चॅनेल :स्त्रीवाहिनी प्रकाशनवर्ष जुलै २००४ शब्दवेल प्रकाशन
श्रीधर तिळवे
मॉडेलिंग
काहीच कसं जुळून येत नाहीयं
यश
आयुष्य
तंबोरा
संसार
ह्या इतक्या तारा
आणि इंटरनेटींग कुठंच नाही
केवळ इंटरनॉटींग विदाऊट फ्लो
आणि त्याचा फॉलोअप
कित्येक बिल्डिंग्ज चढवत न्हेल्या
कित्येक इनिंग्स उभारत न्हेल्या
कित्येक लिंकिंग्ज बांधत न्हेल्या
पण प्रत्येकवेळी लीकेज
आणि ब्रेकेज
लगेज पुन्हा आहे त्या ठिकाणीच
यश चाकाकलं
पण सोनं सापडलं नाही
दोस्त प्रतिस्पर्धी झाले
मैत्रिणी कट्यारी
कित्येक सफारी फक्त फोटो पहात संपल्या
बिझनेसच्या जागी बिझनेस राहिला
इझनेसचा जागी इझनेस
इझिनेस बळी घेत राहिला क्वालिटीचा
आणि चीपनेस
सरकारी भ्रष्टाचारासारखा आयुष्य पोखरत राहिला
आता पुन्हा एक ऑफिस थाटून
बसलीये ह्या बाजारात तर
मनात असेलला रांडेचा फील
काहीकेल्या जात नाहीये
असं वाटतंय
एक सार्वजनिक बलात्कार होणाराय माझ्यावर
आणि मी त्याचं व्हिडीओ शूटिंग विकून
पैसे कमावणार आहे
किती मुश्किल केलय एका बाईला
इमानानं बिझनेस करणं ह्या सोसायटीनं
कुठे आग तर कुठं फुफाटा
प्रत्येक रॅम्पवर जळत जाणं अटळ आहे
माझ्यातला बुद्ध नवऱ्यासारखा मरून गेलाय
आणि लोक मला सती न्हेण्याची तयारी करतायत
ढोल वाजतायत
आणि मी
रांड
सती
आणि सीता
अशी त्रिगुणी होत
ह्या बाजारातून मॉडेलिंग करत चाललीये
***
डाटा
सगळा डाटा करप्ट होत चाललाय
पॉवर्टी लाईन नाहीशी होतीये
पॉवर्टी लाईनीत
टाईम्स ऑफ इंडिया काढत नाही पॉवर्टी सप्लीमेंट
भूक चॅनेलवरील चर्चेचा विषय बनतीये
श्रमाचं पोट गेलय खपाटीला
त्याला सक्तीची व्ही आर एस मिळालीये
प्रत्येक डोळ्यात साकळतोय तणावाचा एक अश्रू
ग्लोबलायझेशनचा समुद्र
उकळत बसलाय आयुष्याचा नासलेला ढग
पाऊस पडेल न पडेल
पण विहिरीतून मात्र उगवतायत
कोकच्या बांधेसूद बाटल्या
लोकांना मिळत नाहीये प्यायला पाणी
आणि सर्वत्र उभे होतायत शुद्ध पाण्याचे मलखांब
म्युझिक आणि मनी
एकत्रच प्रसवतायत वासनेचं ग्लोबलायझेशन
व्हीजेंचे पीजे मांडतायत
कसं जगावं याचं बहूउपयोगी दर्शन
सगळे व्यास वाल्मिकी
सोप ऑपेरा लिहीतायत कलियुगातले
आणि गुणाढयांच्या बृहत्कथा
ट्रान्सलेशनसाठी रांगा लावून उभ्या आहेत
डेल कार्नेगीनं सुरु केलय
मॅनेजमेंट युगासाठी फिटनेस शिबीर
नोटा वितळतायत काळाच्या फेक डोळ्यात
शेक देत
आता मृत्यू होईल तर तोही जागतिक
चिता जळेल तर तिचेही जगभर प्रक्षेपण
प्रसिद्धीची इतकी गॅरन्टी कुठल्या काळात होती भौ ?
अम्नेशिया मात्र सर्वत्र काळात होता
मी आताच लिहलेलं विसरत चाललीये
आणि तुम्ही काल काय झालं म्हणून काय विचारतायत ?
***
घर - २
कितीही बाजारात फिरले तरी
शेवटी परतणार घरातच
हे बाजारातील टोमॅटो
हा टोमॅटोतील बाजार
शेवटी माझ्याच पावभाजीत टोमॅटीक शिजणार
ही सर्फची सफेदी शेवटी
माझ्याच कपड्यात चमकणार
तुम्ही ग्लोबल बाजार कितीही एक्स्टेन्ड करा
शेवटी त्याला माझ्या घराच्या आतच सेटल व्हायचं आहे
म्हणून ह्या मार्केटमध्ये मी बिनधास्त हिंडतीये
माझे घर तुमच्या बाजारापेक्षा मोठेच आहे
***
कवी
एक उत्तर आधुनिक अराजकच मांडलय माझ्या भवताली
आणि कविता खपताहेत फ्री कमोडिटीसारख्याच
कवी बाजारातच उभे आहेत
सगळेच स्वतःचं मार्केटींग करायला उत्तम शिकलेत
कवी हल्ली मोर्चे काढत नाहीत
कवी टोळ्या चालवतायत
एक माफियागिरी चालू आहे कवितेचा पोटात
आणि भाई लोक जाहिराती मिळवण्याच्या स्किलवर
संपादक झालेत
कवी महाकवींनाही ट्रान्सलेटर म्हणून मॅनेज करू शकतात
महाकवींची क्वेस्टही मॅगेझिन चालवण्यापुरती मर्यादित झालीये
कवी राजरोस दरोडा घालतायत दुसऱ्यांच्या कवितेवर
आणि चोरी केलेला माल स्वतःचं लेबल लावून खपवतायत
ओरिजनल बाजारात येण्याआधीच
कवी उल्हासनगर असोसिएशन चालवताहेत
आणि यु. एस. ए. ला जाण्याची स्वप्नही पाहताहेत
कवी इंग्रजी शिकवताहेत
स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतायेत
आणि वर पुन्हा मराठी टिकवण्याच्या परिषदेत
उसाहाने भागही घेतायत
कवी दांभिक होतायत राजकारणी होतायत
आणि कवितेतून नैतिकतेचा उपदेशही करतायत
कवी पटवतायत की शेवटी कवीही माणसंच आहेत
आणि कवी कवितेतही करिअर करू शकतात.
कवींनी कवितेचा कवीचा अर्थच बदलून टाकलाय
कवींना कळून चकलय
भाषा आणि कामाठीपुरा ह्यांच्यात फरक उरलेला नाहीये
कवींनी स्वतःला झालेला एड्स सर्व भाषेत वाटून टाकलाय
कवींचा मृत्यू निश्चित झालाय
आणि म्हणून कवी आजकाल कंडोमच्या जाहिराती लिहीतायत
चांगली कविता आजकाल
कवींपासून कंडोमच्या अंतरावर उभी आहे
तिने कवींना कल्पना न देता
कवींपासून स्वतःला सुरक्षित ठेवलय
कवितेचे हे बायकी कसब सनातन आहे
आणि कवी अशाश्वत असल्याने
त्यांना ह्याही शतकात हे माहीत नाही.
***
ही भाषा मेली स्त्रीलिंगीच आहे
तो प्रॉब्लेम नाही
पण ती पुरुषसत्ताक वडाभोवतीच फेऱ्या मारते
आणि जन्मोजन्मी हाच पती मागते
हा प्रॉब्लेम आहे.
तिला कितीदा समजावलं
कविता लिहिणं म्हणजे काही वट पौर्णिमा साजरी करणं नव्हं
परंपरेचं सूत नाकासमोर धरून चालण्यात
कसली आलीये स्त्रीशक्ती ?
पण तिच्या फेऱ्या मारणं सुरूच
आणि पुरुषांच्या पारंब्या पकडून
सूरपारंब्या खेळणंही सुरूच
आता सुरवातच अशी तर शेवट काय होणार ?
म्हणूनच मी आख्खा वडच उलटा करून
कवितेत लटकवून दिलाय
ब्रह्मांड उलटं टांगलं
की स्त्री सुलट होते हा माझा अनुभव आहे
कविता लिहिताना
एवढं शहाणपण ठिकाणावर असलंच पाहिजे की.
***
जे सांगायचं असेल ते सहज सांगता यायला हवं
सरळ आणि थेट
भाषा संवाद साधण्यासाठी आहे
संवादात लपण्यासाठी नाही
ज्यांना बाळंत व्हायचे असते
त्यांना कपडे काढावेच लागतात
मी त्वचेविषयी बोलत आहे
आणि तू पुन्हा फॅशनवर घसरलाय
माझे नागवेपण सहन करायला शिक
डोळ्यांना एवढी तरी समृद्धी शिकव
किंवा काही क्षण तरी नीट आंधळा हो
मी स्पर्शासारखी आहे
आणि स्पर्शात लपायला जागाच नसते
असायला असते
स्पर्शात ये
आणि अस
आहे शीट !
पुन्हा तुझे कपडे आणि त्यांच्या फॅशन्स
***
हत्तीण उडाली आकाशी
तिचे लक्ष आंधळ्यांपाशी
अजूनही माझ्या शरीराची अवयवच चाचणारे आपले सहा कुटुंबमित्र
आणि मी मातृत्वातून आकाशात घेतलेली ही हनुमानउडी
साऱ्या पृथ्वीवर पसरलाय पुरुष गुरुत्वाकर्षणासारखा
किंवा गुरुत्वाकर्षण पसरलंय पुरुषासारखं
माझं प्रत्येक क्षण न्यूटनसारखा गुरुत्व कॅलक्युलेट करत बसलाय
माझ्या काळजाचा चन्द्र फिरतो आहे
कॅलक्युलेटर झालेल्या पुरुषी तिढ्यात
मी उसळवते आहे आकाशातून
कॅलक्युलसमधून एस्केप होत
तुमच्या पुरुषी काळजावर
अवधानाच्या स्त्रैण लाटा
आणि तुम्ही सातहीजण रक्ताची भरती ओहोटी
ही रोजचाच तमाशा असल्यासारखी पहात
दारू पिऊन उभे स्वतःच्याच काळजात
ना तुमचे स्वतःतील हत्तीकडे लक्ष्य
ना तुम्हाला स्वतःला डोळस होण्याची इच्छा
तुमचे हे आंधळेपण
आकाशातही माझ्यावर तालवारीप्रमाणे लटकते आहे
आणि मी माझी मान वाचवत
तुमच्यातील अदृश्य हत्तीकडे संपूर्ण पहात आहे
मला उमगत चाललंय
तुम्ही हत्ती आहात
आणि आंधळेही आहात
हा तुमचा दोष नाही
मी स्वीकारत चाललीये
मी हत्तीण आहे
आणि चक्रधरही आहे
ही माझी कुवत आहे
***
खूप खाली कोसळताना
पुन्हा मांजरासारखं सुलटं उभा राहता आलं
की जिंकल्यासारखं वाटतं
आयुष्य वासनेपासून सुरु करता येतं
आणि मोक्षापासूनही
फ्राईड वाचून बापाशी रत होता येतं
आईशी अविरत होता येतं
आणि विवेकानंद वाचून नवऱ्यातही मुलगा पाहता येतो
बायकोत कुंडलिनीची कुंडलाई
खूप खाली कोसळताना
वर पाहता येतं
खालीही पाहता येतं
खूप खाली कोसळताना
कोसळणंही पाहता येतं
खूप खाली कोसळताना
कोसळणं पाहताना
डोळे खोलवर न्हेईन
आणि लख्ख उजाडेल
खूप खाली कोसळताना
आता फक्त त्या
खोलीची प्रतिक्षा आहे
***
प्रत्येक बाई सारखाच विचार करते
नवऱ्यानं आपल्या शरीराचं मीठ खाल्लं आहे
त्यामुळे तो आपल्या शरीराशी इमानच राखील
मलाही पहिल्या रात्री शरीर मिठासारखंच जाणवलं
आणि रात्र चढत गेली तशी त्याची साखर झाली
वर्ष गेलं
एकमेकात तिळगूळ वाटत
आणि एकदिवस संक्रांत आली
आणि जाणवलं
तुझं शरीर मिठाचे दोन दोन ब्रॅण्ड बाळगून आहे
एक माझा
एक तिचा
मग आयुष्य कालांतराने खारट होत गेलं
आता माझी सवत
तुला पोटभर शरीर खायला घालत असेल
आणि मीही अशी तुझ्या मित्रासोबत
त्याची साखर डायबेटीसी आहे
हे कळून सवरून
त्याच्या नग्न शरीरात
मला साखरेचे कित्येक ब्रॅण्ड दिसतायत
आणि मी आला दिस गोड करत
आपल्या बेडरूमचं गोडाऊन करत चाललीये
तू संध्याकाळी येशील
माझ्या बोलण्यात जमलेल्या मुंग्यावरून
साखरेची चाल ओळखशील
आणि रात्री माझ्या पोटमोऱ्या देहाकडे उदास पाहत
तिच्या मिठात विरून जाशील
गेल्या कित्तेक रात्री ह्या अशा क्रॅकजॅकच्या चालल्यात
***
बायका आजकाल आयुष्य असेम्बल करायला लागल्यात
त्यांना वाटतं की
पुरुषांच्या मल्टीनॅशनल्सशी फाईल करण्याची
हीच सुसह्य रीत आहे
त्या सहनशील झाल्यात
आणि स्वस्तही
त्या स्वतःचं मार्केटिंगही करायला शिकल्यात
आणि बॉडी हवी तशी मोल्ड करायला शिकल्यात
त्यांचे बांधेसूद बांधे
पुरुषांना घाम फोडतायत
आणि बायका पुरुषांनीच शोधलेली सौन्दर्यप्रसाधनं लावून
स्वतःची त्वचा नितळ ठेवतायत
पुरुष बायकांसाठी सौन्दर्यस्पर्धा ठेवतायत
त्यांना वाटतंय की
बायकांना सौन्दर्यात गुंतवलं की
त्याचं पुरुषांच्या कुरूपपणाकडं लक्ष्य जाणार नाही
पुरुषांना स्वतःच्या रंगाचा उंचीचा शरीराचा
भयंकर कॉम्प्लेक्स आलाय
आणि बायका जगभर केस उडवत
स्वतःच्या सौन्दर्याचं ग्लोबलायझेशन करतायत
बायका दिवसेनदिवस सर्वत्र पसरत चालल्यात
त्यांना माहिती आहे
त्या जिंकताहेत
आणि पुरुष ते हरतायत जे न ओळखता
बायकांच्या विजयाचं मार्केटिंग करतायत
बायका धूर्तच आहे नेहमीप्रमाणं
त्या पुरुषांना काहीच जाणवू देत नाहीयेत
आणि पुरुष सगळं जाणतायत ह्या अहंकारात
बायकांच्या पोटात
नवा जन्म घेण्यासाठी उभे आहेत
***
(जोसेफ प्रिस्टले , अँटोनी लॅव्हॉयझर आणि कार्ल शिले ह्या प्राणवायूच्या (ऑक्सिजन ) तीन संशोधकांना )
तिघांनी प्राणवायू शोधला मांडला
एकाला धर्माने इंग्लंडहून अमेरिकेला मायग्रेट केला
दुसऱ्याला फ्रेंच राज्यक्रांतीने गळ्यामधून कापला
आणि तिसरा
संशोधनासाठी सायनाईडची संयुगे खाऊन उपेक्षित मेला
तेव्हापासून प्राणवायू रक्तलांच्छित आहे
तरीही माणसात रक्त तयार करण्याची जबाबदारी
त्याने सोडलेली नाही
त्याचा माणसावर विश्वास आहे
माझ्याप्रमाणेच
मी श्वास घेत असते
तेव्हा माणसावर विश्वास दाखवत असते
माझी माणुसकी ही अशी प्राणवायूवर आधारित आहे
मला खात्री आहे
ती प्राणवायूइतकीच भरभक्कम आहे.
