चॅनेल बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे नाईक
पोपट
प्रेम करणं मुश्किल म्हणून तर हा द्वेष
नागडं हिंडणं कठीण म्हणून तर हा वेष
विवेक बाळगणं डिफिकल्ट म्हणून तर हा त्वेष
सत्य शोधण्याऐवजी अफवा उडवणं आसांन
आत्मा खोडण्याऐवजी शरीर क्रुसिफायणे सोपं
इजनेस होण्यापेक्षा इजिनेस होणे इजी
शतक बाळगण्यापेक्षा बाळग दशकाचं बदक
मोद खाण्यापेक्षा खा कर्मकांडाचा मोदक
नदी चमकवण्यापेक्षा पी बिस्लरीतील उदक
हे सर्व नाकारलेस म्हणून तर तुझा पोपट झाला
एक छान झाले
काही काळ का होईना
पण लोकांचे तोते उडवलेस
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल बांधकाम चालू आहे ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )
***
एक विचार
मरताना ही केस लक्ष्यात राहील का ?
मरताना हे दुःख लक्ष्यात राहील का ?
विसर सगळ्याचाच पडत जातो
विसर सगळ्यावरच पडत जातो
विसर सगळ्यांनाच पडत जातो
विसर पडल्यानंतर
काय शिल्लक उभे राहिल ?
जे लोक मदतीला आले त्यांची नावेच ना ?
शेवटी उरेल ती माणूसकी
जी तुझ्या मदतीला धावली
मरताना तीच लक्ष्यात ठेव
वारताना तिच्यातच वार
***
मी विठ्ठलावर कविता लिहितोय
मी कवितेवर विठ्ठल लिहितोय
मी कवितेत विठ्ठल लिहितोय
मी कवितेने विठ्ठल लिहितोय
मी विठ्ठलने कविता लिहितोय
माझ्यावर केस टाकण्यासाठी विठ्ठल कवितेत दाखल होतोय
मी कविता लिहावी म्हणून कवितेत विठ्ठल दाखल होतोय
मी कविता लिहावी म्हणून
विठ्ठल
बांधकाम चालू आहे ही माझी कविता सोबत घेऊन
निघून चाललाय
मी बांधकामावर केस झाल्यानंतरही लिहितोय
मी लिहितोय
***
विठ्ठल
विठ्ठल तुमच्यातही
आहे
माझ्यातही
केस विठ्ठलाच्यातच चालू आहे
तुमच्यातून चालू आहे
माझ्यावर चालू आहे
पोलीस विठ्ठलालाच शोधतायत
माझ्यातून शोधतायत
आणि तुमच्यातून
कविता विठ्ठलानेच लिहिलीये
माझ्यातून लिहिलीये
तुमच्यातून वाचलीये
विठ्ठल माझ्यातूनच पळतोय
तुमच्यातून पाठलाग करतोय
केस विठ्ठलापुढेच चाललीये
विठ्ठलच लढतोय
आणि विठ्ठलच हारतोय
मी निमित्त आहे
तुम्ही निमित्त आहात
विठ्ठल निमित्त आहे
विठ्ठल असे करोडो नैमित्तीक डेली एपिसोड पहात
विठ्ठलतोच आहे
***
विठ्ठलप्रश्न
विठ्ठलही कंडीशनिंग
भक्तीही कंडिशन्ड
तुमच्या माझ्यात अग्रीमेंट होऊच शकत नाही
हे सत्य
वाळून गेलेली सत्ये आणि त्यांचा पाचोळा मी गोळा करत नाही
मी शेतकरी
नवी झाडे लावतो तीही ऋतूनुसार
मी ऋत आहे ताओ आहे फ्लो आहे
माझी कविता ही तर फक्त थ्रो आहे
जी थ्रू झाली नाहीये
कारण विठ्ठलही कंडीशनिंग
भक्तीही कंडिशन्ड
विठ्ठल सर्वत्र असेल
तर तो माझ्या कवितेतही असेल
आणि तुमची तुमच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी
त्याने माझ्याकडून
ही कविता लिहून घेतली असेल
तुम्हाला हे पेलणार नाही
कारण विठ्ठलही कंडीशनींग
भक्तीही कंडिशन्ड
विठ्ठल सापेक्ष कि विठ्ठल निरपेक्ष ?
