जी 
संवाद मूळ धरत नाहीये 
पण फुलांचा पाठलाग चालूच आहे 

भूमिगत कवींना इतकी पॉश लोकॅलिटी प्राप्त होणार असेल तर 
भूमिगत होणे म्हणजे काय फक्त घर पालटत चालणे ?

आदिलता दारू हवीये 
मी पीत नाही म्हंटल्यावर प्रोफेशनल आश्चर्य 

फुलपाखरू उडाल्याने पुढील घटना घडल्या 
ह्या सिद्धांतावर आमचे वाद 
त्याला ही  पोस्टमॉडर्न मॅनेजमेंटची बतावणी वाटतीये 
आणि  मी ह्या सिद्धांताला केऑसला ओपन स्पेस द्यायला हवी 
ह्या आग्रहात 

दोघेही  पोस्टमॉडर्नच्या विरोधात 
तो मॉडर्न म्हणून 
तर मी अँटीपोस्टमॉडर्निस्ट म्हणून 

माझ्या कवितेतून 
अश्लीलतेचे फुलपाखरू उडाले म्हणून तर आपण 
ह्या  आदिल जसवालाच्या केऑटिक घरात 
पॉश हातांनी 
भूकंप हाताळतोय 

हेमंतला आमचा वाद कळत नाहीये 
पण तो सोशिकपनणे कान टिकवून - श्रवणबाळ 

कविता सर्वत्र मरण पावलीये 
म्हणून कवि काळजातल्या काळजात 
स्वतःशी बोलतायत 

ह्या केसने हे स्वतःशी बोलण्याचे स्वातंत्र्य 
हिसकावून घेतलंय

पोस्टमॉडर्नने अर्थ हिसकावला 
दहशतीने भाषा 

एका शांततेची शतपावली 
आम्हाला चालवतीये 

वाचक ज्यांना कविता सहन झालेली  नाहीये 
मला मारण्यासाठी स्वप्नात येतायत 
आणि मी झोपेतून जागा होत 
स्वतःला जिवंत ठेवतोय 

श्रद्धेची सूरी माझी शीर काटू पाहतिये 
आणि मी काळजाला बुद्धिमान करत 
रक्तपुरवठा वाढवतोय 

रिलीजीयस फेथ बेसलेस फेथ फेथ फॉर फेथ 
विचार करता स्वतःला अस्तित्वात आणण्याची श्रद्धेची सत्ताधडपड 

मूल्यव्यवस्था नाकारायला काय अक्कल लागते ?

मी कल्पनाशक्तिचा वापर 
मूल्यांच्या  करुणेची धार वाढवण्यासाठी केला 
हा माझा  गुन्हा आहे काय ?

मोकाट सुटलेली भाषा 
मी मुकाट्याने सहन केली नाही 
ही माझी चूक झाली काय ?

मी 
सत 
चित 
आनंद 
शिव 
शक्ति 
क्रिया 
काळ 
आकाश  

सर्वांचीच पुनर्स्थापना करतोय 
ही माझी करणी 
विपरीत आहे काय ?

मी वेडाचे टोक गाठतो 
शहाणपणा अबाधित ठेवून 

मी ह्याला कौशल्य समजतो 
तुम्ही गावरनपणा 

वाद्ये  एकत्रित आणायची 
ती गाणे बांधण्यासाठी 
केऑस वाजण्यासाठी नाही 

मी केऑसही बांधकाम करून 
एकसंध वाजतोय 

हे इंटरनेटिंगचे बांधकाम 
हे इंटरसेटिंगचे बांधकाम 

मी फक्त वाद्ये  वाजवत नाहीये 
हात वाजवतोय 
काळीज वाजवतोय, मेंदू वाजवतोय 
आख्खा मनुष्य वाजवतोय 

मी विसंवादही इंटरनेटतोय - व्हॉयेबल करतोय 
मी विरचनाही बांधकामतोय - व्हॉयेबल करतोय 
मी टबूही स्पीन करतोय- विकेट काढतोय 
मी कौशल्यही नेट प्रॅक्टीसमध्ये न्हेतोय- अप्लिकेबल बनवतोय
मी पूर्वग्रहही पाण्यात बुडवतोय - वाहते करतोय  
मी तंत्रज्ञान फ्रेंडली करतोय - करुणेत साचवतोय 
मी आपणाला फॉन्टवतोय - आणि फॉन्ट आकाशवतोय
मी सृजनशीलतेला झवतोय - आणि ब्रह्मचर्यही पाळतोय 
मी मतभेदांना अद्वैततोय आणि अद्वैत असंख्यात  पालथे पाडतोय
मी कविता करतोय आणि तोंड पोळून घेतोय 
मी बांधकाम फक्त करत नाहीये 
त्यांच्यातील भिंतीसकट 
ते सर्वत्र चालवतोय 

मी आदिल जसावालांशी बोलतोय 
आणि कॉफीच्या मगातली वादळे ढवळत 
मगातल्या मगात
भूमिगत होतोय 
***

आदिल जसावाला, बार आणि मी  
संपत चाललेल्या  शतकाचं टेन्शन 
फ्रिज  करत असताना 
मेंदूवर आदळलेली  ही केसची  अग्निपरीक्षा 

चेहरा जाळून दिवाळी साजरी करू 
कि दहा मुखवटे माळून दसरा साजरा करू ?