***
श्रीधर मला आवडतो
कारण तो महाशॅव्होनिस्ट आहे
आणि तसाच कवितेत दिसतो
दिलीप मला आवडत नाही
कारण तो शॅव्होनिस्ट आहे
पण कवितेत तसा दिसत नाही
मी श्रीधरला सुधारू शकते
दिलीपला तो सुधारलाय
अशी पक्की खात्री त्याच्या कवितेने पटवलीये
मी श्रीधरशी बोलू शकते
दिलीप आणि मी ह्यांच्या दरम्यान
दांभिकतेची चायनीज वॉल आहे
मी त्या पोयेटीक वॉलवर जाऊन
फारतर मॉलशॉपींग करू शकते
श्रीधर बरोबर मात्र मी एका घरात राहू शकते
***
एक राखी पाठवतीये काळजातून
तिच्यात सूर्य आहे, चंद्र आहे
आणि तुझी माझी जन्मकुंडलीपण आहे
तुझ्या हातातील ग्लोवज काढून ठेव
तुझी निमूळती बोटं अधिकच लांब कर
आणि राखी उचल
मात्र नखं आधीच काप
म्हणजे ती दुखावली जाणार नाही
माझं रक्त वाहतय तिच्यातून
आणि आपलं कॉमन जेनेटिक कोडही
तुझ्या माझ्या सहवासाचा एक एक दिवस
मी टाईप केलाय तिच्यात माझ्या डोळ्यांनी
माझं टाईपिंग वाईट करू नकोस
निदान पोर्णिमेचा अस्त होईतोवर
एक टेलिपॅथीही टेप केलीये तुझीमाझी
माझी तबल्याची साथ तुला आवडायची
तुझा वाहता गळा आजही माझ्या आयुष्याचा लळा आहे
आपण एकत्र सोसलेल्या झळा
ह्या टेलिपॅथीत आहेत.
वडा, सामोसा, मसाला डोसा, मिसळ
माझ्या कित्तेक हॉटेली चवींचा पहिला परीचय तुझ्यापासून सुरु होतो
तुझे आध्यात्मिक डोळे माझी आजही समजूत घालतात
आणि जीज्ञासेचे वेफर करकर आवाज करत मी सहज संपवते
तुझा हॉटेलमधला शांत रसिक चेहरा आठवत
मी टॉवेलला हात पुसतीये
तर आपण एकत्र केलेली रोज रात्रीची जेवणे
माझ्या किचनमध्ये आवाज करतायत
"सापांना दोर समज
म्हणजे चालणे सोपे होईल "
माझ्या पावलातली सगळी भटकंती
तुझ्या मॅनेजमेंट स्किलचा परीणाम आहे
आणि माझी चालण्याची झील आजही कायम आहे
डॅडींच्या शतपावल्या मला आठवतायत
आईकडेचे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष्य मला सहन नाही व्हायचे
तर तू माझी समजूत घालायचास
आणि माझ्या बरोबर चालायचासही
तुझ्या शतपावल्या अधिक कठीण होत्या हे आता कळतंय
तुझ्या मित्राच्या प्रेमात मी प्रथम पडले तेव्हा तू मूक
माझ्या भुकेचा पियानो कर्कश वाजत राहिला
एक सिम्फनीं वाजता वाजता बेसूर होत गेली
पुन्हा शांतता
प्रत्येक ऍपिअरन्स गेस्ट ऍपिअरन्स किंवा घोस्ट ऍपिअरन्स
आणि शेवटी नेहमीप्रमाणं तूच बरोबर निघालास
आता पाठीची त्वचा आरश्यात न्याहाळतीये तर
त्यात संशयाने थरथरणारी तुझी नाकपुडी दिसतीये
तुझा श्वास आजही मी पाठीत भरून घेते
आणि कुंडलिनीत मरून जाते
तू मला पुन्हा जिवंत करशील ह्याची हमी
आजही चुकलेली नाही
ह्या दोऱ्यात ती हमी मी ओवलीये
मला खात्री आहे
ही राखी तू अलगद मनगटावर बांधशील
आणि तुझे काही श्वास माझ्या नावाने हवेत सोडशील
तुझे ते मोजके श्वास
मला वर्षभर जिवंत ठेवण्यासाठी पुरेसे आहेत.
***
मुक्ता म्हातारी झाली नाही
की तरुणही झाली नाही बहुधा
ती मुलगीच राहिली गाणं गुणगुणणारी
तिला एम. सी. आली होती का?
तिच्या कवितेत तरी तसा उल्लेख नाही
एम. सी. येण्याआधीच मुक्ती
वक्ष फुलण्याआधीच मोक्ष
तिची त्वचा गोरीच असणार
त्यामुळे काळी असण्याचा कॉम्प्लेक्स तिच्यात निर्माणच झाला नसणार
बाईच्या मोक्षात काळा रंग
फेअर अँड लवलीच्या ऍडसारखा आडवा
तिचे भाऊही गोरेच बहुधा
ती वाळीत टाकली गेलेली ब्राम्हण
म्हणजे अनटचेबलच
बलात्काराच्या समस्येने त्यामुळे फारसे सतावले नसणार तिला
आणि लहानपणी लग्न होण्याची शिक्षा
आपोआप रद्द झालेली
आता इतके सगळे फेवर्स
व्यवस्थेने लादलेले
मग मुंगी आकाशी उडेल नाहीतर काय ?
कधीचा शोधतीये
पण तिने गिळलेला सूर्य काही मला सापडलेला नाहीये.
***
ती अमेरिकेत भेटली तेव्हा मी बर्फात गोठलेली
काळजाचा ससा गोठून देहाच्या फ्रिजमध्ये
आणि ती माझ्याकडे चीज मागायला आलेली
अनमेरिकन
तिच्या स्कर्टच्या उघड्या मांड्या बघून माझी आई थंडावली
आणि बाप सापासारखा पुरुष झाला
तिनं माझ्या बापाला नजरेत झुकवलं
इंडियन कल्चरवर काही प्रश्न विचारले
आणि बाईकवर बसून आली तशी गेली
तिची उघडी पाठ
न सुटलेल्या कापसाच्या गाठीसारखी
क्षणात दिसेनाशी झाली
मग एका ट्रीपमध्ये आम्ही ब्रेसिअर्स शेअर केल्या
नाईटीज शेअर केल्या
तिचा वास तिचाच होता
त्याला उपमा देताना मला एकही इंडियन फूल सुचलं नाही
ती लेस्बियन नव्हती
तरीही एकदा तिने माझे स्तन दोन मिनीट चोखले
भारतीय चोळीबद्दलची तिची उत्सुकता त्यानंतरच शमली
तिच्या देहात सूर्य वितळवत जाताना
माझा सावळा रंग तिला अधिकच उजवा वाटायचा
आणि मी पोहायला उतरले की
समुद्राच्या पाण्यात खास इंडियन मुद्रा उमटते
असं तिला वाटायचं
ती ख्रिश्चन होती
पण माझ्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर ती
कसलेल्या भक्तासारखी नम्र व्हायची
गणपती तिला आवडायचा
आणि रविशंकरची सतारही
मात्र इंडियन्स प्रचंड दांभिक आहेत
असं तिचं स्पष्ट मत होतं
मी तिच्या ई-मेलला कसलाही प्रतिसाद द्यायचे नाही
भेटायचं तर डायरेक्ट भेट
असं मी तिला इंडियन ठसक्यात म्हणायची
भारतीयांनाच प्रथम शून्याचा शोध लागला
हे तिला मान्य होतं
असा शोध फक्त आळशी माणसांनाच लागू शकतो
असं ती म्हणायची
मी मात्र निर्वाणाला पोहोचल्यानंच हे शक्य आहे
असं दणकून सांगायची
तिचे निळे डोळे
तिच्या बापाच्या जेलयात्रेने काळवंडायचे
त्याची फाशी निश्चित होती
मात्र त्याच्या मृत्यूखालीही ती जीवनात नांदत होती
तिचा बाप मेला आणि ती नाहीशी झाली
आणि कुणालाच दिसली नाही
तिच्या दारातली बाईक मात्र हळूहळू माझ्या डोळ्यात वितळली
आणि मला वेगाचे कायमचे वेड लागले.