विठ्ठल शैव धनगर कि विठ्ठल वैष्णव ?
एकाचा ईश्वर दुसऱ्याचा सैतान
एकाचा देव दुसऱ्याचा राक्षस
एकाचा सूर दुसऱ्याचा असुर
चायनाने पाय बारीक केला
युरोपने रक्ताचा फुटबॉल केला
पण विठ्ठल मात्र विकेटवरच उभा राहिला
त्याने शूद्रांना शूद्र ठेवले
आणि अस्पृश्यांना अस्पृश्य
शेजाऱ्यावर प्रेम करा
पण शेजारच्या गावावर हल्ले करा
इतके वर्तुळबंद चलाख आपण
शूद्रांना आणि गुलामांना अक्कलच नसते म्हंटल्यावर
दासकर्म सोपेच कि
शेवटी जे ते विचार कंडिशन्ड
विविधता मान्य करावी तरी पंचाईत
एकतेचा गळा घोटावा तरी पेचप्रसंग
असंगाशी संग फिक्स
प्राणाशी गाठ फिक्स
फिक्सिंग आणि मुक्ति
तुम्ही केस टाकली
ह्याचं दुःख नाही
पण ज्याने केस टाकली
तो कलावंत असूनही
त्याने सारासार विचार केला नाही
ह्याचे दुःख आहे
"मी ह्याचे चॉकलेट देणार नाही ..... ..... ....
मी तुझ्याशी "असा वागलास तर ... " खेळणार नाही ....
...
राजा सिलॅबस जसा लिहिलाय तसाच अभ्यास कर
नाहीतर परीक्षेत नापास होशील .... ....
माझ्या समोरून चालता हो ...... ....... ......... "
हे सर्व लहानपणापासून
ऐकतोच आहे कि
तुम्ही तरी वेगळं काय बोलताय ?
तुम्हाला वाटतंय कि
मी तुम्हाला दुःखी केलंय
आणि मला वाटतंय कि
तुमची जखम सेल्फमेड आहे
मी कवी लोकांच्यातला ब्लॅक शीप आहे का ?
माझी स्पिरिच्युअल अटीट्युड फक्त 'अटीट्युड ' वाटतो का ?
माझी स्पिरिच्युअल अटीट्युड फक्त 'अटीट्युड ' वाटतो का ?
माझा अहंकार जगजाहीर आहे
आणि ती माझी खास जागीरही आहे
जे वाईट 'वाटते' ते 'वाईट ' ठरते
जे चांगले 'वाटते ' ते 'चांगले ' ठरते
वाईट पिक्चर पाहून आलेली माणसे
चांगली कविता जाळू शकतात
आसपास सर्वत्र फ्लॉप चित्रपटच आहेत का ?
लहान मुलांना दुखवू नये
समाज हा लहान मुलांचा गोतावळा आहे का ?
मी कुठल्याही गोष्टीची पिसे काढतो
कारण मी शहामृग नाही
मला तुमची लाज वाटते
तुम्हाला मी तुमच्यात आहे ह्याची लाज वाटते
पण उद्या आपल्याला लाज वाटली
ह्याचीच लाज वाटली तर ......
माणसे फक्त बुद्धीने बदलत नाही
माणसे फक्त कवितेने बदलत नाहीत
ती बदलली तर फक्त काव्यात्मक बुद्धीनेच बदलतात
उजळणीत जळणे आहे मग उजळणे आहे
स्वतःला पेटवायची तयारी करता मग ?
माझा विठ्ठल हा तुमच्या विठ्ठलांच्यातलला
ब्लॅक शिप आहि का ?
माझा विठ्ठल ही माझी फक्त स्पिरिच्युअल अटीट्यूड आहे का ?
मी वाद घालत नाहीये
मी माझ्यातला विठ्ठल खणतोय
मी तुमच्याशी कायदेशीर लढाई लढत नाहीये
मी माझ्यातले आत्मयुद्ध तुम्हाला दाखवतोय
ह्यात आनंद नाहीये
ना मला ना तुम्हाला
माझी जिरवली तरी 'मी ' थोडाच जिरणार आहे ?
फारतर ह्या रेप बिझनेसला
फारतर ह्या रेप बिझनेसला
रॅप कवितेत ओतेन
Is The Whole Episode Nonsense ?
Most heated poet किंवा Most hated poet
बहाल करता मग ?