माझ्या स्वीकाराची दुनिया आता कुठे तयार होत होती  
आणि हा आकस्मिक क्रॅश 

एकेक वीट स्क्रोल  होतीये 
एकेका अभंगाचे टायटल झूम होतेय 

मी नेमकं कशाला चॅलेंन्ज दिलय ?

माझ्यावर आरोप करणारेही गोधळलेत 
त्यांनाही ठरवता येत नाहीये कि 
मी नेमकं कश्याला चॅलेन्ज दिलंय ?

एक डेडलॉक लूक सर्वत्र फिरतोय 
"आपण एक डिपोर्टेशन सेन्टर आहे "
ही भावना  बळावतीये 

माझ्यामुळे विठ्ठल दुखावला गेलाय कि भक्त ?
सरकार दुखावलं गेलंय कि धर्म ?

ही एक  लज्जास्पद परिस्थिती आहे 
आणि मी लज्जागौरीइतका स्ट्रॉंग नाही 

माझ्या स्ट्रिंग्ज राक्षसी नाहीत 
मात्र देवांना चॅलेन्ज करण्याइतपत बळकट आहेत 

मी स्वतःतच एकटा बसलोय 
एक डल लाईट मला पिकअप करतीये 

लोक माझ्याविषयीची बातमी वाचताना 
मला वाचतील 
कि बातमीतला बोद्रीलॉर्द वाचतील ?

शासनाला तंबाखूचा वास येतोय 
आणि सत्ता गुटखा खाऊन 
माझ्या अरेस्टचे फर्मान काढतीये 

आदिल विचारतोय 
"पिणार का ?"

मी "नाही " म्हणतोय 

माझ्या आसपास वेगवेगळ्या नशा आहेत 
आणि मी माझ्या निर्व्यसनी हातावर 
शासन मळत 
सरकारला माझ्या तोंडात टाकून चघळतोय 
***

फुलपाखरू एकच असते 
आणि अमेरिकेत उडाले असते 
तर चायनात वादळ निर्माण झाले असते 

विठ्ठल एकच असता 
आणि फुलपाखरासारखा एकटा असता 
तर एकच वादळ निर्माण झालं असतं 

पण ना फुलपाखरू एक आहे ना विठ्ठल एक आहे 
दोघेही असंख्य आहेत 
आणि त्यामुळे एकमेकाला क्रॉस करणारी वादळं आहेत 
जी एकमेकाला भिडत 
एकमेकांशी सेक्स करत 
एकमेकाला शांत करतात 

एकाच हातांनी हाताळशील 
तर वादळात मरून पडशील 
अनेक हातांनी जोजवशील तर 
मॅचबॉक्समध्ये जाऊन बसतील 

तेव्हा मल्टिप्लाय युवरसेल्फ विदिन झिरो 
वाचण्याचा सर्वोत्तम उपाय अनेकवाद आहे 
जो शुन्याकडून हाताळला जातो 

***


ओठ  
माझे ओठ मला प्रकाशित करतायत 
माझे शब्द केव्हापासून 
एवढे तेजस्वी झाले ?
***

चित्र्यांचे ओठ 
शब्दांना मास्टर करत 
आणि त्यांना कीस करत 
चित्रे  ओठ फ़ेकतायत 
आणि आम्ही आमची ताकद गोळा करत 
त्यांच्या ओठात 
स्वतःला टिकवतोय 
***

ज्ञानदाचे ओठ 
प्रेमळ आणि सेक्सी 
दुबळे आणि धाडसी 
कपटी आणि पोपटी 
सारस्वत आणि लक्ष्मीशोधक 
अगतिक शिक्षेखालून जातायत 
अभिनय त्यांच्या रक्तात आहे 
आणि ते वास्तव कंझ्युम करून 
त्याचे कास्च्युम बनवू शकतात 
आणि आज तरीही ते 
फाटलेल्या कपड्यासारखे 

दिलासा देतायत 
आणि फाटण्याचा संताप व्यक्तही करतायत 

मी तिच्या ओठावर  मोडून पडतोय 
आणि ती  मला ओठांच्या विटेवर उभी करत 
स्वतःतच सरपटतीये 
***

टिम्ब टिम्ब ओळी  
1)
SHRIDHAR IS DEAD 
SHRIDHAR IS ANIMATED 
SHRIDHAR IS BLESSED 

2)
ISHWAR HAS REFUSSED TO FUNCTION
म्हणून रेफ्युजी झालोय 

3)
EVERYTHING IS EXHAUSTED 
EVERYTHING IS COLLAPSING 

4)
शासनच मिडिओकर झाल्यावर 
क्रियेटीव माणसांने कुठे जावे ?

5)
माफियात आणि शासनात फरक काय ?

6)
"मी सुटेन"
ही अंधश्रद्धा आहे कि रॅशनॅलिटी ?

***
टिकाव
हा इतका क्रूरपणा कुठून दाटतो  
कि तो दबा धरून वाटच बघत  असतो ?

केस टाकणाऱ्याने नेमका काय विचार केलेला असतो ?
चला तिळवेंची वाजवू या 
चला दिवटेंना अटकवू या 
कि खरोखरच त्याच्या भावना दुखावलेल्या असतात ?