***
कधी उडाले
कधी उडाले
कधी सेटल झाले
हवेला दिले कधी श्वास
कधी पायांना थोडी जमीन
वृक्ष झाले फळे वाटली
कधी मुळातून उघडली गेले
कधी फुलापर्यंत सुई पोहचवली
सुवास ओवले
केसात माळले
कधी स्कायलॅब क्लब केली
कधी चंद्रावर चालत गेले
कधी फोटोना दिले रंग
कधी व्यक्तीलाच ब्लॅक अँड व्हाईट केले
कधी सत्यालाच पाहिले ढिले
कधी भासही टाईट झाले
स्वतःपुढे ठेवला कॅमेरा
स्वतःलाच एकांतात शूट केले
कधी चॅनेलची ठोकरली ऑफर
अख्खे प्रक्षेपण ऑफ केले
कधी तरंगले
कधी बुडाले
बुडता बुडता पाण्यामध्ये
कवितेला ह्या कोरडे ठेवले
***
धन्यवाद
मी माझ्या मुलांचे संभाव्य चेहरे पहात बसलीये
कधी ते तुझ्यासारखं दिसतंय
कधी माझ्यासारखं
त्याचे ओठ थेट तुझ्या ओठाचं पाणी पिल्यासारखे
तर डोळे थेट माझे डोळे झेरॉक्स केल्यासारखे
पांढऱ्या कपड्यात गुंडाळलंय त्याचं शरीर
त्याची त्वचा कोवळी आहे
आणि ते लेटेस्ट फॅशनसारखं ताजं आहे
सिझेरिनची कसलीच खूण त्याच्या चेहऱ्यावर नाही
फक्त मलाच कळ आली
की माझं सिझरिन झाल्याचं माझ्या लक्ष्यात येतं
माझ्या आणि कदाचित त्याच्याही
त्याच्या प्रथम दर्शनी तू ओवाळलेले रुपये
आणि त्याच्या आजीने ठेवलेली रवळनाथाची सुपारी
त्याच्या सोबतच आहेत
मी त्याच्या रूपातच इतकी खूष आहे
की त्याच्या नावावर चर्चा नकोच
अस मी ठरवून टाकलंय
ते नावारूपाला येईल तेव्हा येईलच
त्याच्या अंगाला अंग लागलं की ते रंगात येतं
त्याच्यासाठी प्रत्येक क्षण सण आहे
प्रत्येक कण आनंदाची थरथर
त्याला भूक लागली की माझे स्तन भरून येतात
मी दुसऱ्यांदा वयात आलीये म्हण ना
पहिल्यांदा बाई
आणि आता आई
सगळ्या खोलीभर त्याचा फ्रेशनेस भरून आहे
आणि मी संपूर्ण पृथ्वीला
मला आई केल्याबद्दल धन्यवाद देते आहे
***
सेन्डऑफ
तू माझ्या नवऱ्यातून थेट माझ्यात आलास
इलेक्ट्रॉनिक जॉगिंग करत
तू येतोयस हे कळूही न देता
कंडोम घालायला विसरलेला एक अनावर अवयव
आणि
बुरखा न घातलेली माझी योनी
तू येतानाही हसलास असशील दिलखुलास
जसा आता हसतोयस
माझ्या आत तू झाडासारखा वाढत गेलास
मग मला फ़ुलं आली फळं आली फांद्या आल्या
तुझा जन्म झाला तेव्हा
दिवस सूर्याचं शेपूट पकडून नाचत होता
आकाश ब्लू डे साजरं करत होतं
आणि पृथ्वीमाय हिरवा शालू नेसून
हिंदी सिनेमातल्या मराठी आईसारखी
नटूनथटून बसली होती
आता तू वाढतोयस
माझ्या त्वचेत तांबं वितळत चाललंय
आणि तुझी हाडं माडासारखी उंच
आणि सागासारखी घट्ट होतायत आतल्या आत
तुझ्या लुसलुशीतपणाचं दूध संपत चाललंय
आणि तू वातावरणाची कॉफी पिऊन
थोडासा बापासारखा दिसायला लागलायस
तू मांडलायस खेळण्याचा भलामोठ्ठा बाजार
आणि त्यात मम्मी नावाची एक डॉलही ठेवलायस
मला कळतंय
तुझं खेळण्याचं वय संपत चाललंय
तुला वेध लागलाय तू कधी मोठा होणार ह्याचा
आणि तू कधीतरी मोठा होणारच
म्हणून मी अवघडून बसलीये
माझ्या पाठीमागे तुझा बाप
आणि पुढं तू
तुम्हा दोघांमध्ये सँडविच झालेलं माझं गर्भाशय
आता हळूहळू नाहीसं होत चाललंय
आणि मी त्याचा निरोप समारंभ
कुणालाच न सांगता
स्वतःतच आटोपता घेतीये
***
मित्र
तू सावधान नव्हतास
मी सावधान नव्हते
फक्त संबंध होते
जे जन्मतःच कात्रीवरून चालत होते
तुझ्या काळ्याशार डोहडोळ्यात मी काळी झाले
तुझ्या आफ्रिकी नाकात आफ्रिकी
तादात्म आणि परात्म
कन्फ्यूजनचा एक झुलाच बांधला होता मी घरात
आणि आयुष्याला काल्पनिक झोके देत राहिले
पुरेशी धडधाकट नसलेली ही कॉस्मॉपॉलिटन बिल्डिंग
आणि त्यात आपल्या प्रेमाचा चौथा मजला
लिफ्ट नसलेला
तू झुल्यावरून उसळलास
खिडकीतुन खाली कोसळलास
आणि दोन पायावर उभा राहून
चक्क सुपरमॅनसारखा चालायला लागलास
तू गेलास
आणि परतलास नाहीस
आता ह्या झुल्याची कर्कश करकर
आणि घरात मागे उरलेल्या आपल्या मुलाची रड
तुझ्यानंतरही तुझे मित्र चौकशीसाठी घरी येतात
झुल्यावर बसतात
हेतुपूर्वक आठवणी काढतात
खिडकी बंद करण्याचं धाडस मात्र कुणीच करत नाही
त्यांनाही वाटतं
तू खिडकीतून कोणत्याही क्षणी येशील
ते सावधान असतात
माझ्याप्रमाणेच
***
तयारी
त्यांनी माझ्या चेहेऱ्यावर ऍसिड उधळलं
आणि माझ्या चेहेऱ्यावर थोपलेली समस्त पुरुषी त्वचा जळून
खाली गळून पडली
मी आता बुरख्याला खऱ्या अर्थाने नकार देऊ शकते
दहशतवादी मुतून गेलेत माझ्या घराच्या बाथरूममध्ये
त्यांच्या लघवीचा वास दहशतीइतकाच उग्र आणि तीव्र
मी आता प्रसवेन माझ्या सुगंधातून माझ्या घरात
एका नव्या स्त्रीचा चेहरा
आणि शतक शतक तुडवीत करेन
माझ्या नव्या जन्माचं दमदार सेलिब्रेशन
मी घाबरलेली नाहीये
मी नव्या सृजनाची तयारी करतीये
***
झाड
मी तुला मिठीत घेतलंच नाही
मी झाडाला मिठीत घेतलं
मला एकदम हिरवंगार झाल्यासारखं वाटलं
मग तू काहीतरी बोललास
ते मी कानांनी टिपलंच नाही
मी फक्त पानांची सळसळ टिपली
मग तू माझ्या आत आलास
पण मी तुला पाहिलंच नाही
मला फक्त फांद्याफांद्यांतून वारं पिसाटल्यासारखं वाटलं
मग तू एकाएकी शांत झालास
पण मला ते कळलंच नाही
फक्त पानं थकल्यासारखी त्वचेवर गळतायत एवढंच जाणवलं
तू निघून गेलास
पण मला पायरव ऐकूच नाही आला
फक्त एका पुरुषानं झाड कापून
ज्या ट्रकात भरलं
त्याच्या निघण्याचा माझ्यात आवाज झाला
***
दारू
जिज्ञासेने घेतली मी दारू थोडीशी
पुरुषांची जात झाली वेडीपिशी
म्हणे काय बाईच्या जातीला शोभते
बघू आता झोपते की नशेत चालते
पडत गेली माझी बदचाल वाकडी
उडू लागल्या वावड्या ही झाली बेवडी
तरंगत तरंगत झाला माझा ढग
मलाही चढली पुरुष होण्याची रग
जिथे आला कळून दारू पिण्यातल्या धोका
गुरगुरायला लागला माझ्यात एक बोका
मांजरीसारखे आता डोळे मिटून घेते
पुरुषासारखी आता दारुही नाकारते
बाटलीतल्या बाटलीत पहाते त्यांचे बण्ड
नशेत क्रांतिकारक शुद्धीत मात्र थण्ड
***
भीक
माणसांना चोरी करायची नसते
म्हणून माणसे भीक मागतात
किंवा माणसांना चोरी करायचेही कष्ट करायचे नसतात
म्हणून माणसे भीक मागतात
भीक ही एक पॉलिटिकल गोष्ट असते
तिच्यात बाई कधी सुरु होते कधी माणूस
तेच कळत नाही
भीक अंधुक असते
बाईच्या अस्तित्वासारखीच
म्हणूनच बहुतांश भिकारी अंधुक असतात
त्यांची दुनिया अंधुक असते
त्यांना तेवढेच दिसते
जेवढे भीक त्यांना दाखवते
भिकेला काय आणि किती अंग दाखवायचे
ह्याचे कॅब्रेडान्सरसारखेच
प्रोफेशनल भान असते
ती तेवढेच अंग दाखवते
जेवढे दाखवणे पुरेसे असते
ती तेवढेच अंग पेटवते
जेवढे पेटणे आवश्यक असते
बाकी उरलेले अंग भीक
बाईच्या एक्स्पोज न झालेल्या अंगासारखे
गुलदस्त्यातच ठेवते
***
आश्वासन
जमिनीवर झोपलास
की हमखास पाठ धरायची
म्हणून तू भीमासारखा
जमिनीला पाठ न दाखवता
खाटेवरच स्वतःची झोप अंथरायचास
माझ्या जमिनीवरच झोप अंथरून
पाय पसरण्याच्या सवयीला
तू म्हणायचास स्त्रीशक्ती
आणि अख्ख पुरुषपण गालात ठेवत
गालातल्या गालात हसायचास
मी जमिनीवर मांडी घालून कशीही बसले की
तू कडाडायचास
अशी अंडी काय उबवत बसलीयेस
योग्याने कसे ताठ असायला हवे
अन्यथा योग ही माठच होतो
पतंजलीची योगसूत्रे शिकवताना
काहीतरी उकलत गेल्यासारखे तुझे डोळे
स्वतःचा देह पाहून उदास हसायचे
अंगभर त्वचेच्या खाली नरकासारखा तळपणारा सोरायसीस
पाठीवर एका मारामारीत बॅटचे बसलेले विखारी तडाखे
दोन्ही कानांचे बहिरे झालेले आखाडे
आणि वासाची ओळख गायब झालेले नाक
आयुष्याकडून संपूर्ण पराभूत झालेला तू
मला फार फार उशीरा काळलास
आता तू आठवणीत फळलास
की डोळ्यातलं पाणी khalant नाही
सगळं सोसून निर्विकार झालेला तुझा चेहरा
( तू आयुष्य जागला नाहीस सोसलास )
मी मख्ख समजायची
आणि आता त्याच्या 'आड ' चा तू कळलायस
तर माझ्याजवळ पोहराच नाही
मी तुझा एकमेव शिल्लक असलेला फोटो
उदासपणे पाहतीये
माझ्याजवळ त्याची निगेटीवही नाही
ह्या विचारानं धसकून जाऊन
मी त्याला प्राणापलीकडं जपतीये
आणि टवके उडत चाललेला तो फोटो
माझ्या बरोबरच जीर्ण होत चाललाय
मी त्या फोटोआधी मरेन
एवढंच आश्वासन
आता मला आयुष्यातून हवं आहे.
***
शिडी
ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेले पोस्टमॉडर्न विषाणू
त्यांचे लोकल देह त्यांची नेटीव रचना
आणि ह्या ग्लोबवर जनेटीक ग्लोबलायझेशन होऊन
जन्माला आलेला हा तुझा माझा मल्टीनॅशनल बहुपेशीय जीव
आपल्या आनंदानं जगण्याची स्पॉन्सरशीप मिळालीये
आणि तरीही दुःखाचं प्रक्षेपण करणारी तुझी तृष्णामग्न प्रणाली
तुझ्या हालचालीतून फक्त दुःखच प्रक्षेपित करतीये
शिखरांना मुसक्या बांधून दऱ्यात खेचता येत नाही
सत्य कधी अवतार बनून वरून अवतरत नाही
म्हणूनच मी व्हर्टिकली आनंदानं चढतीये
आणि तू हॉरिझंटली ऐसपैस मैदानासारखा फाकलेला
तुझ्या माझ्या देहात एका क्रॉसवर्डची शिडी आहे
आणि मी अनावर आनंदानं
संभोग चढत चाललीये.
***
दुरून
तू पुरुष आहेस त्यात पुन्हा ब्राम्हण
कितीही जवळ आलास तरी
मनुस्मृतीसारखाच वाटत राहशील
एक कर
मला दुर्बीण आणून दे
म्हणणे मी तुला रिमिक्स गाण्यातल्या मॉडेलसारखी
फक्त दुरूनच पाहीन
आणि यदाकदाचित तुझं आकर्षण वाटलंच तर
चेकाळून जाऊन ऑरगॅझम डिसचार्ज करून मोकळी होईन
वाईट नको वाटून घेऊस
पण हल्ली डोंगर
दुरून साजरे करण्याचेच दिवस आलेत
***
अन्न
अन्न माझा आरसा आहे
मी लख्खपणे पाहू शकते त्यात स्वतःला
म्हणूनच परस्परसंबंधांची थाळी चकचकीत ठेवते
तुला हवं असतं स्वतःच व्यक्तिमत्व
आणि अन्न आणि तू ह्यांच्यात भिंत उभी राहते
मला पाण्यात माझे रक्त वाटताना दिसते
फळात माझे स्तन
तुला फ्रिजमध्ये आख्ख फास्ट फूड कल्चर
टिकण्याचा हव्यास जडलाय
मी अन्नात माझा वास हुंगते
तेव्हा तू मी वाढलेल्या थाळीत
आयुष्याचं अत्तर शोधत असतोस
ही पृथ्वी माझ्यासारखीच अन्न तयार व्हावे म्हणून
ऋतू बदलत असते
आणि तू वेळेवर जेवण्यासाठी
घड्याळ शोधल्याच्या आनंदात सर्वत्र लटकत असतोस
घड्याळे रीपेअर करून करूनही
तुझ्याकडे खाण्यासाठी प्रचंड मोकळा वेळ
आणि मी ही अशी स्वयंपाकघरात वाढत जाणारी बाई
तू टीव्ही पाहत फास्ट फूड फक्त करत असतोस तेव्हा
मी मुलाला भरवत म्हणत असते
एक घास काऊचा
एक घास चिऊचा
तू मॉनिटरवर लाखी डाळीने आंधळा झालेला असतोस तेव्हा
मला घरगुती अन्नात मी स्वच्छ दिसत असते
***
महाभारत
हे शरीर किती संभोगाच्या पानांनी बनलंय
३६५ ?
१००० ?
२००० ?