रेप सेलिब्रेट करणारा कॅम्प उघडून
कॅम्पेन चालवता का मग ?
माझ्यावर बॅन लादून
माझ्या नवतेचे स्फोट थांबवता का मग ?
मी प्रश्न विचारणारा माणूस आहे
तुमच्या रेडिमेड उत्तरांची पंचाईत करणारा
माझ्या जिभेची शिल्पे बनवून
त्यांना शवागारात टांगता का मग ?
आणि आता आजचा प्रश्न विचारतो
विठ्ठलाची पोझिशन तीच आहे
कि माझ्या प्रश्नानंतर ती बदलतीये
***
चालून आलेल्या वारकऱ्यास उपदेश
तू वारकरी आहेस
हा निव्वळ अपघात आहे
इंग्लडमध्ये जन्माला असतास
तर ख्रिश्चन झाला असतास
किंवा जापानमध्ये बौद्ध
तू वारकरी आहेस
हा निव्वळ योगायोग आहे
माझ्या घरी जन्मला असतास
तर शैव झाला असतास
तू वारकरी आहेस
पण सर्वच वारकरी नाहीयेत
अनेकांचा विठ्ठल हा देव नाहीये
तुला हे सर्व घाबरवून टाकते का ?
श्रद्धा मजबूत असण्याचे दिवस संपले राजा
विविधता आहे
आणि तिला बांधकामानेच जोडत ठेवले पाहिजे
किंवा एक मोठी भिंत
किंवा एक मोठा प्रसाद
मुळे हलतायत म्हणून डचमळतोयस कशाला ?
तू थोडाच झाड आहेस ?
विमाने बांधली गेली राजा
आता ती कल्चरल करायची वेळ झाली
उठ
म्हणजे उडायला लागशील
***
स्टेटस्टीकल
नव्यान्नव टक्के लोकांच्या मते
विठ्ठल पळालेलाच नाही
तो श्रीधर तिळवे ह्यांच्या क्षणभंगुर कवितेला
चिरकालीन हास्याने पंढरपुरात बसून नमवतो आहे
दहा टक्के सामान्य माणसे
तिळवेंना फाशी दिल्यास
त्यांना विठ्ठल ही काय चीज आहे ते कळेल
असे म्हणतायत
सदतीस पॉईन्ट पाच टक्क्यांच्या मते
तिळवे दलित असल्यानेच
त्यांचा विठ्ठलावर रोष आहे
त्यांना मंदिरप्रवेश दिल्यास
ते कवितेतून माघार घेतील
तिळाव्यांना विचारले असता ते म्हणाले
"ही स्टॅटीस्टीकल खाज आहे
माझ्याकडे टिनोवेट आहे
ते देऊ का ? "
***
शोध
ज्या शोधाचा शेवट होत नाही
त्या शोधाची मी सुरवात तर केली ना ?
विठ्ठल ही फार डाऊटफूल केस आहे
म्हणून विचारतोय
पोस्टमॉडर्नची रिप्लेसमेंट म्हणून
विठ्ठलाच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे ?
अलीकडे देव
भक्त तयार करतोय कि टेरेरिस्ट
तेच कळत नाही
जे स्वतःच घाबरलेत
ते जगाला घाबरवणारच
जगात कायमच अनेक GOD नांदत होते
आणि ते एकमेकाला जोडून नव्हते
त्यामुळे हा पकडला कि तो सुटणारच
आणि जो सुटला
तो शत्रू वाटणारच
बरं पकडलाय तोही आपण स्वतः पकडलाय
कि आपल्या हाताच्या दावणीला बांधला गेलाय
हा प्रश्न आहेच
भुते वाढतायत, करण्या वाढतायत, लिंबू मिरच्या वाढतायत
विज्ञान फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवतायत
मी विठ्ठल पकडत नाहीये
कारण मला 'समग्र ' पकडायचे आहे
माझ्या आसपास समग्रतेची कापलेली बोटे
आणि काळी बाहुली
***
भाषण
समजा मी आदिमानवाच्या गुहेत गेलो
आणि विठ्ठलाची पूजा केली चित्रे काढली विठ्ठलाची
तरी मी आदिभक्त होईन का विठ्ठलाचा
किंवा विठ्ठल आदिदेव माझा ?