पण मग फोन करून कळवता येते ना रे 
कि बाबांनो तुमच्या अमूक कलाकृतीने आमच्या भावना 
दुखावल्या आहेत वगैरे वगैरे  
कि केस टाकण्याने  लोकशाही सिद्ध होते ?

ही खुमखुमीची खाज येते कुठून  ?

कि काही गोष्टी आपण इतक्या गृहित धरतो 
कि त्यांची आठवण 
फक्त अश्या अपघातांनीच येते  म्हणून 
हे अपघात जाणीवपूर्वक घडवले जातात ?

मी इतका जाड होतोय 
कि स्वतःतच स्वतःच्या वजनाने कोलमडून पडतोय 

हा खेळ लहान मुलांचा खेळ  तर नव्हे ना 
मग परिपक्वता कुणी कुणाला शिकवायची ?

आयुष्य क्षणभरच टिकते 
त्यात ह्या कवितेचा आणि केसचा टिकाव किती ?

मी 
कविता लिहून  स्वतःला टिकवतोय 
***

  


असे होऊ नये कि 

मला खुर्चित खिळवून ALS ठोकता काय ?
मी कुठेच उभा राहू नये त्यासाठी हा आटापिटा ?

टॅक्टफुली ट्रॅकस हॅण्डल करणाऱ्या माणसाला 
ट्रकाची काय भीती घालताय?

क्रॉंक्रिट स्लॅबवर सुगंधाची भाजी उगववेन मी ह्या शेतकरी हातांनी 
माझा फॉर्मल अवतार निवडुंगाचा असला तरी 
इनफॉर्मल मटेरियल गुलाबांपासून बनले आहे  
काटा हा कॉमन 

मी प्लास्टिकपासून अध्यात्मिक  विट    बनवू  शकतो 
आणि धर्माला त्या विटेवर उभा करू शकतो 

माझी त्वचा मोड्युलर 
आणि तिचा भास सेल्युलर 

मी तिच्यातून आत्म्याला  फोन करू शकतो 
आणि घातलेली कॉईन्स 
ऐतिहासिक म्हणून इतिहासात धाडू शकतो 

तेव्हा खिळे ठोकताना काळजी घ्या 

असे होऊ नये  कि 
तुमच्या घरात वीट आहे 
आणि तुमचे छप्पर फाडून 
त्या विटेवर मी उभा आहे  
***

समतोल  

समतोल हवा 
आणि तो सखोल हवा 

विटेत काय आहे ?

पृथ्वीच्या गर्भाशयात जाऊन-नाहीसे होऊन 
पुन्हा जन्मून  - परतून 
पृथ्वीवर उभं राहता आलं पाहिजे 

बिकनीनं  बावचळून जाणारं मराठी कल्चर भोवताली 
नग्नतेलाही आत्ममग्नता पुरवता आली पाहिजे 

उथळे तेने गांड मारली 
म्हणून आपण थोडंच आयुष्याला बुडबुडा समजावे ?

केस टाकली की शोकेस उभी राहते 
हे ओळखून केस टाकणाऱ्या केसकऱ्यांना घेऊन  
थोडंच प्रसिद्धीच्या गावाला जावे ?

आपण  अशी शीळ घालावी 
कि प्रत्येकाच्या काळजात वारा गोळा होईल 
आपण अशी भाषा लिहावी 
जिच्यामुळे रक्तात पाऱ्याचा चोळामोळा होईल  

आपण  असा लुक  द्यावा  
कि लोकांना येता जाता आरसा दिसेल 
आपण असा हात हलवावा 
कि माकड उत्क्रांत  होऊन ईश्वर बनेल 

समतोल हवा 
आणि तो सखोल हवा 
***

निर्मिकाचे स्वगत 


वाचकडिझाईन प्रोसेस 
वाचकाचा प्रतिसादमुखी सिद्धांत - पोटॅन्शिअल भ्रांत 
गांडीत घाल 

तुझी केस लढवायला कोणता वाचक येणारय इन डेप्थ मॅपींग घेऊन 
आणि तुला शिक्षा झाली तर 
कोणता वाचक येणारय ती भोगायला एम्बॉयडींग लेवून 

फ्रॅगमेंटल वाचकानेच शेवटी तुझ्यावर केस टाकली ना ?-
सेन्टीमेन्टल वाचकांनीच तुझ्या निषेधार्थ कल्याण बंद ठेवले ना ?
आयुष्यभर तुमचे लेखन कोणीच वाचणार नाही ह्याची काळजी घेऊ 
हीही धमकी देणारे टेन्टेटिव वाचकच होते ना ?
तुझ्यावर हल्ला  करणारे शेवटी इर्ररॅशशनल वाचकच होते ना ?

अक्षर रिकामेच  असते आणि संदर्भहीन असते 
त्याचे डीकंस्ट्रक्शन करून 
कोणती बिल्डिंग येणारय अस्तित्वात ?

मेटॅफिजिकलचं पातं आर्टिफिशियल झालं 
म्हणून आत्मज नाकारशील ?

अस्तित्वात असण्याचा  हा साधा  सोपा  भाव 
लेखक आहोत ही साधी सरळ भावना 
भाषेचा कायापालट करणारा हा स्पष्ट स्वच्छ रस 
नाकारशील ?

