Tuesday, December 15, 2015

जग निर्मिति 
देव दुनिया बनवत होता तेव्हा
आंधळे वाजवत होते त्यांचे डोळे
बहिरे त्यांचे कान
मुके बडवत होते त्यांच्या जिभा
पांगळे उडवत होते त्यांचे पाय
फक्त थोटय़ांनाच कळत नव्हतं
आपल्या हाताचं काय करायचं ते 

देवानं त्यांना हातात घोडा देऊन 
आपल्या दुनियेत पाठवलं.


श्रीधर तिळवे नाईक 
चॅनल अंडरवर्ल्ड ह्या प्रकाशित संग्रहातून
--------------------------------------------------------- 
अरेस्ट वॉरंट निघालं म्हणून ''
अरेस्ट वॉरंट निघालं म्हणून कसलाही धोका न पत्करता मी पत्करला पळून जाण्याचा जुजबी मार्ग!
वाटेत दाढी वाढवली.
सेफ्टी पिना विकल्या. खोटी नावं धारण करून लोकांना खरी घरं बांधून दिली आणि प्लास्टिक सर्जरी करून काढलं स्वस्त दरात इलाज करणारं हॉस्पिटल.
शेवटी एकेदिवशी फार दुखतंय म्हणून केल्या स्वत:च्या टेस्ट्स डीनच्या खुर्चीत बसून तर रिझल्ट आला एकमतानं ‘‘कॅन्सर.’’
मी बायकापोरात जाऊन मरावं म्हणून हिंदुस्थानात परतलो तर बायकोनं दुसरं लग्न केलं होतं आणि पोरं ऑस्ट्रेलियात जाऊन सेटल झालेली.
शेवटी हे सगळं आपल्याच पापाचं फळ म्हणून उभा राहिलो पोलिसांसमोर आणि म्हणालो, ‘‘अरेस्ट करा’’. पोलीस म्हणाले, ‘‘आम्ही तुला ओळखत नाही. ज्याच्या नावाने अरेस्ट वॉरंट होते त्याला आम्ही सात वर्षांपूर्वीच एनकाउंटरमध्ये मारला.’’

श्रीधर तिळवे -नाईक 
चॅनल अंडरवर्ल्ड ह्या प्रकाशित कवितासंग्रहातून 



No comments:

Post a Comment