समजा मी तुकारामांच्या मांडीला मांडी लावून बसलो
तरी तुकामारामाची कविता मला कळेल का ? किंवा माझी तुकारामाला ?
शेवटी आपण 'आज ' असतो
'इथे ' असतो
शेवटी आपला विठ्ठल 'आजचा ' असतो
'इथला ' असतो
आपण आज जेन्युईन असू शकतो
बोगसही
जंक असू शकतो
हंकही -
पण आपण आज असतो ---- म्हणून आज मी विचारतोय
What's Today's Vithal ?
Is Viththal spiritual logic of Today's Marathism ?
आपणाला विठ्ठल रेडिमेड मिळालाय
म्हणून तर आपण त्याला लाइटली घेत नाही ना आताशा ?
विठ्ठल आपले काय करतो ? आपल्यात भक्त तयार करतो
विठ्ठलाचे आपण काय करतो ? भक्ती करतो ?
भक्ती ही लॉजिकची आत्महत्या असते का ?
कि लॉजिक भक्तीची हत्या असते ?
आपणाला विठ्ठल म्हणताच स्टॅगनेशन येते का ?
कि स्टॅगेशन येताच आपण. विठ्ठल विठ्ठल करतो ?
आपण मराठी संस्कृति तरंगू देत नाही का ?
जाहिराती उत्तम चालतायत
जाहिराती उत्तम चालतायत
आणि दिंड्याही
इज गोतावळा वर्किंग इन फेवर ऑफ विठ्ठल ?
विठ्ठलाला आपण काय देतोय ?
शेवटी फेरीवालाही पोलिसांना हफ्ते देत असतो
तेव्हा इन्डायरेक्टली सरकारलाच टॅक्स देत असतो
आपण कुणाला स्पिरिच्युअल हफ्ता देतोय ?
आणि कुणाला टॅक्स ?
विठ्ठलाला ?
विठ्ठल हे ग्रॅण्ड नॅरेटिव आहे
की लोकल नॅरेटिव ?
मी सपाट आहे की अफाट
हे कसं ठरवणार ? कोण ठरवणार ? की विठ्ठलाच्या वतीने तुम्ही ठरवणार ?
आणि प्रत्येक इन्फॉर्मेशन टॉवरबरोबर
तुमच्या सपाटीतून
मी माझी उंची वाढवतोय
असं म्हंटल तर....
हल्ली कुठलीही गोष्ट मला इलिगल तरी वाटते
किंवा अनएथिकल
कुठलेही कंझप्शन क्रिमिनल तरी वाटते
किंवा उदास तरी
'एक्सपोज ' हीच मूळ पोझ झाली आहे का ?
मला गुंतागुंत दिसतीये
पण कळत नाहीये
ऍकेडेमिक्स आणि गॉसिप
ह्यांच्यात फरक नाही राहिलाय
म्हणून मी माझी जिज्ञासा
सोपेपणाला विकू का ?
मी एक क्रूर सुरवात आहे कदाचित
जिचा शेवट प्रेमळ व करुणामय असू शकतो
मी चालायला सुरवात तर केलीये
आता केस पकडून माझ्या पाठी लागायचे
कि माझ्या बरोबर समत्वाने चालत सत्यापर्यंत पोहचायचे
हे तुम्ही ठरवायचे आहे
***
***
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल बांधकाम चालू आहे ह्या काव्यफाईलीतून )
एक्झीट
तुम्ही मला कितीही मृत्यूच्या दारात न्या
मी पाहुण्यासारखा त्याच्या घरात जाईन - राहीन - त्याला खाईन
आणि पुन्हा थेट दारातून
आयुष्याच्या घरात रहायला येईन
माझी कविता पैश्याच्या तालावर नाचते ?
हो नाचते
पण पैश्याच्या उरावर नाचते आणि पैश्यातून परततेही
कविता लिहिताना मी मार्क्सवादी नव्हतो
म्हणून हे सांगतोय
अर्थशास्त्र चुकले म्हणून काव्यशास्त्रानेही चुकले पाहिजे
असं कुठं लिहिलय ?
सत्य राज्याच्याद्वारे
माझ्यावर चालून येतय
म्हणून का मी सत्तेला प्रतिष्ठा द्यावी ?