जे आहे ते आहे 
ते कनविंस करण्याचा प्रयत्नही करू नको 
लेखनासाठी फाशी झाली 
तर लेखक म्हणून फाशी जा 
संहितेसाठी जन्मठेप झाली 
तर संहितेचा निर्मिक म्हणून जन्मठेप सोस 

तुझा मृत्यू लिहिला गेला 
तर वाचक काय वाचताना मृत्यू पावणार आहे का ?

एकात्म हो फंक्शनल हो 
बघ 
वाऱ्याने जगभरचे श्वास 
तुझ्या नाकात धाडायला सुरवात केलीये 

फुफ्फुसे कागदावर उतरव
***

वकिलासमोर 
माझ्या कवितेने समाज बरा होणार नाहीये 
माझ्या अश्लीलतेने तो 
मुक्तही होणार नाहीये 

मी गाथा सप्तशतीतून शतकं हाताळत  निसटत  ज्ञानेश्वर 
ज्ञानेश्वरातून निसटत नामदेव 
नामदेवातून निसटत जनाई गोराकुंभार चोखा 
गजाई गोरा चोखातून निसटत एकनाथ 
एकनाथातून निसटत तुकाराम 
तुकारामातुन निसटत फुले 
फुल्यांतुन निसटत बालकवी 
बालकवींच्यातून निसटत बहिणाबाई 
बहिणाबाईतून निसटत पुशी मर्ढेकर करंदीकर 
मर्ढेकर करंदीकरतून निसटत चित्रे कोल टकर पाध्ये ढसाळ 
चित्रे कोलटकर पाध्ये ढसाळातून निसटत श्रीधर तिळवे 

अश्लीलतेचा मोहरा प्रत्येकवेळी चेक देत 
कविता बाउन्स करत 

कितीवेळा स्वतःला डम्प करून 
पुन्हा जम्प घ्यायची नव्या जन्मात ?

समुद्र समुद्रतायत ढग ढगतायत पाऊस पाऊसतोय 
पण हा कर्मठतेचा घंताडा वास काहीकेल्या जात  नाहीये 

वकिल सांगतोय 
"आता जे होतय त्यावरही कविता लिहीतच असणार तू 
पण कुणाला दाखवू नको  प्रकाशित तर नकोच  नको 
कायदेशिर गोत्यात येशील
आणि गुंत्यात हाडे मोडत नाहीसा होशील "

दहशत हा विजय नाही काय ?
आपला सृजनात्मक अहंकार 
तिने किडनॅप  केल्याचे हे लक्षण नाही काय ?

"शट अप श्री शट अप 
दरवेळी वाकड्यातच शिरलं  पाहिजे काय ?
वकिल जय किंचाळतोय 

हे लोक माझ्या कवितेला स्मशानात घेऊन चाललेत 
आणि मी तिच्या राखेची  वाट बघत बसू ?

मी माझ्यात किती गट आहेत ते  मोजतोय 
आणि कविता असंख्य हातांनी माझ्या वकीलांच
डोकं खाजवतीये 
 ***

शब्द तर ढीगभर आहेत 
त्यांचा ढग झाला नाही 
हे दुःखद 

प्रॅक्टिस तर खूप केली 
तिचा खप झाला नाही 
हे दुःखद 

योगायोग तर पुष्कळ झाले 
त्यांची कळ झाली नाही 
हे दुःखद 

'मी' तर भरपूर झाले 
त्याने भर पडली नाही 
हे दुःखद 

पाठलाग तर वारेमाप झाला 
त्याने वारा झालो नाही 
हे दुःखद 

आता ह्या कोर्टात 
माझ्या शरीरभर फक्त मूत्र आहे 
आणि कवितेला 
लेडीज टॉयलेट सापडत नाहीये 
***

मुंबई हायकोर्ट 

मिलॉर्ड 

मी काहीच बोलणार नाही 
माझ्या वतीने माझा वकील बोलेल 
माझ्या वतीने भाषा बोलेल 
माझ्या वतीने कविता बोलेल 

माय लॉर्ड 
कुणीही बोलले तरी 
शेवटी मीच निर्दोष सुटणार आहे 
किंवा झाली तर शिक्षा मलाच होणार आहे 

जे आहे 
ते सर्व माझ्या वतिने आहे 
आणि त्याखाली जी सही आहे 
ती माझ्या वतिने हे सर्व आहे 
ह्याचा पुरावा आहे 

मिलॉर्ड 
मला फाशी द्या
म्हणजे माझी सही 
आपोआप मारून जाईल 
आणि मी 
ह्या सिग्नेचर ट्यूनपासून 
कायमचा मुक्त होईन 

मिलॉर्ड 
सही करा 
आणि माझ्यापासून कायमचे मुक्त व्हा 
***

इंटरनेटेड रिअल
मी निसर्ग निसर्गतोय 
मी विश्व विश्वतोय 
मी सृष्टी सृष्टितोय 
मी प्रतिसृष्टी प्रतिसृष्टीयतोय  
मी चिन्हसृष्टी चिन्हसृष्टीयतोय 

सगळेच इंटरनेटेड करतोय 
आणि भिन्न करून अनुभवतोय 

सगळ्यांच्याच दंतकथा रचत जातोय 
आणि त्यांच्या कवळ्याही झेलतोय 

सगळ्यांचाच आरसा बनवतोय 
आणि सगळ्यांनाच सगळ्याच चेहराही दाखवतोय 

फॅब्रिकेटेड फ्रॉड आणि ग्लॅमरस मेगॅलायिंग 
माझ्या आसपास माझ्या त्वचेची सालटी काढतायत 

त्यांना वाटतंय कि मी त्यांचा सिम्युलेशन्सला धोखा आहे 

सगळेच सत्य मानणाऱ्या माणसाचे 
रिऍलीटीत करायचे तरी काय ?
ते त्यांना कळत नाहीये 

केवळ पोस्टकार्ड टाकून पोस्टमॉडर्न झालेल्यांचे काय करू ?