लिहून लिहून अंग थकून गेलंय
आणि हे महाभारत संपचत नाही
प्रत्येक वेळी नवे पान लिहिण्याची असोशी
आणि प्रत्येक वेळी मृत्यूची वाळवी लागल्याने
कोणत्याही क्षणी लेखन नाहीसे होण्याचे भय
मी लिहितीये
आणि पोखरलीही जातीये
मी आजकाल वारुळासारखी दिसतीये
त्याचं रहस्य हेच आहे
***
दिलासा
वीज पुन्हा एकदा निघून गेलीये
आणि मी टीव्ही सोडून तुला
भाषेत शोधत बसलीये
तू अभिनेता नाहीस
हा दैवदुर्विलास आहे की भाषेचा चिद्विलास
मला माहित नाही
पण वीज गेली कि तू
हमखास आठवतोस
अंधारात टीव्ही उभाच राहू शकत नाही
भाषा उभीच का पळूही शकते
हे भाषेचे प्रकाशबळ आहे
आरसा म्हणून काहीच वर्कआऊट होत नाही आजकाल
पूर्वी पाणी उपयोगी पडायचं आम्हा बायकांना
आजकाल तेही इतकं प्रदूषित की
त्याची शुद्धता बाटलीत बंद
कमोडिटी बनून
जी काहीच दाखवत नाही ह्या चंद्रप्रकाशात
मी श्रुंगार करून बसलीये
आणि मला माझा चेहरा दाखवणारे तुझे शब्द
गायब आहेत
ह्या फिक्या चंद्रप्रकाशात
हे असं आंधळेपण स्वीकारणं
जिकरीचं होत चाललंय
भाषेत चालत जाताना
तू नाहीस
तुझ्या कविता नाहीत
तुझं शब्दांनी पाहणं नाही
की माझं मला दिसणंही नाही
फक्त माझं शरीर माझ्या स्पर्शाला कळतंय
एवढाच दिलासा
ह्या जिवंतपणाचा काळोखात आहे
***
उत्तखनन
मिळालेला नवरा नाण्यासारखा उधळला
आणि छापा की काटा
ह्याची प्रतिक्षा करत राहिले
एक दिवस हवाच फ्रिज झाली
आणि नाणं उभ्या उभ्याच
पुराणवस्तूसंग्रहालयात दाखल झालं
आता कधीमधी संसाराच्या उत्खननाचे आवाज ऐकू येतात
आणि मी इतिहासकारासारखी
स्वतःलाच रचत बसते
माझ्या घरात स्वनिर्मित नवऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेत
आणि मी हे सगळं
आमच्या साडेपाच फुटी देहांनी घडवलंय
ह्या विचारानेच अचंबित आहे
***
ऍडमिशन
पुन्हा एकदा उदासी पसरत चाललीये अंगभर संधीवातासारखी
पुन्हा एकदा ऍडमिशनला नकार मिळालाय
आणि मी पुन्हा एकदा स्वतःलाच जोजावतीये
फील गुड फील गुड
बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह
शिवा खेर नुकताच शिटी मारून गेलाय माझ्या मेंदूत
नेपोलियन हिल भरवत बसलाय काळजाला
पॉझिटिव थिंकिंगचे फायदे
प्रत्येक चॅनेल माझ्या डोळ्यांची करमणूक करतंय
एखाद्या औषधी योजनेसारखं
आणि सुस्तावलेला संगणक प्रोग्रामात बसलाय नेहमीचेच
सोकॉल्ड रेसियल फास्ट गेम्स
कुठंच मन लागत नाही
अंगावर जणु एक पुरळ उठलाय
आणि त्याची जागा सापडत नाहीये
मुलाच्या पालनपोषणातली excitement संपून गेलीये
उलट त्याच्या स्कुलच्या ऍडमिशन आँक्सायटींने
मीच परीक्षेला बसलीये असं वाटतंय
काहीवेळा वाटतं
ह्या अशा सिंगल पॅरेन्टहूडपेक्षा
तुझा शॅव्होनिझम बरा होता
निदान त्यात हमखास प्रवेशाचा रिलीफ होता
तू एक फोन केला असतास भाईला
आणि क्वालिटी स्कुल मॅनेज झालं असतं
आपला मुलगा इंटरव्हू देऊन देऊन झोपेला आलाय
आणि मी त्याला कधी झोप लागलीये त्याची वाट पहात
जोजवत बसलीये
उद्या कदाचित त्याला ऍडमिशन मिळेल
तोही आयुष्याच्या एक्साम सेंटरवर
परीक्षेला बसायला लागेल
आणि गुणदोनगुनाच्या स्पर्धेय टक्केवारीत
स्वतःच्या आयुष्याचं क्वालिटी आईसक्रिम जज करत बसेल
मी नजरचुकीनं बाहेर ठेवलेलं दूध नासून गेलय
आणि फ्रिज
माणसाला फ्रेश ठेवण्याइतका विकसीत झालेला नाही म्हणून मी
दुधासकट आताच्या 'मी ' ला
बेसिनमध्ये ओतून आलीये
उद्या पुन्हा नवी दुधाची पिशवी
पुन्हा नवा फील गुड चहा
पुन्हा एक ऍडमिशन अटेम्प
आणि कदाचित रात्रही पुन्हा अशीच
उदास आणि विचित्र
मी झाकीर हुसेनची जाहिरातीतली भाडोत्री ताजगी ऐकत
झोपी जाणाऱ्या मुलाला पाहतीये
आणि माझ्या दुःखी जागरणात
माझ्या मुलाची निरागसता
दूधासारखीच नासत चाललीये.
***
मुलं - २
शिक्षक फळ्यावर लिहीतायत
आणि मुलं त्या लेखनाची फळ होण्याची वाट पाहतायत
ड्रॉयव्हर रिक्षा वाहतायत
आणि मुलं रस्त्यांच्या फांद्या होण्याची वाट पाहतायत
डॉक्टर ऑपरेशन करतायत
आणि मुलं स्वतःचं आरोग्य
झाडासारखं आपोआप ऑपरेट होईल त्याची वाट पाहतायत
खेडाडू खेळ्या उभारतायत
आणि मुलं युद्धभूमीच्या सूरपारंब्या होऊन
त्यांना शांततेचे झोके घेता येतील त्याची वाट पाहतायत
कामगार श्रम करतायत
आणि मुलं आपल्या आईबापांच्या घामाला
फुलं येतील ह्याची वाट पाहतायत
शेतकरी शेती करतायत
आणि मुलं संपूर्ण पृथ्वी स्वतःत पिकून
भुकेचं सेल्युलोज तयार होईल ह्याची वाट पाहतायत
मुलांना सगळं जग झाडासारखं दिसतंय
आणि सगळ्या झाडांचे डोळे मुलांच्या डोळ्यांवर खिळून आहेत
मुलं वाट पाहतायत
जे झाडासारखं दिसतंय
ते झाडासारखं होण्याची
आणि त्यांच्या आया
ही प्रतिक्षा मुलांच्या डोळ्यात काय भरणार ह्या चिंतेने
झाडाइतक्याच अस्वस्थ होऊन
झाडांसारख्याच सर्वत्र उभ्या आहेत
***
निळा
तिला निळा आवडायचा आणि मलाही
समुद्रातही आम्ही आकाश पहात बसायचो
जणू पाण्याशी आम्हाला कसलं कर्तव्य नव्हतंच
घरात पाणी भरताना
त्यात आकाश पडत नाही
म्हणून पाणी भरण्याचा आम्हा दोघीनींही कंटाळा
शेवटी मी उपाय म्हणून
निळा बॅरेल आणून ठेवला
पण तरीही त्याच्यातल्या पाण्यात समुद्राची मजा नव्हतीच
एकदा मी म्हणाले
आय हेट श्रीकृष्ण अँड राम आल्सो
तर ती म्हणाली
"असकसं ? निळ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं
विष्णूवर - त्याच्या अवतारांवर प्रेम केलंच पाहिजे "
मला यात्रा ते कधी जमलं नाही
तिच्या सगळ्या चित्रात
पुरुष निळा असायचा
आणि बाई मित्र निळा सोडून कुठल्याही रंगात
जणू बाईच्या अंगाला निळा रंग लागलाच नाही
अशी तिची खात्री होती
हळूहळू तिचे निळ्याचे वेड वाढतच गेले
आणि अख्खा कॅनव्हासच निळा व्हायला लागला
प्रत्येक रंगाला निळं बॅकग्राउंड वाजायला लागलं
मी म्हणायचे कधीतरी काळा वापर
शेवटी आकाशही निदान पावसाळ्यात तरी थोडे काळे होतेच
पण तिच्या कॅनव्हासवर भरलेले ढग जमायचेच नाहीत
कायम रिक्त निळे आकाश
एकदा मी स्वच्छ शुभ्र बुद्ध आणला होता
तर तोही तिच्या कृपेने रातोरात निळा झाला
शेवटी एक दिवस संतापाने तिच्या कॅनव्हासवर
मी लालच लाल फेकून दिला
आणि तिला न सांगता ऑफिसमध्ये निघून गेले
रात्री घर परतले तर सगळे शांत
फक्त एक चिठ्ठी
कॅनव्हास लाल झाल्याने मी घर सोडून जात आहे
ज्या घरात माझा कॅनव्हास लाल होतो
त्या घरात मला राहायचे नाही
मी तिची पुष्कळ वाट पहिली
पण ती परतली नाही
आणि एक दिवस तिच्या आत्महत्येची बातमी आली
तिनं समुद्रात जीव दिला होता
***
अनटचेबिलिटी
तू मला हवा आहेस
माझी जीभ मला तुझ्यात घोळवायची आहे
चाटायचा आहे तुझ्या स्पर्शाचा सर्प
भिनवून घ्यायचे आहे तुझ्या भाषेचे विष
घोळवायचे आहेत ओठ तुझ्या ओठात
माझी लिपस्टिक तुला चढवायची आहे
चढवायची आहे चुंबनाची स्लॅपस्टिक कॉमेडी
अथंपासून इतिपर्यंत घ्यायचा आहे तुझा भोग
म्हणून तुझ्या दारापाशी आलीये
तर तूच थांबलायस
HIV पॉझिटीव
भाषा मारून गेलीये
सुन्नतेची शांतता पसरत चाललीये ह्या क्षणात
कंडोम चढवून पॉसिबल आहे
मी शक्यता पाहतीये
आणि तिच्याकडे पाठ करून स्वतःत चालतीये
रिस्क आणि ओढ
खूप विचार करतीये
आणि अनटचेबलिटीत परततीये
तुझी आवराआवर चालू आहे
तिच्या आवाज मला ऐकू येतोय
मला कसलीच सारवासारव करायची नाहीये
मी तुझा निरोप घेताना तुझा हात हातात घेतीये
सोडतीये
मी काय करतीये मला माहित नाही
तू चाललायस
आणि मी तुला थांबवत नाहीये
फक्त माझ्या हातातल्या हातात निर्माण झालेलं गावकूस
हलत राहताना
त्यांच्या हालचाली मुकाट पाहतीये
मी ब्राम्हण झालीये असा गिल्ट
माझ्यात माझ्या आयुष्यात प्रथमच पसरत चाललाय
***
काच
मी तिच्या घरी गेले तर
अख्ख घर नागडं
काचांचा घरगुती पारदर्शक विकास
आर्किटेक्चरची ग्लासीकल डॉयनॉसरी रास
तिनं दरवाजा उघडला तेव्हाही
ती बॉटलसारखी उभी
तिच्या देहात पेप्सीच वहात असणार
असं मला उगीच वाटून गेलं
तिच्या काचेच्या टीपॉयवर मी माझं डीलिंग मांडलं
तिनं काचेच्या अश ट्रेत ग्लोबल मार्केटची सिगारेट टेकवत
ग्लोबल अश झटकली
तिचे सगळे व्यवहार क्रेडिट कार्डाचेच
आश्चर्य म्हणजे ते मात्र काचेचे नव्हते
पण त्यांना वेष्टन काचेचे
ती बोलायला लागली तेव्हाही
सोडावॉटरच्या बॉटल्स फुटायला लागल्या
तिचे शब्द गोट्यांसारखे माझ्यावर आपटत होते
तिच्या शंका मला कापत होत्या
त्यांना काचेची धार होती
मी रक्तबंबाळ झाले पण तिच्याकडे हळद नव्हती
मी व्हिस्की नाकारली
तसे तिचे काचेचे डोळे विस्फारले
तिने कॉफीची ऑर्डर दिली
अपेक्षेप्रमाणे मग काचेचेच मग झाले
तिची बोटॅनिकल गार्डनही काचेचीच होती
मात्र फुलझाडांना काचा येत नव्हत्या
फुलेच येत होती
मी तिच्या घरभर काचेवरूनच फिरले
डीलिंग संपले तेव्हा तिचे दात आरश्या सारखे चकाकले
म्हणून मी तिच्या दातात मला पाहिजे
तर माझेही डोळे काचेचेच झाले होते
मी लिफ्टमधून खाली येतानाही जाणवत राहिली
ती पाठलाग करणारी तिच्या डोळ्यातील काच
आणि आरोप घेताना झालेला
तडकण्याचा आवाज
***
अरुण कोल्हटकर गेले तेव्हा (एक निर्वस्तुवादी कविता)
अतिवास्तव खंबीरपणे उभे
अस्तित्व ठिसूळपणे जागे
दरम्यान वास्तव स्वप्नवत
मला कोणीतरी फाडून खाल्ले आहे
कोणी म्हणाले
कवी म्हणून पाठवतो
जा आणि कविता लिही
मी कविता लिहीत राहिलो
तो कोणी कोण होता
हे आयुष्यभर लिहूनही कळले नाही
आता अवस्था अशी कि
कवी म्हणून मरत चाललोय
आणि त्या कोणाचा कोन
गायब
नाहीसे होणे प्रबळ होत चाललंय
आपण आयुष्यभर स्वतःलाच फाडून खात असतो कि काय
मृत्यूला माझा नंबर माहित नाही
तरीही मी डायल होतोय
रिसिव्हरसारखा उचलला जातोय
विजेसकट कट
***
आपली कविता एकदम पर्सनल
पब्लिकचा माल नाय
वैयक्तिक ढोलकी हाय
पन सार्वजनीक ढोल नाय
आपण तसे आपल्या गाठीचे
आतला आत लय गाठी
अंतः कारणाचा शोधात आपण
लाख भानगडी आपल्या पाठी
मांजा आपला लय ढीला
पण पतंगात झोल नाय
लोक मारले फाट्यावरती
कवी ठेवली टावरती
सही म्हणून लघवी केली
तर तीची झाली लाघवी मूर्ती
आपलं बेणंच लय इचित्र
जमीन उगवली बनून पाय
आपली कविता एकदम पर्सनल
पुब्लिकचा माल नाय
***
नशिबाने हात ठेवला नाही
म्हणून काय झालं
कपाळ स्वतःचं शाबूत तर ठेवल
अपयशाच्या खोल दऱ्यातही
मी स्वतःची उंची
कधी खुजी होऊ दिली नाही
वापरणाऱ्यांनी वापरले माझे डोके धूर्तपणे
पण माझ्या प्रतिभेचा झरा मी आटू दिला नाही
आता इतक्या तळपाटानंतर
तुम्ही ताम्रतट दिले म्हणून
मी थोडेच ते स्वीकारणार आहे
मी राजा आहे आणि राज्यही
माझा मुद्रा मान्यतेच्या मोताज नाहीत
तुमच्या खुळखुळ्यात मी खुळखुळणार नाही खुळ्यांनो
माझे शहाणपण
ओरिजनल आहे
***
नामदेवानं एक कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली
तुकारामांनी कंटिन्यूटी म्हणून चार हजार लिहिले
आपणही कविता लिहीत सुटलोय
कदाचित कवितेच्या मार्गाने निर्वाण मिळेल म्हणून
साधनेची हीही शक्यता सुटू नये म्हणून
आरश्याने आरसा पहावा
तसे आपण कवितेला पाहतोय
प्रत्येक कवितेत नवा चेहरा दिसतोय आपला
आणि प्रत्येक वेळी
आपणच आपणाला अपरिचित
हे किती अपरिचित मी
ठाण मांडून बसलेत आपल्या शरीरात
आणि आणखी किती मी
आत ठाण मांडायला आत येणार आहेत ?