मी सत्याला प्रतिष्ठा देणारा माणूस आहे
सत्यच सत्याला निर्माण करू शकते
म्हणून सत्याचे उत्पादन अशक्य आहे
तेव्हा केस टाकून गर्दीने गोळा केलेले सत्य मी मान्य करेन ह्या भ्रमात राहू नका
लिहा
माझ्या विरोधात लिहा
मला न जाणता लिहा
मला न वाचता लिहा
आपल्या रक्तातच स्वार्थ आहे
आणि आपलं काळीज
रक्ताशिवाय लिहिताच येत नाही
माझी विरचनाही महारचनेसाठी असते
तिच्याही विरोधात लिहा
आणि हा विरचित काळजांचा हैदोस
असाच चालवत रहा
पण चालवताना लक्ष्यात ठेवा
बुंदसे जो जाती है
वो हैदोससे वापस नही आती
माझ्यावर केस टाकणारा क्षण कुरूप होता - मान्य करा
किंवा तो क्षण
अधिकच कुरूप करा -
मग ती कुरूपता
सामूहिक करा - पुढे जा
आणि आख्खा समाज
'कुरूप एकसंधतेने नटलेला समाज '
करा
नटवा स्वतःला, इतरांना, सगळ्यांना
नटवा आणि नट व्हा
मी अभिनयातून
"EXIT" घेतोय
***
म्हणून म्हणतो
रजनीश पण आहे आणि टेररिस्टही
कृष्णमूर्ती पण आहे आणि विठ्ठलही
साई पण आहे आणि सत्यसाईबाबापण
हे सगळं नाकारून
मी शोधतोय समग्र होकाराचा अर्थ
मी स्वतःच एक पुस्तक आहे
आणि मी स्वतःच निरक्षर आहे
निरक्षरता जी माझ्यात आहे
निःअक्षरतेचा महामार्ग असेल कदाचित
Desemiotisation चा उकिरडा तिच्या शेजारी
कोकसारखा दिसला म्हणून
थोडाच माँ की कोख होणार आहे ?
हे जग रोम आहे कि रूम ?
हा जगण्याचा डान्स रोमान्स आहे कि चान्स ?
जगाला केंद्र नसेल
तर माझ्या जगण्याचे केंद
मी माझ्यात जगेन
आणि जगवेन
मी भ्रमावर बसणारा भ्रमर नाही
मी ग्रामर मास्टर करणारा ग्रुमरही नाही
मी भाषा आहे आणि भाषेचा मालकही
मी स्वतःला विठ्ठलाकडे गहाण टाकलेले नाहीये
माझ्या डोक्यावर मुळात टेन्शनचे एवढे कर्जच नाही
मी विचलित करणारे अर्थचलन आहे
माझी मुख्य अडचण मीच आहे
मी डूमवर विश्वास ठेवणारा डूमर ही नाही
मी बुमवर विश्वास ठेवणारा बुमर ही नाही
मी आडवा पडतो
आणि उभ्याने वाढतोही
मी सपाट होतो
आणि खोलात प्रगाढतोही
मी 'मी ' विरुद्ध लावला गेलेला ह्युमन बॉम्ब आहे
मला विठ्ठलाला बांधू नका
मला भक्तिला टांगू नका
मी कलेच्या तलवारीने लढतोय
आणि कलेकलेने वाढतोय
मी जाळेच असे बांधतो आहे
कि ज्यात मी ट्रॅप होत नाहीये
माझे उंदीर मांजरांना कुरतडतायत
म्हणून म्हणतो
आडवे नका जाऊ
आडवे व्हाल
आणि माझा क्रूस आकाशापर्यंत व्हर्टिकल होत
तुमच्यावरून सहज चालून सत्यापर्यंत पोहचेल
***
दोन तर चॉईस आहेत
कुटुंब किंवा मोक्ष
समाजाने स्पॉन्सर केलेला मोक्ष
ह्यात आहे कुठे ?
समाज ईश्वराचीही सोमिओडीटी बनवतो
म्हणून मीही सोमिओडीटी बनू ?
जो कमोडिटीही बनला नाही
तो सेमिऑडिटीं काय बनणार ?
स्वतःला शाबूत ठेवण्याची विद्या
माझ्यात जन्मजात आहे
ठीक आहे
तुमच्या हातात सत्ता आहे
कायदा आहे
पोलिस आहेत
पण म्हणून माझ्या कवितेला लोटांगण घालायला लावू ?