मी नव्या युगाचे पोस्ट नेट आहे 
आणि माझा पोपट करणाऱ्यांना मी पिंजऱ्यात ठेवतोय 

मला  माहित  आहे 
ही केस खरीखुरी आहे 
आणि मी वकिलाला  खरेखुरे पेमेन्ट देत 
ती लढवतो आहे 

टीव्हीतले करवा चौथ पाहून उपास ठेवणाऱ्या बायका 
माझ्या आसपास वाढतायत म्हणून काय झाले ?

मी चंद्राला चंद्र म्हणून पाहतोय 
बाईला बाई 
करवा चौथला करवा चौथ म्हणून पाहतोय 
उपासाला उपास 

वकिलाला वकील 
जज्जला जज्ज 
कवितेला कविता 
पुराव्याला पुरावा 

माझे डोळे ब्लास्ट होतायत 
आणि मी ब्लॉकब्लॉस्टर सिनेमासारखा 
सर्वत्र रिलीज होत 
धो धो  चालतोय 

माझे हिट होणे अटळ आहे 
टेलरला विचारा तुम्ही फिट आहात कि नाही 
***

कल्याण पोलिस स्टेशन : १९९६

मला अरेस्ट करा म्हणजे 
मला नीट पळून जाता येईल 

हावरट आहात ?
मला बकाबका खा 

प्रकाशक आणि मी 
दोघेही अवघडलेलो 
माऊस ट्रॅपमध्ये 

विठ्ठलाने विवाहित राधेशी संबंध ठेवला तरी चालेल 
पण त्याच्या xx वर लिहिणे 
गुन्हा आहे 

दह्याची चोरी करणारा माणूस 
आध्यात्मिक कसा असू शकतो ?

पोलिसी डोळे मला चाचपतायत 
डोळ्यातल्या डोळ्यात मी क्रिमिनल होतोय 

शेवटी पोलीस स्टेशनही जात विचारतय 

मी निघालोय फोटो काढून देण्यासाठी 
पण  माझ्यातला कवी 
पोलिसस्टेशनमध्ये बसून कविता लिहितोय 
***

स्पेशॅलिटी 
जे इतरांना हवं आहे ते मलाही हवं आहे 
आणि तरीही मला 
इतरापेक्षा वेगळं असं स्पेशल दिसायचं आहे 

ह्या केसनं  मला स्पेशल कवी केलंय का ?

स्पेशॅलिटी कोण ठरवतं ?

हा माझ्यात स्पेशल क्लास मागणारा कोण आहे ?
आणि ज्याला इतरासारखं असावं असं वाटतं तो कोण आहे ?

मी पेंडुलमवर वावरतो 
आणि आंदोलने वाजवतो  

स्पेशल ----> कॉमन 
कॉमन -----> स्पेशल 

एक कटींग द्या भाई 
स्पेशल चाय त्या पोलिसांना द्या 
***

आम्ही 
आम्ही दुभंगतोय  
आम्ही गातोय 
आम्ही नाचतोय 


आम्ही धुळीला मिळतोय 
आम्ही पुन्हा धुळीला उभं करतोय 

आमची फुंकर 
एक दिवस 
आख्खा पर्वत खोलून
कवितेत ठेवणार आहे 
***

टॅटू 
एक टॅटू कोरला जातोय माझ्या त्वचेवर 
ह्या केसचा  

परंपरेची ही शाई 
ना अमेरिकेन ना जापानी 
ती इंद्रायणीच्या पाण्यापासून बनवली गेलीये 

टॅटूचा क्रिमीनल उगम
माझ्या पेशीत  झरतोय ढगासारखा 

पारंपरिक छत्तीस सुया घुसतायत् अंगाखांद्यात 

समाजाचे जुडिशियल जुडासी डोकं  
एक्झॅक्ट रंग शोधतय माझ्या क्राईमसाठी 

वेदनादायक त्रासांची टोकदार मालिका ठोकतीये 
एक क्रिमिनल प्रतिमा 

ह्या सुया कितपत इन्फेक्शन ओतणार  आहेत ?
त्या एडसचाही प्रसार करू शकतात का ?