मीची ही लंबोदर साखळी
मेंदूचा गणपती होत चाललाय
आणि शरीर वाट पाहतय त्या पारदर्शक पाण्याची
ज्यात विसर्जन होईल
***
काटे डॉक्टरांच्याकडची कविता
हे जग म्हणजे एक दंतकथा आहे
आणि आपण त्या दंतकथेच्या दांतांसारखी चघळले जात आहोत
जबडा आहे
पण तो दंतकथेपेक्षा वेगळा नाही
दात मांसात फिट आहेत
आणि मांस दातांमार्फत दंतकथा तयात करतय
प्रत्येक क्षणी अब्जावधी दात उगवतायत
आणि नाहीशे होतायत
कीड लागतीये
पण ती दातांनी बाहेर फेकलेली कचरा आहे कि
मांसाने दाताच्या मृत्यूसाठी केलेली अंतर्गत व्यवस्था आहे
कळत नाहीये
दात दुखवतायत
आणि दंतवैद्य नावाची उपदंतकथा तयार करतायत
मी आलोय कीड काढून टाकण्यासाठी
आणि काटे डॉक्टर स्वतःला दंतकथा न समजता
अस्सल समजून
माझ्या दातांकडे लाळेसारखे ओघळत येतायत.
भाषा
ही भाषा मेली स्त्रीलिंगीच आहे
तो प्रॉब्लेम नाही
पण ती पुरुषसत्ताक वडाभोवतीच फेऱ्या मारते
आणि जन्मोजन्मी हाच पती मागते
हा प्रॉब्लेम आहे.
तिला कितीदा समजावलं
कविता लिहिणं म्हणजे काही वट पौर्णिमा साजरी करणं नव्हं
परंपरेचं सूत नाकासमोर धरून चालण्यात
कसली आलीये स्त्रीशक्ती ?
पण तिच्या फेऱ्या मारणं सुरूच
आणि पुरुषांच्या पारंब्या पकडून
सूरपारंब्या खेळणंही सुरूच
आता सुरवातच अशी तर शेवट काय होणार ?
म्हणूनच मी आख्खा वडच उलटा करून
कवितेत लटकवून दिलाय
ब्रह्मांड उलटं टांगलं
की स्त्री सुलट होते हा माझा अनुभव आहे
कविता लिहिताना
एवढं शहाणपण ठिकाणावर असलंच पाहिजे की.
***
कपडे आणि फॅशन
जे सांगायचं असेल ते सहज सांगता यायला हवं
सरळ आणि थेट
भाषा संवाद साधण्यासाठी आहे
संवादात लपण्यासाठी नाही
ज्यांना बाळंत व्हायचे असते
त्यांना कपडे काढावेच लागतात
मी त्वचेविषयी बोलत आहे
आणि तू पुन्हा फॅशनवर घसरलाय
माझे नागवेपण सहन करायला शिक
डोळ्यांना एवढी तरी समृद्धी शिकव
किंवा काही क्षण तरी नीट आंधळा हो
मी स्पर्शासारखी आहे
आणि स्पर्शात लपायला जागाच नसते
असायला असते
स्पर्शात ये
आणि अस
आहे शीट !
पुन्हा तुझे कपडे आणि त्यांच्या फॅशन्स
***
हत्तीण आणि आंधळे
हत्तीण उडाली आकाशी
तिचे लक्ष आंधळ्यांपाशी
अजूनही माझ्या शरीराची अवयवच चाचणारे आपले सहा कुटुंबमित्र
आणि मी मातृत्वातून आकाशात घेतलेली ही हनुमानउडी
साऱ्या पृथ्वीवर पसरलाय पुरुष गुरुत्वाकर्षणासारखा
किंवा गुरुत्वाकर्षण पसरलंय पुरुषासारखं
माझं प्रत्येक क्षण न्यूटनसारखा गुरुत्व कॅलक्युलेट करत बसलाय
माझ्या काळजाचा चन्द्र फिरतो आहे
कॅलक्युलेटर झालेल्या पुरुषी तिढ्यात
मी उसळवते आहे आकाशातून
कॅलक्युलसमधून एस्केप होत
तुमच्या पुरुषी काळजावर
अवधानाच्या स्त्रैण लाटा
आणि तुम्ही सातहीजण रक्ताची भरती ओहोटी
ही रोजचाच तमाशा असल्यासारखी पहात
दारू पिऊन उभे स्वतःच्याच काळजात
ना तुमचे स्वतःतील हत्तीकडे लक्ष्य
ना तुम्हाला स्वतःला डोळस होण्याची इच्छा
तुमचे हे आंधळेपण
आकाशातही माझ्यावर तालवारीप्रमाणे लटकते आहे
आणि मी माझी मान वाचवत
तुमच्यातील अदृश्य हत्तीकडे संपूर्ण पहात आहे
मला उमगत चाललंय
तुम्ही हत्ती आहात
आणि आंधळेही आहात
हा तुमचा दोष नाही
मी स्वीकारत चाललीये
मी हत्तीण आहे
आणि चक्रधरही आहे
ही माझी कुवत आहे
***
खूप खाली कोसळताना
खूप खाली कोसळताना
पुन्हा मांजरासारखं सुलटं उभा राहता आलं
की जिंकल्यासारखं वाटतं
आयुष्य वासनेपासून सुरु करता येतं
आणि मोक्षापासूनही
फ्राईड वाचून बापाशी रत होता येतं
आईशी अविरत होता येतं
आणि विवेकानंद वाचून नवऱ्यातही मुलगा पाहता येतो
बायकोत कुंडलिनीची कुंडलाई
खूप खाली कोसळताना
वर पाहता येतं
खालीही पाहता येतं
खूप खाली कोसळताना
कोसळणंही पाहता येतं
खूप खाली कोसळताना
कोसळणं पाहताना
डोळे खोलवर न्हेईन
आणि लख्ख उजाडेल
खूप खाली कोसळताना
आता फक्त त्या
खोलीची प्रतिक्षा आहे
***
क्रॅकजॅक
प्रत्येक बाई सारखाच विचार करते
नवऱ्यानं आपल्या शरीराचं मीठ खाल्लं आहे
त्यामुळे तो आपल्या शरीराशी इमानच राखील
मलाही पहिल्या रात्री शरीर मिठासारखंच जाणवलं
आणि रात्र चढत गेली तशी त्याची साखर झाली
वर्ष गेलं
एकमेकात तिळगूळ वाटत
आणि एकदिवस संक्रांत आली
आणि जाणवलं
तुझं शरीर मिठाचे दोन दोन ब्रॅण्ड बाळगून आहे
एक माझा
एक तिचा
मग आयुष्य कालांतराने खारट होत गेलं
आता माझी सवत
तुला पोटभर शरीर खायला घालत असेल
आणि मीही अशी तुझ्या मित्रासोबत
त्याची साखर डायबेटीसी आहे
हे कळून सवरून
त्याच्या नग्न शरीरात
मला साखरेचे कित्येक ब्रॅण्ड दिसतायत
आणि मी आला दिस गोड करत
आपल्या बेडरूमचं गोडाऊन करत चाललीये
तू संध्याकाळी येशील
माझ्या बोलण्यात जमलेल्या मुंग्यावरून
साखरेची चाल ओळखशील
आणि रात्री माझ्या पोटमोऱ्या देहाकडे उदास पाहत
तिच्या मिठात विरून जाशील
गेल्या कित्तेक रात्री ह्या अशा क्रॅकजॅकच्या चालल्यात
***
बायका
बायका आजकाल आयुष्य असेम्बल करायला लागल्यात
त्यांना वाटतं की
पुरुषांच्या मल्टीनॅशनल्सशी फाईल करण्याची
हीच सुसह्य रीत आहे
त्या सहनशील झाल्यात
आणि स्वस्तही
त्या स्वतःचं मार्केटिंगही करायला शिकल्यात
आणि बॉडी हवी तशी मोल्ड करायला शिकल्यात
त्यांचे बांधेसूद बांधे
पुरुषांना घाम फोडतायत
आणि बायका पुरुषांनीच शोधलेली सौन्दर्यप्रसाधनं लावून
स्वतःची त्वचा नितळ ठेवतायत
पुरुष बायकांसाठी सौन्दर्यस्पर्धा ठेवतायत
त्यांना वाटतंय की
बायकांना सौन्दर्यात गुंतवलं की
त्याचं पुरुषांच्या कुरूपपणाकडं लक्ष्य जाणार नाही
पुरुषांना स्वतःच्या रंगाचा उंचीचा शरीराचा
भयंकर कॉम्प्लेक्स आलाय
आणि बायका जगभर केस उडवत
स्वतःच्या सौन्दर्याचं ग्लोबलायझेशन करतायत
बायका दिवसेनदिवस सर्वत्र पसरत चालल्यात
त्यांना माहिती आहे
त्या जिंकताहेत
आणि पुरुष ते हरतायत जे न ओळखता
बायकांच्या विजयाचं मार्केटिंग करतायत
बायका धूर्तच आहे नेहमीप्रमाणं
त्या पुरुषांना काहीच जाणवू देत नाहीयेत
आणि पुरुष सगळं जाणतायत ह्या अहंकारात
बायकांच्या पोटात
नवा जन्म घेण्यासाठी उभे आहेत
***
ऑक्सिजन
(जोसेफ प्रिस्टले , अँटोनी लॅव्हॉयझर आणि कार्ल शिले ह्या प्राणवायूच्या (ऑक्सिजन ) तीन संशोधकांना )
तिघांनी प्राणवायू शोधला मांडला
एकाला धर्माने इंग्लंडहून अमेरिकेला मायग्रेट केला
दुसऱ्याला फ्रेंच राज्यक्रांतीने गळ्यामधून कापला
आणि तिसरा
संशोधनासाठी सायनाईडची संयुगे खाऊन उपेक्षित मेला
तेव्हापासून प्राणवायू रक्तलांच्छित आहे
तरीही माणसात रक्त तयार करण्याची जबाबदारी
त्याने सोडलेली नाही
त्याचा माणसावर विश्वास आहे
माझ्याप्रमाणेच
मी श्वास घेत असते
तेव्हा माणसावर विश्वास दाखवत असते
माझी माणुसकी ही अशी प्राणवायूवर आधारित आहे
मला खात्री आहे
ती प्राणवायूइतकीच भरभक्कम आहे.