तुम्ही माझ्या पार्टनरला फितवलं म्हणून
स्वतःचं काळीज तुमच्या रक्तात मिसळू ?
कागद उजाडला म्हणून काय झालं
मी त्वचेवर कविता लिहून
तिचे फोटो प्रकाशित करेन
लेखणी तुटली म्हणून काय झाले
मी रक्त भरून
त्याची शाई बनवून
कवितेचा टॅटू सर्वांगावर उमटवेन
मी मोक्षाच्या मागे आहे
यशस्वी होणाऱ्या नवसाच्या मागे नाही
देवाचे आशीवार्द तुम्हाला लागतात
मला तर आख्खा देव लागतो
मी चाललोय मुक्त स्वतंत्र
आणि माझी पशुसारखी दिसणारी सावलीही
दैवी बनत
माझ्या मागोमाग येतिये
***
समाधान
मला व्हाया ज्ञानेश्वर
व्हाया नामदेव
व्हाया एकनाथ
व्हाया तुकाराम
विठ्ठलापर्यंत पोहचायचेच नाहीये
मला व्हाया विठ्ठलही
सत्यापर्यंत पोहचायचेच नाहीये
मला सत्याचे थेट दर्शन घ्यायचे आहे
मला सर्वच पंथ प्रदर्शन वाटतात
म्हणूनच कुठल्याही दिण्डीत सामील न होता
मी एकटाच चालतो आहे
कदाचित विठ्ठल मला पावणार नाही
कदाचित सत्य मला दिसणार नाही
पण मी माझ्या पावलांनी माझ्या अटीवर
मीच तयार केलेल्या वाटेने चालतो आहे
हे सुख काय कमी आहे ?
माझ्या ह्या एकचालीला तम्ही बदचाल म्हणू शकता
शेवटी हे युग समूहचालींचे आहे
आणि मी ते माझ्या पावलांनी वितळवत
त्याच्या धातूने आत्ममुद्रा घडवत
सगळीकडे खुळखुळतो आहे
माझा आवाज मोठा नाही
पण प्रामाणिक आहे
माझा गळा त्याने समृद्ध होतो आहे
आणि माझा पायरव त्याची बोटे पकडून
सत्याच्या दिशेने चालतो आहे
मला सत्य मिळो ना मिळो
माझा आवाज मला माझ्या गळ्यात मिळाला
ह्यातच मला समाधान आहे
***
संवाद
मी चीड आणणारा भक्त आहे
कारण मी देवही संशयास्पद करतो
तुम्ही भीड बाळगणारे भक्त आहात
कारण तुम्ही देव श्रद्धास्पद करताहात
मी निर्भीड आहे
म्हणूनच माझ्या आसपास भीड नाहीये
तुम्ही भीड आहात
म्हणूनच तुमच्या आसपास मी नाहीये
ही केस
आपणाला जोडतीये
मात्र हा संवाद आहे कि विवाद
हे मला ठाऊक नाही
पुलाचे बांधकाम चालू आहे
मी केऑस लांबणीवर टाकत नाहीये
फक्त त्यातील पूर्वग्रहाचे विष काढून टाकण्याची
युक्ति शोधतोय
जिथे दातच दंतकथा बनून गेलेत
तिथे कविताही ज्युसेबलच लागणार
माझी शैलीच अशी कि
मी वाचकांना खडे चघळायला भाग पाडतो
पुन्हा पुन्हा चावायला लावणारा लेखक
कुणाला आवडेल ?
मी मराठीत लोकप्रिय नाही
आणि दखलपत्रही नाही
त्यामुळेच मी तुमच्यात दाखल होण्याची शक्यता सुतराम नाही
तुम्ही मला टाळून पुढे का जात नाही ?
MOST HATED POET च्या पोस्टरवर
माझा फोटो कशाला
मी द्रष्टा आहे
हा माझा गैरसमजही असू शकतो
मला टाळून
सरळ पुढे जा ना
बघा मी नुस्ते म्हंटले
आणि भराभर सर्वत्र हिरवे सिग्नल पडले
जा
फक्त माझ्या अंगावर गाडी घालून जाऊ नका
म्हणजे झालं
***
डाऊनलोडिंग
।। १ ।।
केवळ पोस्टमॉडर्निझमला
शह म्हणून
मला नवा मेगॅयुटोपिया रचायचा नाहीये
मला फक्त नवे क्षण
नव्यानेच जालवत
स्वतःला सर्वत्र विणायचे आहे
मला माझ्याकडे केऑसचे ऑर्केस्ट्रेशन करून
नव्या साऊंडची ध्वनीनिरपेक्ष शांतता साधायचीये शांति साधायचीये
शक्यता नापास झाल्या म्हणून
त्यांच्यावर प्रयोग करणे मी
थोडेच थांबवू ?