टॅटूत वीट आहे विठ्ठल आहे पोलीस कॅप आहे 
आणि 'शासन ' हा शब्दही आहे बहुधा 

कदाचित माझ्या गुन्हयाचा विसर 
मला आयुष्यात कधी पडू नये 
म्हणून केलेली ही शासकीय सोय आहे 

त्यांना वाटतंय कि 
जेव्हा जेव्हा मी टॅटू पाहिन 
तेव्हा तेव्हा मी शासनाला घाबरेन 
विठ्ठलावर कविता लिहायला घाबरेन 

टॅटू तयार झालाय 
आणि मी कवितेपासून नवे लेसर मशीन तयार करण्यासाठी 
त्वचेत  मेडीकल ऍडमिशन घेतोय 
***


भयाचं फ़ंडींग  होतंय 

भयाचं  फंण्डिंग होतंय 
आणि मी आहे कि 
आख्खी चलनव्यवस्थाच रद्द करून 
तिच्या नोटांशी पत्ते खेळतोय 

दहशतीचं  जागतिक जंगली जाळे 
पोहतय माझ्या आसपास 
त्याला माझ्यात उतरण्याची  ह्या केसने दिलेली संधी 
मला गांधील माशीसारखी डसतीये

हे सगळे भयप्रताप वियर्ड आहेत काठोकाठ कोऱ्या ग्लासात 

ही  कुठल्या आईची संस्कृति 
अन कुठल्या बापाची सभ्यता 

सिद्धात अँबसर्ड झाले 
कि दहशत लॉजींक होते - दहशत लॉजींक झाली कि तिने पसरवलेले भय
रिफॉर्मेशनचा मुखवटा घालून चेहरा फाडते 

मला फक्त श्रोता बनवण्याचे कारस्थान 
आणि मी तुकाराम बनवून 
विठ्ठलाची चौकशी करू नये म्हणून 
सातत्याने माझ्या पुढे मांडले गेलेले परंपरेचे बलस्थान 

मी त्यांनी डिक्टेट  केलेले सादरीकरण 
सादर करायला नकार देतोय 
मला माहितीय ह्या नाट्यगृहाचे बांधकाम 
मला अनुकूल नाहीये 

मी स्वतःलाच क्लीक केलंय 
आणि विठ्ठल 
बडव्यांना दाद लागू देता 
मला दाद देतोय 

विठ्ठलाचा परिवर्तनावर विश्वास आहे 
आणि मी तुकाराम नीट वाचल्याने 
मला तो माहीत आहे



जालक

जे निश्चित असतात 
निवांत असतात 
शांत असतात 
ते निश्चितपणे आतून 
क्लान्त  असतात 
भ्रांत असतात 

मी अनिश्चितेत जाळे जोडतो 
आणि त्या जाळ्यात संशयाचे जाळेही पेरतो 

दैनंदिन आणि कालातित 
मी दोन्हीशी गप्पा मारतो - उगवतो

मी थोडक्यात मांडत नाही - काहीही 
मी प्रचंड कंड 
अधूनमधून गंडवत 
सविस्तर सांडतो 

मी साण्ड नाही 
मी  भाण्ड नाही 
मी गाण्डही नाही 
मी वाण्ड आहे 
जो काण्ड रचतो 

अटक करा 
मी एकटक 
प्रचंड पाहीन 

******


१९९६ कल्याण पोलिस  स्टेशन 

कवितेला F S I  नाही मिळाला 
पण F R I   मिळाला 

शेवटी मराठी संस्कृतीने 
पुन्हा एकदा नवतेवर अरेस्ट वॉरन्ट काढलेच 

तुम्ही कितीही केसेस टाका 
माझे बांधकाम चालूच राहील 

******


१९९६ स्पेशल फोटो सेशन इन कल्याण पोलिस  स्टेशन 

टॉप टू बॉटम नीट कॅच करा 
फिंल्डींग नीट लावा 
कवी आहे 
फोटोतही कवी दिसलो पाहिजे 
वाटले पाहिजे कि
कवी असून अश्लिलतेचा गुन्हा केलाय

पोलिसांकडून नष्ट होण्याइतपत 
कमजोर नाही हा कवी असण्याचा हार्डवेअर 
तुमचा खाकी सोफ्टवेअर 
नीट हाताळा 

हा तुमचा उपदेशक तपकिरी दाण्डू 
त्याचा वॉल्यूम वाढवून एनलार्ज  करा 
फोटोतल्या फोटोत 

माझी दाढी क्राईम्सचा ग्रुप वाटली पाहिजे 
माझे केस असे उडले पाहिजेत 
कि बघणाऱ्याला 
माझ्या डोक्यातील हजारो ढग नीट फील झाले पाहिजेत 

लेन्सेस लार्ज स्केलवर अनफोल्ड करा 
तरच छातीतील कमळ 
चिखलासोबत नीट प्रोजेक्ट होईल 

हे फोटोसेशन 
तुमच्या दहशतीचा प्रोपोगांडा आहे कि जाहिरात ?
काय आहे 
तुमचा धाक अडजस्टेबल असतो 
आणि निगोशिअन्सला तय्यारही !

तो ब्लॅकग्राऊंडवर नीट चकाकला पाहिजे 
माझ्या कपड्यांचा रॉ पणा 
माझ्या कच्च्या हातांचा हातोडा 
माझ्या ग्लोरियस बोटांच्या गाणाऱ्या सुऱ्या 
श्वासाचा  क्रूके  स्टॅमिना 
मुळे नसलेल्या पेशींची झाडे 
सिलिग फॅनसारखी स्वतःभोवती फिरणारी 
बर्फापासून बनलेली 
वितळण्यास हरदम तय्यार लिंग 
आय ड्रॉप करणारे आयड्रॉपर्स नेत्र 
असंख्य चेहऱ्यांची नार्कोटिक घड्याळे 
स्क्रिबल्ड धमन्या फ्रीबर्ड शिरा 
अफूपासून बनलेले रक्त 
मी फोटीजनीक वास्तवतेचा दमदार ब्रँड वाटलो पाहिजे 
तेव्हा हे सर्व प्रकाशात नीट ठेवा 
माझ्या प्रोफाईल्ड नाकाच्या आसपास 