***
श्रीधर
श्रीधर मला आवडतो
कारण तो महाशॅव्होनिस्ट आहे
आणि तसाच कवितेत दिसतो
दिलीप मला आवडत नाही
कारण तो शॅव्होनिस्ट आहे
पण कवितेत तसा दिसत नाही
मी श्रीधरला सुधारू शकते
दिलीपला तो सुधारलाय
अशी पक्की खात्री त्याच्या कवितेने पटवलीये
मी श्रीधरशी बोलू शकते
दिलीप आणि मी ह्यांच्या दरम्यान
दांभिकतेची चायनीज वॉल आहे
मी त्या पोयेटीक वॉलवर जाऊन
फारतर मॉलशॉपींग करू शकते
श्रीधर बरोबर मात्र मी एका घरात राहू शकते
***
राखी
एक राखी पाठवतीये काळजातून
तिच्यात सूर्य आहे, चंद्र आहे
आणि तुझी माझी जन्मकुंडलीपण आहे
तुझ्या हातातील ग्लोवज काढून ठेव
तुझी निमूळती बोटं अधिकच लांब कर
आणि राखी उचल
मात्र नखं आधीच काप
म्हणजे ती दुखावली जाणार नाही
माझं रक्त वाहतय तिच्यातून
आणि आपलं कॉमन जेनेटिक कोडही
तुझ्या माझ्या सहवासाचा एक एक दिवस
मी टाईप केलाय तिच्यात माझ्या डोळ्यांनी
माझं टाईपिंग वाईट करू नकोस
निदान पोर्णिमेचा अस्त होईतोवर
एक टेलिपॅथीही टेप केलीये तुझीमाझी
माझी तबल्याची साथ तुला आवडायची
तुझा वाहता गळा आजही माझ्या आयुष्याचा लळा आहे
आपण एकत्र सोसलेल्या झळा
ह्या टेलिपॅथीत आहेत.
वडा, सामोसा, मसाला डोसा, मिसळ
माझ्या कित्तेक हॉटेली चवींचा पहिला परीचय तुझ्यापासून सुरु होतो
तुझे आध्यात्मिक डोळे माझी आजही समजूत घालतात
आणि जीज्ञासेचे वेफर करकर आवाज करत मी सहज संपवते
तुझा हॉटेलमधला शांत रसिक चेहरा आठवत
मी टॉवेलला हात पुसतीये
तर आपण एकत्र केलेली रोज रात्रीची जेवणे
माझ्या किचनमध्ये आवाज करतायत
"सापांना दोर समज
म्हणजे चालणे सोपे होईल "
माझ्या पावलातली सगळी भटकंती
तुझ्या मॅनेजमेंट स्किलचा परीणाम आहे
आणि माझी चालण्याची झील आजही कायम आहे
डॅडींच्या शतपावल्या मला आठवतायत
आईकडेचे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष्य मला सहन नाही व्हायचे
तर तू माझी समजूत घालायचास
आणि माझ्या बरोबर चालायचासही
तुझ्या शतपावल्या अधिक कठीण होत्या हे आता कळतंय
तुझ्या मित्राच्या प्रेमात मी प्रथम पडले तेव्हा तू मूक
माझ्या भुकेचा पियानो कर्कश वाजत राहिला
एक सिम्फनीं वाजता वाजता बेसूर होत गेली
पुन्हा शांतता
प्रत्येक ऍपिअरन्स गेस्ट ऍपिअरन्स किंवा घोस्ट ऍपिअरन्स
आणि शेवटी नेहमीप्रमाणं तूच बरोबर निघालास
आता पाठीची त्वचा आरश्यात न्याहाळतीये तर
त्यात संशयाने थरथरणारी तुझी नाकपुडी दिसतीये
तुझा श्वास आजही मी पाठीत भरून घेते
आणि कुंडलिनीत मरून जाते
तू मला पुन्हा जिवंत करशील ह्याची हमी
आजही चुकलेली नाही
ह्या दोऱ्यात ती हमी मी ओवलीये
मला खात्री आहे
ही राखी तू अलगद मनगटावर बांधशील
आणि तुझे काही श्वास माझ्या नावाने हवेत सोडशील
तुझे ते मोजके श्वास
मला वर्षभर जिवंत ठेवण्यासाठी पुरेसे आहेत.
***
मुक्ता
मुक्ता म्हातारी झाली नाही
की तरुणही झाली नाही बहुधा
ती मुलगीच राहिली गाणं गुणगुणणारी
तिला एम. सी. आली होती का?
तिच्या कवितेत तरी तसा उल्लेख नाही
एम. सी. येण्याआधीच मुक्ती
वक्ष फुलण्याआधीच मोक्ष
तिची त्वचा गोरीच असणार
त्यामुळे काळी असण्याचा कॉम्प्लेक्स तिच्यात निर्माणच झाला नसणार
बाईच्या मोक्षात काळा रंग
फेअर अँड लवलीच्या ऍडसारखा आडवा
तिचे भाऊही गोरेच बहुधा
ती वाळीत टाकली गेलेली ब्राम्हण
म्हणजे अनटचेबलच
बलात्काराच्या समस्येने त्यामुळे फारसे सतावले नसणार तिला
आणि लहानपणी लग्न होण्याची शिक्षा
आपोआप रद्द झालेली
आता इतके सगळे फेवर्स
व्यवस्थेने लादलेले
मग मुंगी आकाशी उडेल नाहीतर काय ?
कधीचा शोधतीये
पण तिने गिळलेला सूर्य काही मला सापडलेला नाहीये.
***
ती अमेरिकेत भेटली
ती अमेरिकेत भेटली तेव्हा मी बर्फात गोठलेली
काळजाचा ससा गोठून देहाच्या फ्रिजमध्ये
आणि ती माझ्याकडे चीज मागायला आलेली
अनमेरिकन
तिच्या स्कर्टच्या उघड्या मांड्या बघून माझी आई थंडावली
आणि बाप सापासारखा पुरुष झाला
तिनं माझ्या बापाला नजरेत झुकवलं
इंडियन कल्चरवर काही प्रश्न विचारले
आणि बाईकवर बसून आली तशी गेली
तिची उघडी पाठ
न सुटलेल्या कापसाच्या गाठीसारखी
क्षणात दिसेनाशी झाली
मग एका ट्रीपमध्ये आम्ही ब्रेसिअर्स शेअर केल्या
नाईटीज शेअर केल्या
तिचा वास तिचाच होता
त्याला उपमा देताना मला एकही इंडियन फूल सुचलं नाही
ती लेस्बियन नव्हती
तरीही एकदा तिने माझे स्तन दोन मिनीट चोखले
भारतीय चोळीबद्दलची तिची उत्सुकता त्यानंतरच शमली
तिच्या देहात सूर्य वितळवत जाताना
माझा सावळा रंग तिला अधिकच उजवा वाटायचा
आणि मी पोहायला उतरले की
समुद्राच्या पाण्यात खास इंडियन मुद्रा उमटते
असं तिला वाटायचं
ती ख्रिश्चन होती
पण माझ्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर ती
कसलेल्या भक्तासारखी नम्र व्हायची
गणपती तिला आवडायचा
आणि रविशंकरची सतारही
मात्र इंडियन्स प्रचंड दांभिक आहेत
असं तिचं स्पष्ट मत होतं
मी तिच्या ई-मेलला कसलाही प्रतिसाद द्यायचे नाही
भेटायचं तर डायरेक्ट भेट
असं मी तिला इंडियन ठसक्यात म्हणायची
भारतीयांनाच प्रथम शून्याचा शोध लागला
हे तिला मान्य होतं
असा शोध फक्त आळशी माणसांनाच लागू शकतो
असं ती म्हणायची
मी मात्र निर्वाणाला पोहोचल्यानंच हे शक्य आहे
असं दणकून सांगायची
तिचे निळे डोळे
तिच्या बापाच्या जेलयात्रेने काळवंडायचे
त्याची फाशी निश्चित होती
मात्र त्याच्या मृत्यूखालीही ती जीवनात नांदत होती
तिचा बाप मेला आणि ती नाहीशी झाली
आणि कुणालाच दिसली नाही
तिच्या दारातली बाईक मात्र हळूहळू माझ्या डोळ्यात वितळली
आणि मला वेगाचे कायमचे वेड लागले.
***
कधी उडाले
कधी उडाले
कधी सेटल झाले
हवेला दिले कधी श्वास
कधी पायांना थोडी जमीन
वृक्ष झाले फळे वाटली
कधी मुळातून उघडली गेले
कधी फुलापर्यंत सुई पोहचवली
सुवास ओवले
केसात माळले
कधी स्कायलॅब क्लब केली
कधी चंद्रावर चालत गेले
कधी फोटोना दिले रंग
कधी व्यक्तीलाच ब्लॅक अँड व्हाईट केले
कधी सत्यालाच पाहिले ढिले
कधी भासही टाईट झाले
स्वतःपुढे ठेवला कॅमेरा
स्वतःलाच एकांतात शूट केले
कधी चॅनेलची ठोकरली ऑफर
अख्खे प्रक्षेपण ऑफ केले
कधी तरंगले
कधी बुडाले
बुडता बुडता पाण्यामध्ये
कवितेला ह्या कोरडे ठेवले
***
धन्यवाद
मी माझ्या मुलांचे संभाव्य चेहरे पहात बसलीये
कधी ते तुझ्यासारखं दिसतंय
कधी माझ्यासारखं
त्याचे ओठ थेट तुझ्या ओठाचं पाणी पिल्यासारखे
तर डोळे थेट माझे डोळे झेरॉक्स केल्यासारखे
पांढऱ्या कपड्यात गुंडाळलंय त्याचं शरीर
त्याची त्वचा कोवळी आहे
आणि ते लेटेस्ट फॅशनसारखं ताजं आहे
सिझेरिनची कसलीच खूण त्याच्या चेहऱ्यावर नाही
फक्त मलाच कळ आली
की माझं सिझरिन झाल्याचं माझ्या लक्ष्यात येतं
माझ्या आणि कदाचित त्याच्याही
त्याच्या प्रथम दर्शनी तू ओवाळलेले रुपये
आणि त्याच्या आजीने ठेवलेली रवळनाथाची सुपारी
त्याच्या सोबतच आहेत
मी त्याच्या रूपातच इतकी खूष आहे
की त्याच्या नावावर चर्चा नकोच
अस मी ठरवून टाकलंय
ते नावारूपाला येईल तेव्हा येईलच
त्याच्या अंगाला अंग लागलं की ते रंगात येतं
त्याच्यासाठी प्रत्येक क्षण सण आहे
प्रत्येक कण आनंदाची थरथर
त्याला भूक लागली की माझे स्तन भरून येतात
मी दुसऱ्यांदा वयात आलीये म्हण ना
पहिल्यांदा बाई
आणि आता आई
सगळ्या खोलीभर त्याचा फ्रेशनेस भरून आहे
आणि मी संपूर्ण पृथ्वीला
मला आई केल्याबद्दल धन्यवाद देते आहे
***
सेन्डऑफ
तू माझ्या नवऱ्यातून थेट माझ्यात आलास
इलेक्ट्रॉनिक जॉगिंग करत
तू येतोयस हे कळूही न देता
कंडोम घालायला विसरलेला एक अनावर अवयव
आणि
बुरखा न घातलेली माझी योनी
तू येतानाही हसलास असशील दिलखुलास
जसा आता हसतोयस
माझ्या आत तू झाडासारखा वाढत गेलास
मग मला फ़ुलं आली फळं आली फांद्या आल्या
तुझा जन्म झाला तेव्हा
दिवस सूर्याचं शेपूट पकडून नाचत होता
आकाश ब्लू डे साजरं करत होतं
आणि पृथ्वीमाय हिरवा शालू नेसून
हिंदी सिनेमातल्या मराठी आईसारखी
नटूनथटून बसली होती
आता तू वाढतोयस
माझ्या त्वचेत तांबं वितळत चाललंय
आणि तुझी हाडं माडासारखी उंच
आणि सागासारखी घट्ट होतायत आतल्या आत
तुझ्या लुसलुशीतपणाचं दूध संपत चाललंय
आणि तू वातावरणाची कॉफी पिऊन
थोडासा बापासारखा दिसायला लागलायस
तू मांडलायस खेळण्याचा भलामोठ्ठा बाजार
आणि त्यात मम्मी नावाची एक डॉलही ठेवलायस
मला कळतंय
तुझं खेळण्याचं वय संपत चाललंय
तुला वेध लागलाय तू कधी मोठा होणार ह्याचा
आणि तू कधीतरी मोठा होणारच
म्हणून मी अवघडून बसलीये
माझ्या पाठीमागे तुझा बाप
आणि पुढं तू
तुम्हा दोघांमध्ये सँडविच झालेलं माझं गर्भाशय
आता हळूहळू नाहीसं होत चाललंय
आणि मी त्याचा निरोप समारंभ
कुणालाच न सांगता
स्वतःतच आटोपता घेतीये
***
मित्र
तू सावधान नव्हतास
मी सावधान नव्हते
फक्त संबंध होते
जे जन्मतःच कात्रीवरून चालत होते
तुझ्या काळ्याशार डोहडोळ्यात मी काळी झाले
तुझ्या आफ्रिकी नाकात आफ्रिकी
तादात्म आणि परात्म
कन्फ्यूजनचा एक झुलाच बांधला होता मी घरात
आणि आयुष्याला काल्पनिक झोके देत राहिले
पुरेशी धडधाकट नसलेली ही कॉस्मॉपॉलिटन बिल्डिंग
आणि त्यात आपल्या प्रेमाचा चौथा मजला
लिफ्ट नसलेला
तू झुल्यावरून उसळलास
खिडकीतुन खाली कोसळलास
आणि दोन पायावर उभा राहून
चक्क सुपरमॅनसारखा चालायला लागलास
तू गेलास
आणि परतलास नाहीस
आता ह्या झुल्याची कर्कश करकर
आणि घरात मागे उरलेल्या आपल्या मुलाची रड
तुझ्यानंतरही तुझे मित्र चौकशीसाठी घरी येतात
झुल्यावर बसतात
हेतुपूर्वक आठवणी काढतात
खिडकी बंद करण्याचं धाडस मात्र कुणीच करत नाही
त्यांनाही वाटतं
तू खिडकीतून कोणत्याही क्षणी येशील
ते सावधान असतात
माझ्याप्रमाणेच
***
तयारी
त्यांनी माझ्या चेहेऱ्यावर ऍसिड उधळलं
आणि माझ्या चेहेऱ्यावर थोपलेली समस्त पुरुषी त्वचा जळून