मीडियाटिक वास्तववाद
पोर्नोग्राफिक वास्तववाद
नंगानाच घालतायत म्हणून
मी थोडाच स्वतःचा ट्रान्सडन्स बंद करू ?
माझ्या आत एक ट्रान्सबाला आहे
जी नाचते
आणि हे नवे युगही वाचते
तिचे हावभाव क्वोटेबल नाहीत
मेजरेबल तर मुळीच नाहीत
फक्त मुमेंटेबल आहेत
आणि मुमेंटफ्रेंडलिही
आहेत
तिचा आउटगोईंग एफर्ट 'रटाळ ' इरेझ करत जातो आहे
तर तिचा इनकमिंग इफेक्ट 'मेंदू ' रिचार्ज करतो आहे
'मी ' अनेक आहेत - रिचार्ज्ड - डिस्चार्जड - कायम चार्जड - माझ्या मेंदूत
आणि 'मी ' ह्या शब्दाला पर्याय नाही
म्हणूनच अनेक 'मी ' च्या तोंडानी मी /आम्ही बोलतोय
माझे पोस्टर तुम्हाला भेटणार नाही
कारण पोस्टमॉडर्निझम सर्वाना पोस्टर बनवत असताना
मी स्वतःची डिजिट्रेट्स बनवत होतो
आणि डी जे बनून वाजवत होतो
लोक म्हणालेही कि किती आत्मकेंद्रित हा
स्वतःचीच लाल करतो
त्यांना माहित नव्हते कि
ते त्याच रंगात रंगतायत
ज्या रंगात मार्केट त्यांना स्पॉन्सर करतंय
।। २ ।।
मी नगरकर ही आहे खेडेकरही
उड्डाणही आहे आणि चट्टानही
मी चांगदेवानी पाठवलेला कोरा कागदही आहे
आणि ज्ञानेश्वरांनी
ज्या हाताने भिंत चालवली तो हातही
माझा आशय पहा
मी माझे गर्भाशय इनडिटेल त्यात मांडले आहे
मी मुळांना हात घालतोय
कुळांना लाथा
माझे घराणे केवळ श्वास घेत नाहीये
ते आख्खे वातावरण इकोफ्रेंडली सुरात गाते आहे
मी माणसाचे पाणी ईश्वरावर शिंपडून त्याला जिवंत करतोय
माझ्यात दोघेही जिवंत होतायत
मी अनेक विटांवर अनेक कटीवर
माझे अनेक हात ठेवतोय
आणि एक डिजिटल भाषा
एका नव्या युगाचा नवा अभंग म्हणून
मला तिच्यात डाउनलोड करतीये
***
घर सोडताना
घर सुटताना हे केसमुळे सूटतय ह्याचं दुःख
घराला आगगाडी म्हणतानाही
हे घर आपलं आहे
ह्याची उबदार जाणिव
खणखणत तोल सांभाळायची
फुलांनी धक्का दिला तर सुवास घर सांभाळायचा
खिडक्या गरम झाल्या तर वारा गारवा ओतत जायाचा
आपण दोघेही पाऱ्यासारखे एकाच थर्मामीटरमध्ये अडकून
आता निघतोय
तर ताप तडकतोय
विखुरलेल्या वैभवाचे अवशेष शोधत
निमर्नुष्य जगायला लागलेलो नुक्तेच आपण
आणि आता हा समूह
टोळ्यांच्या तडजोडींना आपण दुखावले म्हणून
आपल्यावर चालून
कुठलेच नाते एवरग्रीन नसते
जे हिरवे असते ते पिवळे होऊन गळून पडते
ऋतूसंहाराचा शेवटचा धडा वाचताना
हे केसचे नवीन पुस्तक ?
निळ्या लाटावर चुंबन लिहिणारे तुझे ओठ वाळतायत
तुझे श्वास नाकात फ्रिडम स्ट्रगल करतायत
परफ्युम शोधता हे नरक का उगवले
की स्वर्गाच्या सुवासाचा हा कायदेशीर कावा आहे ?