चला 
क्लीक करा 
काळीज हाथ आणि कॅमेरा 

मी हसतोय 
मला वाटतं कि मी येशू ख्रिस्ताचे मॉडेल आहे 
context शिफ्ट होतोय 
रक्तात असंख्य क्रोकरीज फुटतायत 
मला वाटलं कि 
तुम्ही मला सुळावर चढवताय 

मी हसतोय 
मला कळतंय येशू का हसला ते

तो गॉडचे मॉडेल होता 
मी त्याचे मॉडेल होतोय 

तुम्हाला वाटतंय कि 
मी ओरिजन ऑफ स्पेसीजची ओरिजिनल कॉपी आहे 
मी तुमच्या स्टॅंडर्ड विठ्ठलाचे 
मिस्ट्रान्सलेशन आहे 
     
मी हसतोय 
माझ्या जीभेत फुले उमलतायत 
आणि दगड वेचतायत 

होलोग्राफीक स्केल वाढतंय 

दुःख ही माझी निवड आहे 
बंड हा माझा स्वभाव 

हे फोटोसेशन एक बॅड कलेक्शन होतंय 

मी हसतोय -सूळावर 
मी हसतोय -क्रुसिफिकेशनवर 
मी हसतोय -सिस्टीम नावाच्या धर्मावर 
मी हसतोय -माझ्या अश्लील दातांनी -आसमंतावर 

***************************************************  
आध्यात्मिक सत्य  
मी टीव्हीतून सेकंड  हॅण्ड आयुष्य प्राप्त करत जगतोय 
आणि पुन्हा फास्ट हॅण्ड आयुष्यात ते सेकंड हॅण्ड ताकदीने वापरतोय 

मी रिअलॉजीत अडकत नाही 
आणि आयडियालॉजीतही 
मी तपशील उभे करतो 
आणि सिद्धांतही 

मला जगण्याची तंत्रे अवगत आहेत 
आणि  पांडुरंग सांगवीकरांना मी माझ्या हाताखाली 
कामावर ठेवू शकतो 

मी तुमचा फालतू अस्तित्ववादी नुसता विचार करणार 
आणि जगण्याचा बोभाटा करणारा सिस्कील्ड अस्ताव्यस्त 
मध्यमवर्गीय नायक नाही 

मी कृती करणारा प्लानर आहे 
मी स्पर्शात उतरतो 
आणि त्याचे फोटोही काढतो 

मी त्वचा विकत घेतो 
आणि  तिला शूटही करतो 

मी तुमच्या  मराठी कवेत येणारा माणूसच नव्हे 
मी जागतिक हातांनी जग लिहिणारा जगडव्याळ जगदंब 
जगलाल कवी आहे 

टाका  केस करा स्थानबद्ध 
एक गोष्ट सांगतो 
जगाने जिझसला क्रूसीफाय करून मुक्त झाला 
हे आध्यात्मिक सत्य 
तेव्हा ... ... .. 
***

विठ्ठलसंहिता 
Everything is outside the text 
Love as well as this thing 
विठ्ठलाविषयीची Text हीच 

विठ्ठल आणि मी 
ह्यांच्या दरम्यानचा अडथळा आहे 
कदाचित विठ्ठल  हाही Text आहे 
आणि जे सत्य आहे 
ते विठ्ठलाबाहेर आहे 

जी Text आहेत 
त्यांनीच तर ही केस टाकलीये 

विठ्ठलाविषयीच्या संहिता  मायनस केल्या 
तर विठ्ठल कुठे आहे 

मला आता असं वाटतय कि 
मी विठ्ठलाविषयी लिहून 
अकारण त्याला  वाढवतो आहे  

मी जे लिहितोय 
ती कदाचित विठ्ठलाची शेवटची पुरवणी आहे  

मला विठ्ठलानेच अरेस्ट केलय
ही केस तर फक्त बहाणा आहे 

निघायला हवं - Textless 
***

पोलीस स्टेशनमधून निघताना 
मी एक ईश्वर आहे
कैदेत टाकला गेलेला 
मी एक केस आहे 
ईश्वरावर दाखल केली गेलेली 

जे शब्द मी पाळले होते 
त्यांची माझ्यावर पाळत आहे 

माझी गाणी पडतायत 
आणि  नाण्यांच्यावर माझ्या अश्लिलतेचा वेध घेणारा 
एक कॅमेरा आहे 

ही कविताही कधीतरी मारून जाईलच 
जिच्यावर केस दाखल  झाल्याने 
जिवंत राहण्याची जबाबदारी आलीये 

विरोधाभासाचे तुकडे 
एकमेकात आत्महत्या करतायत 
आणि पॉलिश्ड शवे होऊन परततायत - तरंगतायत 

त्यांना शांततेचा पिंजरा हवा आहे 
आणि शांतता कबुतरांसारखी उडून उडून 
स्वतःला झिजवतीये 

मला कळत नाहीये 
माझ्या भोवताली काय चाललंय 
मला इतकंच माहित आहे 
ज्या सुऱ्याने माझा गळा कापला 
तो सुरा माझी शेवटची आशा होती
***