खाली गळून पडली
मी आता बुरख्याला खऱ्या अर्थाने नकार देऊ शकते
दहशतवादी मुतून गेलेत माझ्या घराच्या बाथरूममध्ये
त्यांच्या लघवीचा वास दहशतीइतकाच उग्र आणि तीव्र
मी आता प्रसवेन माझ्या सुगंधातून माझ्या घरात
एका नव्या स्त्रीचा चेहरा
आणि शतक शतक तुडवीत करेन
माझ्या नव्या जन्माचं दमदार सेलिब्रेशन
मी घाबरलेली नाहीये
मी नव्या सृजनाची तयारी करतीये
***
झाड
मी तुला मिठीत घेतलंच नाही
मी झाडाला मिठीत घेतलं
मला एकदम हिरवंगार झाल्यासारखं वाटलं
मग तू काहीतरी बोललास
ते मी कानांनी टिपलंच नाही
मी फक्त पानांची सळसळ टिपली
मग तू माझ्या आत आलास
पण मी तुला पाहिलंच नाही
मला फक्त फांद्याफांद्यांतून वारं पिसाटल्यासारखं वाटलं
मग तू एकाएकी शांत झालास
पण मला ते कळलंच नाही
फक्त पानं थकल्यासारखी त्वचेवर गळतायत एवढंच जाणवलं
तू निघून गेलास
पण मला पायरव ऐकूच नाही आला
फक्त एका पुरुषानं झाड कापून
ज्या ट्रकात भरलं
त्याच्या निघण्याचा माझ्यात आवाज झाला
***
दारू
जिज्ञासेने घेतली मी दारू थोडीशी
पुरुषांची जात झाली वेडीपिशी
म्हणे काय बाईच्या जातीला शोभते
बघू आता झोपते की नशेत चालते
पडत गेली माझी बदचाल वाकडी
उडू लागल्या वावड्या ही झाली बेवडी
तरंगत तरंगत झाला माझा ढग
मलाही चढली पुरुष होण्याची रग
जिथे आला कळून दारू पिण्यातल्या धोका
गुरगुरायला लागला माझ्यात एक बोका
मांजरीसारखे आता डोळे मिटून घेते
पुरुषासारखी आता दारुही नाकारते
बाटलीतल्या बाटलीत पहाते त्यांचे बण्ड
नशेत क्रांतिकारक शुद्धीत मात्र थण्ड
***
भीक
माणसांना चोरी करायची नसते
म्हणून माणसे भीक मागतात
किंवा माणसांना चोरी करायचेही कष्ट करायचे नसतात
म्हणून माणसे भीक मागतात
भीक ही एक पॉलिटिकल गोष्ट असते
तिच्यात बाई कधी सुरु होते कधी माणूस
तेच कळत नाही
भीक अंधुक असते
बाईच्या अस्तित्वासारखीच
म्हणूनच बहुतांश भिकारी अंधुक असतात
त्यांची दुनिया अंधुक असते
त्यांना तेवढेच दिसते
जेवढे भीक त्यांना दाखवते
भिकेला काय आणि किती अंग दाखवायचे
ह्याचे कॅब्रेडान्सरसारखेच
प्रोफेशनल भान असते
ती तेवढेच अंग दाखवते
जेवढे दाखवणे पुरेसे असते
ती तेवढेच अंग पेटवते
जेवढे पेटणे आवश्यक असते
बाकी उरलेले अंग भीक
बाईच्या एक्स्पोज न झालेल्या अंगासारखे
गुलदस्त्यातच ठेवते
***
आश्वासन
जमिनीवर झोपलास
की हमखास पाठ धरायची
म्हणून तू भीमासारखा
जमिनीला पाठ न दाखवता
खाटेवरच स्वतःची झोप अंथरायचास
माझ्या जमिनीवरच झोप अंथरून
पाय पसरण्याच्या सवयीला
तू म्हणायचास स्त्रीशक्ती
आणि अख्ख पुरुषपण गालात ठेवत
गालातल्या गालात हसायचास
मी जमिनीवर मांडी घालून कशीही बसले की
तू कडाडायचास
अशी अंडी काय उबवत बसलीयेस
योग्याने कसे ताठ असायला हवे
अन्यथा योग ही माठच होतो
पतंजलीची योगसूत्रे शिकवताना
काहीतरी उकलत गेल्यासारखे तुझे डोळे
स्वतःचा देह पाहून उदास हसायचे
अंगभर त्वचेच्या खाली नरकासारखा तळपणारा सोरायसीस
पाठीवर एका मारामारीत बॅटचे बसलेले विखारी तडाखे
दोन्ही कानांचे बहिरे झालेले आखाडे
आणि वासाची ओळख गायब झालेले नाक
आयुष्याकडून संपूर्ण पराभूत झालेला तू
मला फार फार उशीरा काळलास
आता तू आठवणीत फळलास
की डोळ्यातलं पाणी khalant नाही
सगळं सोसून निर्विकार झालेला तुझा चेहरा
( तू आयुष्य जागला नाहीस सोसलास )
मी मख्ख समजायची
आणि आता त्याच्या 'आड ' चा तू कळलायस
तर माझ्याजवळ पोहराच नाही
मी तुझा एकमेव शिल्लक असलेला फोटो
उदासपणे पाहतीये
माझ्याजवळ त्याची निगेटीवही नाही
ह्या विचारानं धसकून जाऊन
मी त्याला प्राणापलीकडं जपतीये
आणि टवके उडत चाललेला तो फोटो
माझ्या बरोबरच जीर्ण होत चाललाय
मी त्या फोटोआधी मरेन
एवढंच आश्वासन
आता मला आयुष्यातून हवं आहे.
***
शिडी
ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेले पोस्टमॉडर्न विषाणू
त्यांचे लोकल देह त्यांची नेटीव रचना
आणि ह्या ग्लोबवर जनेटीक ग्लोबलायझेशन होऊन
जन्माला आलेला हा तुझा माझा मल्टीनॅशनल बहुपेशीय जीव
आपल्या आनंदानं जगण्याची स्पॉन्सरशीप मिळालीये
आणि तरीही दुःखाचं प्रक्षेपण करणारी तुझी तृष्णामग्न प्रणाली
तुझ्या हालचालीतून फक्त दुःखच प्रक्षेपित करतीये
शिखरांना मुसक्या बांधून दऱ्यात खेचता येत नाही
सत्य कधी अवतार बनून वरून अवतरत नाही
म्हणूनच मी व्हर्टिकली आनंदानं चढतीये
आणि तू हॉरिझंटली ऐसपैस मैदानासारखा फाकलेला
तुझ्या माझ्या देहात एका क्रॉसवर्डची शिडी आहे
आणि मी अनावर आनंदानं
संभोग चढत चाललीये.
***
दुरून
तू पुरुष आहेस त्यात पुन्हा ब्राम्हण
कितीही जवळ आलास तरी
मनुस्मृतीसारखाच वाटत राहशील
एक कर
मला दुर्बीण आणून दे
म्हणणे मी तुला रिमिक्स गाण्यातल्या मॉडेलसारखी
फक्त दुरूनच पाहीन
आणि यदाकदाचित तुझं आकर्षण वाटलंच तर
चेकाळून जाऊन ऑरगॅझम डिसचार्ज करून मोकळी होईन
वाईट नको वाटून घेऊस
पण हल्ली डोंगर
दुरून साजरे करण्याचेच दिवस आलेत
***
अन्न
अन्न माझा आरसा आहे
मी लख्खपणे पाहू शकते त्यात स्वतःला
म्हणूनच परस्परसंबंधांची थाळी चकचकीत ठेवते
तुला हवं असतं स्वतःच व्यक्तिमत्व
आणि अन्न आणि तू ह्यांच्यात भिंत उभी राहते
मला पाण्यात माझे रक्त वाटताना दिसते
फळात माझे स्तन
तुला फ्रिजमध्ये आख्ख फास्ट फूड कल्चर
टिकण्याचा हव्यास जडलाय
मी अन्नात माझा वास हुंगते
तेव्हा तू मी वाढलेल्या थाळीत
आयुष्याचं अत्तर शोधत असतोस
ही पृथ्वी माझ्यासारखीच अन्न तयार व्हावे म्हणून
ऋतू बदलत असते
आणि तू वेळेवर जेवण्यासाठी
घड्याळ शोधल्याच्या आनंदात सर्वत्र लटकत असतोस
घड्याळे रीपेअर करून करूनही
तुझ्याकडे खाण्यासाठी प्रचंड मोकळा वेळ
आणि मी ही अशी स्वयंपाकघरात वाढत जाणारी बाई
तू टीव्ही पाहत फास्ट फूड फक्त करत असतोस तेव्हा
मी मुलाला भरवत म्हणत असते
एक घास काऊचा
एक घास चिऊचा
तू मॉनिटरवर लाखी डाळीने आंधळा झालेला असतोस तेव्हा
मला घरगुती अन्नात मी स्वच्छ दिसत असते
***
महाभारत
हे शरीर किती संभोगाच्या पानांनी बनलंय
३६५ ?
१००० ?
२००० ?
लिहून लिहून अंग थकून गेलंय
आणि हे महाभारत संपचत नाही
प्रत्येक वेळी नवे पान लिहिण्याची असोशी
आणि प्रत्येक वेळी मृत्यूची वाळवी लागल्याने
कोणत्याही क्षणी लेखन नाहीसे होण्याचे भय
मी लिहितीये
आणि पोखरलीही जातीये
मी आजकाल वारुळासारखी दिसतीये
त्याचं रहस्य हेच आहे
***
दिलासा
वीज पुन्हा एकदा निघून गेलीये
आणि मी टीव्ही सोडून तुला
भाषेत शोधत बसलीये
तू अभिनेता नाहीस
हा दैवदुर्विलास आहे की भाषेचा चिद्विलास
मला माहित नाही
पण वीज गेली कि तू
हमखास आठवतोस
अंधारात टीव्ही उभाच राहू शकत नाही
भाषा उभीच का पळूही शकते
हे भाषेचे प्रकाशबळ आहे
आरसा म्हणून काहीच वर्कआऊट होत नाही आजकाल
पूर्वी पाणी उपयोगी पडायचं आम्हा बायकांना
आजकाल तेही इतकं प्रदूषित की
त्याची शुद्धता बाटलीत बंद
कमोडिटी बनून
जी काहीच दाखवत नाही ह्या चंद्रप्रकाशात
मी श्रुंगार करून बसलीये
आणि मला माझा चेहरा दाखवणारे तुझे शब्द
गायब आहेत
ह्या फिक्या चंद्रप्रकाशात
हे असं आंधळेपण स्वीकारणं
जिकरीचं होत चाललंय
भाषेत चालत जाताना
तू नाहीस
तुझ्या कविता नाहीत
तुझं शब्दांनी पाहणं नाही
की माझं मला दिसणंही नाही
फक्त माझं शरीर माझ्या स्पर्शाला कळतंय
एवढाच दिलासा
ह्या जिवंतपणाचा काळोखात आहे
***
उत्तखनन
मिळालेला नवरा नाण्यासारखा उधळला
आणि छापा की काटा
ह्याची प्रतिक्षा करत राहिले
एक दिवस हवाच फ्रिज झाली
आणि नाणं उभ्या उभ्याच
पुराणवस्तूसंग्रहालयात दाखल झालं
आता कधीमधी संसाराच्या उत्खननाचे आवाज ऐकू येतात
आणि मी इतिहासकारासारखी
स्वतःलाच रचत बसते
माझ्या घरात स्वनिर्मित नवऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेत
आणि मी हे सगळं
आमच्या साडेपाच फुटी देहांनी घडवलंय
ह्या विचारानेच अचंबित आहे
***
ऍडमिशन
पुन्हा एकदा उदासी पसरत चाललीये अंगभर संधीवातासारखी
पुन्हा एकदा ऍडमिशनला नकार मिळालाय
आणि मी पुन्हा एकदा स्वतःलाच जोजावतीये
फील गुड फील गुड
बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह
शिवा खेर नुकताच शिटी मारून गेलाय माझ्या मेंदूत
नेपोलियन हिल भरवत बसलाय काळजाला
पॉझिटिव थिंकिंगचे फायदे
प्रत्येक चॅनेल माझ्या डोळ्यांची करमणूक करतंय
एखाद्या औषधी योजनेसारखं
आणि सुस्तावलेला संगणक प्रोग्रामात बसलाय नेहमीचेच
सोकॉल्ड रेसियल फास्ट गेम्स
कुठंच मन लागत नाही
अंगावर जणु एक पुरळ उठलाय
आणि त्याची जागा सापडत नाहीये
मुलाच्या पालनपोषणातली excitement संपून गेलीये
उलट त्याच्या स्कुलच्या ऍडमिशन आँक्सायटींने
मीच परीक्षेला बसलीये असं वाटतंय
काहीवेळा वाटतं
ह्या अशा सिंगल पॅरेन्टहूडपेक्षा
तुझा शॅव्होनिझम बरा होता
निदान त्यात हमखास प्रवेशाचा रिलीफ होता
तू एक फोन केला असतास भाईला
आणि क्वालिटी स्कुल मॅनेज झालं असतं
आपला मुलगा इंटरव्हू देऊन देऊन झोपेला आलाय
आणि मी त्याला कधी झोप लागलीये त्याची वाट पहात
जोजवत बसलीये
उद्या कदाचित त्याला ऍडमिशन मिळेल
तोही आयुष्याच्या एक्साम सेंटरवर
परीक्षेला बसायला लागेल
आणि गुणदोनगुनाच्या स्पर्धेय टक्केवारीत
स्वतःच्या आयुष्याचं क्वालिटी आईसक्रिम जज करत बसेल
मी नजरचुकीनं बाहेर ठेवलेलं दूध नासून गेलय
आणि फ्रिज
माणसाला फ्रेश ठेवण्याइतका विकसीत झालेला नाही म्हणून मी
दुधासकट आताच्या 'मी ' ला
बेसिनमध्ये ओतून आलीये
उद्या पुन्हा नवी दुधाची पिशवी
पुन्हा नवा फील गुड चहा
पुन्हा एक ऍडमिशन अटेम्प
आणि कदाचित रात्रही पुन्हा अशीच
उदास आणि विचित्र
मी झाकीर हुसेनची जाहिरातीतली भाडोत्री ताजगी ऐकत
झोपी जाणाऱ्या मुलाला पाहतीये
आणि माझ्या दुःखी जागरणात
माझ्या मुलाची निरागसता
दूधासारखीच नासत चाललीये.