ताटातून ताटातूट आवाज करतीये
निरोप पुनर्भेटीविषयी साशंक आहे
मी घर सोडतोय
कि समुद्र दोन्ही हातांनी उधळत
स्वतःला वाळवंटावर क्रुसिफाय करतोय ?
***
तू
माझी बुडणारी कविता तरंगायला
मी काही तुकाराम नाही
आणि तुही नाहीस त्या तुकारामाचा विठ्ठल
ही केस तरंगेल की बुडेल
मला माहित नाही
मी घाबरलोय असेही नाही
फक्त माझ्या आवाजाला गेलेला तडा
माझा गळा कापेल
ह्या प्रश्नाने संशयित आहे
श्वास तुकारामाच्या नावाने आत येतायत
आणि फुफ्फुसं स्फोटक होत उन्हाळा वाढतायत
मी मरतोय तरंगतोय
भोवताली रद्दीची इंद्रायणी
आणि माझ्याच फुफ्फुसांनी मला लावलेली अभंग आग
***
देव
मी गणपतीपुढे बहाणे शिलगावले अभ्यास न
करण्याचे
हनुमानापुढे खोट्या उड्डाणाची नाटकं केली आणि सूर्याचे कपडे काढले
मी बिरोबापुढे
कंटाळवाण्या दफ्तराचे शिरकाण केले
रामापुढे धोकादायक भुतांची ऐतिहासिक भुताळसेना पळवून लावली
मी दत्तात्रयांपुढे सर्व विषयांची कुत्री बांधून त्यांचे भुंकणे पहिले
प्रत्येकवेळी मी सेफच राहिलो
आणि मला खात्री होती
देव माझी सेफ्टी कधीच धोकादायक करणार नाहीत
देव होते माझ्यासारखेच निरागस
आणि माझ्या स्टिकरसारखेच जवळ बाळगावे इतके सुंदर
मी काहीही केले तरी
ते कधीच माझ्या बालपणावर कोपले नव्हते
त्यांचा कल्ट खेळकर आणि गंमतदार होता
आज त्यांचा कल्ट मला सोडून चाललाय
माझ्या आतील बालपण सपाट होत चाललंय
वाटतंय की माझ्या आतील देवांचा मर्डर झालाय
आणि त्यांची शवे भक्तांपुढे सरेंडर होऊन
श्वासात फम्बलतायत
मी केसच्या कागदपत्रांच्या ढिगात
ढगासारखा बसून फम्बलिंग पाहतोय
निगेटिविटीचा तडका माझ्या रक्ताला डसत चाललाय
मी सोंग करतोय
कि मी काहीच गमावलेले नाही
आणि माझे देव
माझ्या डोळ्यांपुढून स्वतःची आत्महत्या
जिवंतपणाचा कसलाही आवाज न करता
भक्तात रेटत
माझ्यातून नाहीसे होतायत
मी देव गमावतोय
आणि भक्त
त्यांनी कमावलेला देव
माझ्यावर लादत
ताकद कमावतायत
***
अश्लीलतेचा काळोख माझ्या अंगावर टाकून
मला लोक सांगतायत
ही लाइमलाईट प्राप्त करण्यासाठी कॉन्स्पीरसी आहे
माझ्या शोकात्मिकेचे सेटिंग लावून
लोहार निघून गेला
दुष्ट परिणामांच्या पुलाखालील पाण्यातून
मिडिओक्रसी टिकवणारे कुठल्या सनातन लोणच्यातून
जन्म घेतात कुणास ठाऊक
हे काहीसाठी चविष्ट काहींसाठी बेचव
माधव नावाचा नेब्युला जाणीवपूर्वक उजळणी भडकवतोय पत्रकारितेतून
अश्लीलतेच्या आतील पवित्रता कुणालाच दिसत नाहीये
काळोख काळे गुलाब स्पॉन्सर करतोय
आणि कवितेचा दगड उमलण्याचा हट्ट कायम राखत
सर्वांगाने झुंजतोय
त्याचा परमेश्वर होणार की नाही माहिती नाही
पण तो
एका बांधकामाचा पाया होईल हे नक्की
बांधकाम चालूच आहे
आणि ते ह्या निरव शांततेतही फक्त मलाच ऐकू येतंय
***