फोटोकॉपी 
मी कविता लिहीलीच नाही 
माझ्या फोटोकॉपीने कविता लिहिली 

हेमंतने कविता छापलीच नाही 
हेमंतने माझ्या फोटोकॉपीने दिलेल्या 
कवितेच्या फोटोकॉपीची 
फोटोकॉपी छापली 

माझ्या फोटोकॉपीने कविता लिहिली तेव्हा 
भारतात इंटरनेट आलेच नव्हते  
हेमंतने कविता छापली  तेव्हा 
कवितेत इंटरनेट आले होते 

महेश  लोहार  म्हणतोय कि 
श्रीधर  तिळवेने कविता लिहिली 
हेमंत म्हणतोय कि 
श्रीधर तिळवेने कविता लिहिली 
वकिल म्हणतोय कि 
तू कविता लिहिल्याचे कबूल कर 
म्हणजे जमिन ताबडतोब मिळेल 
वकिल जजंना सांगतोय माझ्यावतीने 
कि मीच बांधकाम चालू आहे  
ही कविता लिहिली 

मी सुटलोय 
माझी  फोटोकॉपी न्यायालयात पेन्डिग आहे 
***

क्षण
टाकणाऱ्यालाही कळले नसेल 
की तो  जी टाकतोय  
ती केस आहे 

केस डोक्यात गेलेली नाहीये 
ती जिथे गेलीये तिथे डोके आहे  

अंधार बघायचा नाही 
म्हणून लाईट लावणारे भित्रे 
काय कमी आहेत ?

पोलिसांची माझ्यावर नजर आहे 
म्हणून माझी पोलिसाच्यांवर नजर आहे 

मी आरश्याला पाहतोय 
लोकांना वाटतंय मी स्वतःला पाहतोय 

तुला मला  शिक्षा घ्याल 
तुमचे क्षण मी कसे फेडणार ?

शासनाकडे स्वतःचे असे घ्यायला क्काय असते ?

कविता 
जगाचा समतोल सांभाळते 
पण हे जगाला ठाऊक नसते 
पण समतोलाला ठाऊक असते 

दारात पोलीस 
म्हणून पळून जाण्यासाठी मी खिडकी  उघडली  
तर खिडकीबाहेर असंख्य खिडक्या 

केस माझ्यावर आहे कि कवितेवर 
मग शिक्षा मला कि कवितेला
मी हेमंत बरोबर नाही हेमंतमध्ये आहे 

नद्याच घसरतात 

आता बाहेरझोप कंटिन्यू आहे 
मी कुणाचे दुःस्वप्न तर नाही ?

मला खोलात जायचेच होते 
ही तुरुंगाच्या खोलीची शक्यता 
मला तयार करतीये 

मी नागडा झालोय 
अन मला माझ्या कपड्यांची लाज वाटू लागलीये 

ह्या शून्यापर्यंत जाण्यासाठी 
मी अनंत वेळा एक ते नऊ मोजले 

कवी बनल्यानंतर शिल्लक काय राहते ?
*** 

क्षण
शब्दाशिवाय जग पोहचवता येत नाही 
म्हणून तर कवी झालो 

शरीर पळतय 
कविता पळतीये का ?

मी केसमधून धावतोय 
आणि शेवटी केसच गाठणार आहे 

दरवेळी नवे रस्ते 
परमनन्ट मार्गदर्शक  काय कामाचा ?

कविता शांत आहे 
कारण तिला जे बोलायचे आहे 
ते ती बोलून बसलीये 

कैदेच्या भीतीने जेवढे पळवले 
तेवढे स्वातंत्र्याच्या आनंदानेही पळवले नव्हते 

एकटाच आहे 
कवी आहे 
ताऱ्यांवर सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आहे 
आणि ते अंधारातच जास्त प्रकाशमान दिसतात 

ज्ञानदा आणि मी 
आणि एकमेकाशी इतके भांडलो 
की थकून एकसारखे झालो 

नाहीसा करण्याची भीती कुणाला दाखवताय 
गर्भ नाहीसा झाला तेव्हाच तर अस्तित्वात  आलो 

तुम्ही मला मारताय 
कि मी आत्महत्या करतोय 

तुम्ही मला पकडालही 
पण जो पकडाल तो 'मी' असेन  का ?
ज्याने कविता लिहिली 'तो ' असेल का ?
मग पकडताय कुणाला ?
आणि शिक्षा कुणाला देताय ?

पळता पळता पळता 
इतका पळालो 
की मृत्यूत पोहचलो  

मी न्यूजमध्ये वाटला गेलो 
आणि प्रत्येकवेळी माझ्यातील 
काहीतरी मेले 

झोपेत जोपर्यंत पोलीस येत नाहीत 
तोपर्यंत माझे स्वातंत्र्य अबाधित आहे 
भय माझ्यानंतर माझ्यात जन्मले
आणि आज माझ्या वयाचे झाले 

मी जोवर जिवंत आहे 
तोवर संत आहे 
तोवर अनंत आहे 
मला मोजू नका 

मी पक्षी नाही 
पंख आहे 
मला बांधू नका 

तुम्ही ज्याला चुकीचे वळण म्हणता 
तो मी निवडलेल्या  मार्गावरचा 
मी निवडलेला क्षण होता 

सगळे उथळच आहे 
मी खोलात गेल्यावर 
मला हा शोध लागला 
*** 




No comments:

Post a Comment