***
मुलं - २
शिक्षक फळ्यावर लिहीतायत
आणि मुलं त्या लेखनाची फळ होण्याची वाट पाहतायत
ड्रॉयव्हर रिक्षा वाहतायत
आणि मुलं रस्त्यांच्या फांद्या होण्याची वाट पाहतायत
डॉक्टर ऑपरेशन करतायत
आणि मुलं स्वतःचं आरोग्य
झाडासारखं आपोआप ऑपरेट होईल त्याची वाट पाहतायत
खेडाडू खेळ्या उभारतायत
आणि मुलं युद्धभूमीच्या सूरपारंब्या होऊन
त्यांना शांततेचे झोके घेता येतील त्याची वाट पाहतायत
कामगार श्रम करतायत
आणि मुलं आपल्या आईबापांच्या घामाला
फुलं येतील ह्याची वाट पाहतायत
शेतकरी शेती करतायत
आणि मुलं संपूर्ण पृथ्वी स्वतःत पिकून
भुकेचं सेल्युलोज तयार होईल ह्याची वाट पाहतायत
मुलांना सगळं जग झाडासारखं दिसतंय
आणि सगळ्या झाडांचे डोळे मुलांच्या डोळ्यांवर खिळून आहेत
मुलं वाट पाहतायत
जे झाडासारखं दिसतंय
ते झाडासारखं होण्याची
आणि त्यांच्या आया
ही प्रतिक्षा मुलांच्या डोळ्यात काय भरणार ह्या चिंतेने
झाडाइतक्याच अस्वस्थ होऊन
झाडांसारख्याच सर्वत्र उभ्या आहेत
***
निळा
तिला निळा आवडायचा आणि मलाही
समुद्रातही आम्ही आकाश पहात बसायचो
जणू पाण्याशी आम्हाला कसलं कर्तव्य नव्हतंच
घरात पाणी भरताना
त्यात आकाश पडत नाही
म्हणून पाणी भरण्याचा आम्हा दोघीनींही कंटाळा
शेवटी मी उपाय म्हणून
निळा बॅरेल आणून ठेवला
पण तरीही त्याच्यातल्या पाण्यात समुद्राची मजा नव्हतीच
एकदा मी म्हणाले
आय हेट श्रीकृष्ण अँड राम आल्सो
तर ती म्हणाली
"असकसं ? निळ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं
विष्णूवर - त्याच्या अवतारांवर प्रेम केलंच पाहिजे "
मला यात्रा ते कधी जमलं नाही
तिच्या सगळ्या चित्रात
पुरुष निळा असायचा
आणि बाई मित्र निळा सोडून कुठल्याही रंगात
जणू बाईच्या अंगाला निळा रंग लागलाच नाही
अशी तिची खात्री होती
हळूहळू तिचे निळ्याचे वेड वाढतच गेले
आणि अख्खा कॅनव्हासच निळा व्हायला लागला
प्रत्येक रंगाला निळं बॅकग्राउंड वाजायला लागलं
मी म्हणायचे कधीतरी काळा वापर
शेवटी आकाशही निदान पावसाळ्यात तरी थोडे काळे होतेच
पण तिच्या कॅनव्हासवर भरलेले ढग जमायचेच नाहीत
कायम रिक्त निळे आकाश
एकदा मी स्वच्छ शुभ्र बुद्ध आणला होता
तर तोही तिच्या कृपेने रातोरात निळा झाला
शेवटी एक दिवस संतापाने तिच्या कॅनव्हासवर
मी लालच लाल फेकून दिला
आणि तिला न सांगता ऑफिसमध्ये निघून गेले
रात्री घर परतले तर सगळे शांत
फक्त एक चिठ्ठी
कॅनव्हास लाल झाल्याने मी घर सोडून जात आहे
ज्या घरात माझा कॅनव्हास लाल होतो
त्या घरात मला राहायचे नाही
मी तिची पुष्कळ वाट पहिली
पण ती परतली नाही
आणि एक दिवस तिच्या आत्महत्येची बातमी आली
तिनं समुद्रात जीव दिला होता
***
अनटचेबिलिटी
तू मला हवा आहेस
माझी जीभ मला तुझ्यात घोळवायची आहे
चाटायचा आहे तुझ्या स्पर्शाचा सर्प
भिनवून घ्यायचे आहे तुझ्या भाषेचे विष
घोळवायचे आहेत ओठ तुझ्या ओठात
माझी लिपस्टिक तुला चढवायची आहे
चढवायची आहे चुंबनाची स्लॅपस्टिक कॉमेडी
अथंपासून इतिपर्यंत घ्यायचा आहे तुझा भोग
म्हणून तुझ्या दारापाशी आलीये
तर तूच थांबलायस
HIV पॉझिटीव
भाषा मारून गेलीये
सुन्नतेची शांतता पसरत चाललीये ह्या क्षणात
कंडोम चढवून पॉसिबल आहे
मी शक्यता पाहतीये
आणि तिच्याकडे पाठ करून स्वतःत चालतीये
रिस्क आणि ओढ
खूप विचार करतीये
आणि अनटचेबलिटीत परततीये
तुझी आवराआवर चालू आहे
तिच्या आवाज मला ऐकू येतोय
मला कसलीच सारवासारव करायची नाहीये
मी तुझा निरोप घेताना तुझा हात हातात घेतीये
सोडतीये
मी काय करतीये मला माहित नाही
तू चाललायस
आणि मी तुला थांबवत नाहीये
फक्त माझ्या हातातल्या हातात निर्माण झालेलं गावकूस
हलत राहताना
त्यांच्या हालचाली मुकाट पाहतीये
मी ब्राम्हण झालीये असा गिल्ट
माझ्यात माझ्या आयुष्यात प्रथमच पसरत चाललाय
***
काच
मी तिच्या घरी गेले तर
अख्ख घर नागडं
काचांचा घरगुती पारदर्शक विकास
आर्किटेक्चरची ग्लासीकल डॉयनॉसरी रास
तिनं दरवाजा उघडला तेव्हाही
ती बॉटलसारखी उभी
तिच्या देहात पेप्सीच वहात असणार
असं मला उगीच वाटून गेलं
तिच्या काचेच्या टीपॉयवर मी माझं डीलिंग मांडलं
तिनं काचेच्या अश ट्रेत ग्लोबल मार्केटची सिगारेट टेकवत
ग्लोबल अश झटकली
तिचे सगळे व्यवहार क्रेडिट कार्डाचेच
आश्चर्य म्हणजे ते मात्र काचेचे नव्हते
पण त्यांना वेष्टन काचेचे
ती बोलायला लागली तेव्हाही
सोडावॉटरच्या बॉटल्स फुटायला लागल्या
तिचे शब्द गोट्यांसारखे माझ्यावर आपटत होते
तिच्या शंका मला कापत होत्या
त्यांना काचेची धार होती
मी रक्तबंबाळ झाले पण तिच्याकडे हळद नव्हती
मी व्हिस्की नाकारली
तसे तिचे काचेचे डोळे विस्फारले
तिने कॉफीची ऑर्डर दिली
अपेक्षेप्रमाणे मग काचेचेच मग झाले
तिची बोटॅनिकल गार्डनही काचेचीच होती
मात्र फुलझाडांना काचा येत नव्हत्या
फुलेच येत होती
मी तिच्या घरभर काचेवरूनच फिरले
डीलिंग संपले तेव्हा तिचे दात आरश्या सारखे चकाकले
म्हणून मी तिच्या दातात मला पाहिजे
तर माझेही डोळे काचेचेच झाले होते
मी लिफ्टमधून खाली येतानाही जाणवत राहिली
ती पाठलाग करणारी तिच्या डोळ्यातील काच
आणि आरोप घेताना झालेला
तडकण्याचा आवाज
***
अरुण कोल्हटकर गेले तेव्हा (एक निर्वस्तुवादी कविता)
अतिवास्तव खंबीरपणे उभे
अस्तित्व ठिसूळपणे जागे
दरम्यान वास्तव स्वप्नवत
मला कोणीतरी फाडून खाल्ले आहे
कोणी म्हणाले
कवी म्हणून पाठवतो
जा आणि कविता लिही
मी कविता लिहीत राहिलो
तो कोणी कोण होता
हे आयुष्यभर लिहूनही कळले नाही
आता अवस्था अशी कि
कवी म्हणून मरत चाललोय
आणि त्या कोणाचा कोन
गायब
नाहीसे होणे प्रबळ होत चाललंय
आपण आयुष्यभर स्वतःलाच फाडून खात असतो कि काय
मृत्यूला माझा नंबर माहित नाही
तरीही मी डायल होतोय
रिसिव्हरसारखा उचलला जातोय
विजेसकट कट
***
आपली कविता एकदम पर्सनल
पब्लिकचा माल नाय
वैयक्तिक ढोलकी हाय
पन सार्वजनीक ढोल नाय
आपण तसे आपल्या गाठीचे
आतला आत लय गाठी
अंतः कारणाचा शोधात आपण
लाख भानगडी आपल्या पाठी
मांजा आपला लय ढीला
पण पतंगात झोल नाय
लोक मारले फाट्यावरती
कवी ठेवली टावरती
सही म्हणून लघवी केली
तर तीची झाली लाघवी मूर्ती
आपलं बेणंच लय इचित्र
जमीन उगवली बनून पाय
आपली कविता एकदम पर्सनल
पुब्लिकचा माल नाय
***
नशिबाने हात ठेवला नाही
म्हणून काय झालं
कपाळ स्वतःचं शाबूत तर ठेवल
अपयशाच्या खोल दऱ्यातही
मी स्वतःची उंची
कधी खुजी होऊ दिली नाही
वापरणाऱ्यांनी वापरले माझे डोके धूर्तपणे
पण माझ्या प्रतिभेचा झरा मी आटू दिला नाही
आता इतक्या तळपाटानंतर
तुम्ही ताम्रतट दिले म्हणून
मी थोडेच ते स्वीकारणार आहे
मी राजा आहे आणि राज्यही
माझा मुद्रा मान्यतेच्या मोताज नाहीत
तुमच्या खुळखुळ्यात मी खुळखुळणार नाही खुळ्यांनो
माझे शहाणपण
ओरिजनल आहे
***
नामदेवानं एक कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली
तुकारामांनी कंटिन्यूटी म्हणून चार हजार लिहिले
आपणही कविता लिहीत सुटलोय
कदाचित कवितेच्या मार्गाने निर्वाण मिळेल म्हणून
साधनेची हीही शक्यता सुटू नये म्हणून
आरश्याने आरसा पहावा
तसे आपण कवितेला पाहतोय
प्रत्येक कवितेत नवा चेहरा दिसतोय आपला
आणि प्रत्येक वेळी
आपणच आपणाला अपरिचित
हे किती अपरिचित मी
ठाण मांडून बसलेत आपल्या शरीरात
आणि आणखी किती मी
आत ठाण मांडायला आत येणार आहेत ?
मीची ही लंबोदर साखळी
मेंदूचा गणपती होत चाललाय
आणि शरीर वाट पाहतय त्या पारदर्शक पाण्याची
ज्यात विसर्जन होईल
***
काटे डॉक्टरांच्याकडची कविता
हे जग म्हणजे एक दंतकथा आहे
आणि आपण त्या दंतकथेच्या दांतांसारखी चघळले जात आहोत
जबडा आहे
पण तो दंतकथेपेक्षा वेगळा नाही
दात मांसात फिट आहेत
आणि मांस दातांमार्फत दंतकथा तयात करतय
प्रत्येक क्षणी अब्जावधी दात उगवतायत
आणि नाहीशे होतायत
कीड लागतीये
पण ती दातांनी बाहेर फेकलेली कचरा आहे कि
मांसाने दाताच्या मृत्यूसाठी केलेली अंतर्गत व्यवस्था आहे
कळत नाहीये
दात दुखवतायत
आणि दंतवैद्य नावाची उपदंतकथा तयार करतायत
मी आलोय कीड काढून टाकण्यासाठी
आणि काटे डॉक्टर स्वतःला दंतकथा न समजता
अस्सल समजून
माझ्या दातांकडे लाळेसारखे ओघळत येतायत.
No comments:
Post a Comment